देविका हा उत्तर भारतातील पहिला नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पूर्ण होण्याच्या बेतात आहे अशी माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज दिली. ‘नमामि गंगा’ प्रकल्पाच्या धर्तीवर, 190 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील पवित्र अशा देविका नदीची शुद्धता जपण्यासाठी स्वतंत्रपणे हाती घेतलेल्या द्रव कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

द्रव कचरा व्यवस्थापन प्रकल्पासोबतच, देविका नदीची शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी अनेक दृष्टीने महत्त्वाचा असणारा एक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प देखील, देविका पुनरुज्जीवन प्रकल्पा अंतर्गत उभारण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

मोठ्या विकासात्मक प्रकल्पांच्या यशस्वी पूर्ततेसाठी, समाजाच्या तळागाळाचे प्रतिनिधी म्हणून पी आर आय अर्थात पंचायत राज संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे, असेही त्यायांनी बैठकीत सांगितले. बैठकीत उपस्थित पी आर आय च्या प्रतिनिधींनी मंत्र्यांसमोर अनेक समस्या मांडल्या आणि या समस्या कमीत कमी वेळेत सोडवण्याचे निर्देश, मंत्रीमहोदयांनी विभागांना दिले.
