संरक्षण मंत्रालय आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात आज नवी दिल्ली येथे भारतीय तटरक्षक दलासाठी संबंधित अभियांत्रिकी पाठबळाच्या पॅकेजसहित दोन सुधारित डॉर्निअर विमान खरेदीचा एकंदर 458.87 कोटी रुपयांचा करार करण्यात आला. बाय इंडियन श्रेणी अंतर्गत ही विमाने खरेदी केली जाणार आहेत.

या विमानांमध्ये काचेचा वैमानिक कक्ष, सागरी गस्ती रडार, इलेक्ट्रो ऑप्टिक इन्फ्रारेड उपकरण, मिशन मॅनेजमेंट प्रणाली इ. सारखी अनेक अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात येणार आहेत. या उपकरणांच्या समावेशामुळे भारतीय तटरक्षक दलाच्या कार्यकक्षेत असलेल्या सागरी क्षेत्राच्या हवाई टेहळणीला आणखी मदत मिळणार आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (वाहतूक विमान विभाग) कानपूर येथील कारखान्यात स्वदेशी बनावटीने डॉर्निअर विमाने तयार केली जात आहेत आणि सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला अनुसरून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता साध्य करण्यात ती लक्षणीय योगदान देतील.