मुंबईत बांद्रा रेल्वेस्थानकाजवळची अनधिकृत शाखा तोडली म्हणून बाळासाहेबांचा फोटो तोडल्याचा बनाव करुन काल महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली. संजय राजाराम राऊत यांच्या मालकांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मातोश्री-२ अधिकृत करून घेतली. त्याआधी मुंबईतल्या अनधिकृत शाखा का नाही अधिकृत करून घेतल्या, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी केला.
मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली जाते. का नाही घेतली ती अधिकृत करून? ते म्हणत आहेत की आदेश वर्षामधून निघाले. मागच्या अडीच वर्षांत वर्षामधूनच आदेश निघत होते ना… कंगनाचे घर, कार्यालय तोडायला लावले. नवनीत राणांच्या घरावर कारवाई करायला गेले. राणेंचा बंगला तोडण्यासाठी तुमच्या मालकांनी आणि मालकीणींनी किती फोन केले? अनधिकृत शाखा पाडली ही जर नीच कृती असेल तर मग ही जी कृती होत होती तेव्हा नीचपणा कोण करत होते? बाळासाहेबांचा फोटो काढायला महापालिका अधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. त्यांनी फोटो तोडलेला नाही, असे ते म्हणाले.
आज सकाळी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर विठ्ठलाच्या दर्शनाला आले होते. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदूंच्या देवाचे दर्शन घेतले म्हणून त्यांना पोटशूळ उठतोय. तेच जर जामा मशिदीत नतमस्तक झाले असते तर यांना चालले असते. बीआरएस भाजपाची बी टीम आहे, असे हे म्हणतात. मग संजय राऊत यांची उबाठा काय राष्ट्रवादीची ढ टीम आहे, असा सवालही नितेश राणे यांनी केला. प्रकाश आंबेडकर जे हिंदूंची बदनामी करतात, छत्रपतींची बदनामी करतात, त्यांच्यासोबत तुम्ही युती करता? प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आम्ही मांडीला मांडी लावून बसत नाही. जे त्यांच्या सोबत बसतात त्यांना विचारा. जे जे उद्धव ठाकरेंशी निगडित आहेत त्यांना दंगली घडवायचा प्रयत्न आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट व्हावी, अशी मी वारंवार मागणी करत आहे, असेही ते म्हणाले.