दक्षिण मुंबई येथील मरीन ड्राईव्ह परिसरात महिला वस्तीगृहात राहणाऱ्या अठरा वर्षीय मुलीचा विवस्रावस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली. त्यामुळे शिक्षणासाठी वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून गुन्हेगारांची वसतिगृहातील खोलीत घुसून अत्याचार करत हत्त्या करण्यापर्यंत मजल गेली असल्याने राज्यात महिला व मुली सुरक्षित नसल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे.
मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात ही धक्कादायक घटना घडली असून वसतीगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत राहणाऱ्या सदर मुलीची वसतिगृहातच काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाने बलात्कारानंतर हत्त्या करून आत्महत्त्या केली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सदर मुलीला खालच्या मजल्यावर रूम दिलेला असताना ती चौथ्या माळ्यावर विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने वसतिगृह प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. सदर मुलीने वसतिग्रहातील गैरसोईबद्दल वारंवार वसतीगृहाच्या प्रशासनाकडेदेखील तक्रारी केल्याचे कळते, असे त्या म्हणाल्या.
वसतीगृहातील मुली उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे गावी गेल्या असताना फक्त 30-40 मुली सध्या वसतिग्रहात राहत असून सदर मुलींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती काळजी वसतिगृह प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे. सदर पीडित मुलीच्या तक्रारीची योग्य वेळी दाखल घेतली असती तर तिचे प्राण वाचवता आले असते. त्यामुळे या हत्त्याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणीही आमदार कायंदे यांनी गृहमंत्री व महिला बालविकास मंत्र्यांकडे केली आहे.