राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा पुणे लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचा दावा ठोकल्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.
भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. कालच या मतदारसंघावर आपला दावा सांगताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या भागात कोणाची ताकद किती आहे हे बघूनच महाविकास आघाडीने उमेदवारी निश्चित

करावी असे म्हटले होते. यासाठी महापालिका, नगरपालिका, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच विधानसभा सदस्यांच्या संख्येचा विचार व्हावा आणि मगच महाविकास आघाडीने निर्णय करावा, असे ते म्हणाले होते. त्यावर पलटवार करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी, पुण्याची पोटनिवडणूक असू दे किंवा पुढच्या वर्षी होणारी निवडणूक असू दे, पुण्याची जागा काँग्रेसच लढवणार असल्याचे स्पष्ट केले. ही जागा काँग्रेसची होती, आहे आणि पुढेही राहणार असेही ते म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असे सांगत सगळ्यांनाच अप्रत्यक्षपणे सबुरीचा सल्ला दिला आहे. तुटेपर्यंत कोणीही ताणू नये, असे ते म्हणाले.