Homeकल्चर +जय-रूद्रसोबत डोरा, सिरी,...

जय-रूद्रसोबत डोरा, सिरी, निमोही ठरतेय राणी बागेतले आकर्षण

मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान-प्राणिसंग्रहालयात म्हणजेच पूर्वीच्या राणीच्या बागेत जय आणि रुद्र, या वाघांच्या बछड्यांचा रूबाब पाहण्याबरोबरच पर्यटक तिथल्या पेंग्विन कक्षात बागडणाऱ्या डोरा, सिरी, निमो, या पेंग्विनच्या पिलांना बघण्याचा नंद लुटत आहेत.

११ मेपासून प्रशासनाने पर्यटकांना शक्ती आणि करिश्मा या वाघांच्या जोडीने सहा महिन्यांपूर्वी जन्म दिलेले नर बछडे जय व रूद्र पाहण्याकरीता मोकळे केले. त्याचबरोबर प्रशासनाने तीन ते आठ महिन्यांपूर्वी जन्मलेले आणखी तीन पेंग्विनदेखील पेंग्विन कक्षात सोडले. त्यामुळे पर्यटकांना आता तेथे १५ पेंग्विनची पाहता येतील.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील वाघांचे आणि पेंग्विनचे कुटूंब विस्तारले आहे. रॉयल बेंगॉल टायगरच्या जोडीने म्हणजेच शक्ती आणि करिश्माने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी दोन बछड्यांना जन्म दिला होता, तर पेंग्विन कक्षातही पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन गोंडस पिले जन्माला घातली. या नव्या पाहुण्यांमुळे वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय अधिक समृद्ध झाले आहे.

सध्या उन्हाळी सुट्या असल्याने दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक पालिकेच्या या उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट देत आहेत. त्यातील अनेकांना वाघ शक्ती आणि वाघीण करिश्मा यांना पाहण्याची खूप उत्सुकता असते. मागील काही वर्षांपासून प्राणिसंग्रहालयात आलेले पेंग्विन पाहण्यासाठीदेखील पर्यटक येतात. आता या दोन्ही ठिकाणी आलेल्या पाहुण्यांमुळे पर्यटकांची ही सफर यादगार ठरणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातून १२ फेब्रुवारी २०२० रोजी शक्ती वाघ (वय ७ वर्षे) आणि करिश्मा वाघीण (९ वर्षे) या जोडीला वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात आणले आहे. करिश्मा वाघीणने गत वर्षी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी दोन रुबाबदार नर बछड्यांना जन्म दिला. तेव्हापासून करिश्मा आपल्या दोन्ही बछड्यांना एकेक धडे देत त्यांचे पालन करीत आहे. आता या दोन्ही बछड्यांचे वय ६ महिने झाले आहे. दोन्ही बछडे त्यांच्या आवारात सैर करीत असतात. पुढील दीड ते दोन वर्षे या बछड्यांना करिश्मासोबतच ठेवण्यात येणार आहे.

प्राणिसंग्रहालयातील वैद्यकीय पथकाने जय आणि रुद्रची काळजी घेत त्यांचे वेळोवेळी लसीकरण आणि इतर महत्त्वाच्या तपासणी केल्या आहेत. सध्या हे दोघे लहान असल्याने त्यांच्यासाठी खाद्यगृहाचे दरवाजे खुले ठेवलेले असतात. तसेच जो मांसाहार करिश्माला पुरविला जातो तोच जय आणि रुद्रला दिला जात आहे. हे बछडे आणि करिश्मा तळ्यात आणि हिरवळीवर सैर करतात. आता पर्यटकांना एक दिवसाआड जय आणि रुद्रसह करिश्माला तर दुसऱ्या दिवशी शक्तीला पाहण्याचा आनंद घेता येणार आहे, असे उपायुक्त (उद्याने), किशोर गांधी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उपअधीक्षक तथा पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल राऊळ यांनी सांगितले.

प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षातील पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक अशा तीन पिलांना जन्म दिला आहे. त्यामुळे पेंग्विनची संख्या वाढून आता एकूण १५ झाली आहे. पेंग्विन कक्षात सध्या नर आणि मादी अशा चार जोड्या आहेत. त्यात डोनाल्ड आणि डेझी या जोडीने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी डोरा (मादी), मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने २ ऑक्टोबर २०२२ रोजी सिरी (मादी) तर पपाय आणि ऑलिव्ह या जोडीने १३ डिसेंबर २०२२ रोजी निमो (नर) अशा तीन पिलांना जन्म दिला. ओरिओ आणि बबल या पेंग्विन जोडीला अद्याप पिलांची प्रतीक्षा आहे.

सध्या डोरा, सिरी आणि निमो यांना प्राणिसंग्रहालयातील डॉ. मधुमिता काळे आणि त्यांचे वैद्यकीय पथक मायेची उब देत आहे. या पिलांना मासे, खासकरून बोंबील आहारात देण्यात येत आहेत. पिले लहान होती तेव्हा त्यांचे आई-वडीलच त्यांना भरवत होते. मात्र आता ही पिले स्वतः तळ्यात आणि तळ्याकाठी बागडत असतात. प्राणिसंग्रहालयातील वैद्यकीय पथक त्यांची काळजी घेत आहे. अधूनमधून त्यांचे जन्मदातेही या तळ्यात पिलांसोबत पहुडलेले दिसून येतात. डोरा, सिरी आणि निमो यांनादेखील पाहणे आता पर्यटकांना शक्य होणार आहे.

सध्या प्राणिसंग्रहालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, संग्रहालयातील प्राणी यामुळे बाहेर येण्यास दचकतात. तसेच काही हौशी पर्यटक संग्रहालयातील प्राण्यांचे लक्ष वेधून घेण्याच्या नावाखाली काचेवर दणके मारतात, यामुळे प्राण्यांच्या रोजच्या राहणीमानात व्यत्यय येतो. पर्यटकांनी उत्साहात कोणताही नियमभंग करू नये, असे आवाहन प्राणिसंग्रहालय प्रशासनाने केले आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content