भारतीय नौदलाच्या प्रकल्प-75चा भाग असलेल्या कलवरी वर्गातील 11880 यार्डच्या वाघशीर, या सहाव्या पाणबुडीने गुरूवारी, 18 मे 2023 रोजी पहिली सागरी चाचणी सुरू केली. मुंबईतल्या माझगाव गोदी जहाजबांधणी कंपनीच्या (एमडीएल) कान्होजी आंग्रे बंदरातून 20 एप्रिल 2022 रोजी या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले होते. या पाणबुडीच्या सागरी चाचण्या पूर्ण झाल्यानंतर, आगामी वर्ष 2024च्या सुरुवातीला ही पाणबुडी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात येईल.
गेल्या 2 महिन्यांच्या काळात एमडीएलने प्रकल्प-75 अंतर्गत तीन पाणबुड्यांचे वितरण केले आहे. यातील सहाव्या पाणबुडीच्या सागरी चाचण्यांची सुरुवात हा या प्रकल्पाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. आत्मनिर्भर भारत प्रत्यक्षात साकारण्याला मोठी चालना मिळत असल्याचेच हे निदर्शक आहे, असे मानले जाते. या वाघशीर, पाणबुडीतील प्रॉपल्शन प्रणाली, शस्त्रात्रे तसेच संवेदके यासह सर्व यंत्रणांना आता अत्यंत कठोर सागरी चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे.