Homeमुंबई स्पेशल१,१०० मेट्रिक टनाचा,...

१,१०० मेट्रिक टनाचा, १०० मीटर लांब आणि तोही विनाखांब!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग हद्दीत, पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वेस्थानकावरून जाणारा उड्डाणपूल मुंबई महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलासाठी तब्बल १,१०० मेट्रिक टन वजन असणारा सुमारे १०० मीटर लांबीचा पहिला विनाखांब गर्डर आज पहाटे यशस्वीपणे स्थापित करण्यात आला. पालिकेच्या अभियांत्रिकी चमूने हे आव्हानात्मक लक्ष्य पूर्ण केले.

घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वेस्थानक रुळांच्या वरून जाणारा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या निर्मितीमध्ये रेल्वे रुळांवरून जाणारा सुमारे १०० मीटर अंतराचा मुख्य पूल समाविष्ट आहे. हा पूल बांधताना दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी एक असे दोन स्टील गर्डर स्थापित करावे लागणार आहेत. या गर्डरचे वैशिष्ट्य म्हणजे ते भारतातील रेल्वेवरील आतापर्यंतचे सर्वाधिक असे प्रत्येकी ९९.३४ मीटर लांब व ९.५० मीटर रुंद गर्डर आहेत. त्यांचे वजन प्रत्येकी सुमारे अकराशे मेट्रिक टन आहे. या दोन खुल्या स्टील गर्डरची रेल्वे मार्गावर टप्प्याटप्प्याने उभारणी करण्यात येत आहे.

या दोनपैकी पहिला गर्डर काल शनिवार (दिनांक २७ मे २०२३) मध्यरात्रीनंतर १.२० वाजता ते आज (दिनांक २८ मे २०२३) पहाटे ४.२० (म्हणजे तीन तासांच्या कालावधीत) यशस्वीपणे स्थापित करण्यात आला. गर्डर स्थापन करण्याचा शुभारंभ स्थानिक खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांच्यासह भालचंद्र शिरसाट, प्रवीण छेडा, प्रमुख अभियंता (रस्ते) एम. एम. पटेल, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे आणि मध्य रेल्वेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पहिला गर्डर बसवण्यासाठी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक मंजूर केला होता. त्या वेळेत गर्डर स्थापन करण्याचे काम विंच पुलिंग पद्धतीने (winch pulling method) पूर्ण करण्यात आले. प्रारंभी हा गर्डर पूर्व बाजूकडून पश्चिम दिशेला सरकवत, रेल्वे रुळांच्यावर मधोमध आणण्यात आला. आता येत्या दोन-तीन दिवसांत उत्तरेकडे सरकवून तो कायम करण्यात येईल. तसेच, दुसरा गर्डर स्थापन करण्याचे कामदेखील लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या गर्डरला मधोमध आधार न ठेवता अर्थात विनाखांब एकसंघपणे त्याची उभारणी केली जात आहे. एकूणच हा अभियांत्रिकी क्षेत्रातला अविष्कार आहे. पालिकेच्या अभियंत्यांनी आजवर वेगवेगळे आव्हानात्मक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करून दाखवले आहेत. या गर्डरची यशस्वी स्थापनाही पालिकेच्या अभियांत्रिकी यशस्वी कामगिरीतील नवीन टप्पा ठरला आहे. दुसर्‍या टप्प्यामध्ये पुलाच्या पूर्व व पश्चिम बाजूंकडील १७.५० मीटर रुंदीच्या पोहोच रस्त्यांचे (approach roads) काम करण्यात येईल. प्रकल्पाचे संपूर्ण काम डिसेंबर २०२४पर्यंत पूर्ण करण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

विद्याविहार रेल्वे उड्डाणपुलाबाबत थोडेसे…

पालिकेच्या एन विभाग हद्दीत, पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वेस्थानकावरून जाणारा उड्डाणपूल पालिकेच्या पूल विभागाकडून उभारला जात आहे. लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल एकूण दोन मार्गिकांचा आहे. एकूण ६५० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटर पोहोच मार्ग (approach road) बांधण्यात येत आहे. रेल्वे रुळांच्या वर असलेल्या पुलाची रुंदी २४.३० मीटर राहणार आहे. यात दोन्ही बाजूला प्रत्येकी २ मीटरचे पदपथदेखील समाविष्ट आहेत. तर पोहोच मार्ग हा एकूण १७.५० मीटर रुंदीचा असेल. त्यात प्रत्येकी १ मीटरचा पदपथ दोन्ही बाजूस समाविष्ट असेल.

या उड्डाणपूल प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च सुमारे १७८ कोटी रुपये आहे. त्यापैकी, रेल्वे रुळावरील मुख्य उड्डाणपुलाचा खर्च सुमारे १०० कोटी रुपये तर पोहोच मार्ग आणि इतर कामे मिळून ७८ कोटी रुपये इतका खर्च आहे. या उड्डाणपुलावरून विद्याविहार रेल्वेस्थानकाच्या फलाटांवर जाण्यासाठी जोडमार्गदेखील दिला जात आहे. त्यासोबतच दोन्ही बाजूचे रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय, जिना यांचीदेखील पुनर्बांधणी या प्रकल्पांतर्गत केली जाणार आहे. त्याचप्रमाणे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सेवा मार्गदेखील (service road) समाविष्ट आहे. सेवा मार्गाच्या कामाचा भाग म्हणून पूर्व बाजूस सोमय्या नाला पुनर्बांधणीदेखील करण्यात आली आहे.

उड्डाणपूल निर्मितीतील आव्हानांवरदेखील केली मात

१) या पुलाचा आराखडा २०१६मध्ये तयार करण्यात आला होता. सन २०२२मध्ये बांधून हा पूल तयार होणार होता. मात्र रेल्वे मंत्रालयाच्या संशोधन, डिझाईन आणि मानक संस्थेने (आरडीएसओ) पुलाच्या डिझाईनमध्ये बदल सुचवले. यामुळे रेल्वे हद्दीतील आराखड्यात बदल करावा लागला. त्याचबरोबर पुलाच्या पूर्व आणि पश्चिम भागातही बदल करावे लागले.

२) २ मे २०१८ रोजी पुलाच्या बांधकामाचा कार्यादेश देण्यात आला. मात्र, मध्यंतरी कोविड संसर्ग कालावधीतील निर्बंधांमुळे प्रकल्पाच्या निर्मितीत अडथळे आले. 

३) त्याचप्रमाणे प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम करीत असतानादेखील अनेक आव्हाने समोर आली. पर्जन्य जलवाहिन्यांचे रुंदीकरण, रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूंच्या तिकीट खिडकी कक्षांचे स्थानांतरण, प्रकल्पाच्या रेषेत आलेली अतिक्रमणे निष्कासित करणे, यांचा त्यात समावेश होता.

४) यासोबत, कामांच्या गरजेनुसार रेल्वे प्रशासनाची समन्वय साधून रेल्वे ब्लॉक घेणे, हेदेखील आव्हानात्मक ठरले आहे. ही सगळी आव्हाने पार करत हा प्रकल्प आता वेगाने पूर्णत्वाकडे सरकतो आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content