Homeकल्चर +उपायुक्त उल्हास महालेंना...

उपायुक्त उल्हास महालेंना संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी पुरस्कार

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सेवा बजावत असताना छंद म्हणून असलेली संगीतविषयक आवड जपत संगीत क्षेत्रात मागील वीस वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास (संजय) महाले यांना दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने “संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान” हा पुरस्कार प्रदान करून नुकतेच गौरविण्यात आले.

दादासाहेब फाळके मेमोरियल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष तथा चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर आणि नातसून मृदुला पुसाळकर यांच्या हस्ते प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर येथे समारंभपूर्वक महाले यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, तैलचित्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्रसिद्ध संगीतकार तथा गायक डॉ. सलील कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर आणि मुंबई महापालिकेतील विविध अधिकारी आणि महाले यांचे चाहते याप्रसंगी उपस्थित होते.

पुरस्कार प्रदान करताना चंद्रशेखर पुसाळकर म्हणाले की, उल्हास महाले यांनी पालिकेत सेवा पत्करली असली तरी त्यांनी आपली संगीत क्षेत्रातील आवड, छंद फक्त जपला नाही तर ती विकसित केली. मागील वीस वर्षांहून अधिक काळ वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांनी संगीत क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. संगीत आणि साहित्य क्षेत्रातील महाले यांचा अतिशय गाढा अभ्यास आहे. मुंबई महापालिकेसारख्या अतिशय मोठ्या संस्थेत सेवा बजावताना संगीत क्षेत्रातदेखील त्यांनी तितक्याच तन्मयतेने योगदान दिले आहे. अशी उदाहरणे अतिशय दुर्मिळ असून त्यांचा सन्मान करणे हे फाउंडेशन आपले कर्तव्य समजते, त्याच भावनेतून महाले यांचा गौरव केला.

सत्काराला उत्तर देताना उल्हास महाले यांनी नमूद केले की, संगीत ही आवड म्हणून, पॅशन म्हणून कसोशीने जपली आहे. ताणतणावातून मुक्ती देणारे संगीत व्यापक व्यासपीठावर नेऊन, त्याआधारे इतरांना शक्य होईल तेवढी संधी देत या क्षेत्रातदेखील वावरतो आहे. पालिकेच्या माध्यमातून कर्तव्य बजावताना जसे जसे शक्य झाले तसा तसा वेळ काढून संगीत दिग्दर्शन, सांगीतिक कार्यक्रम, लघुकथा दिग्दर्शन, पटकथा इत्यादी भूमिका बजावल्या. संगीत रचनेची आवड जपत १००हून अधिक गझल, कविता लिहिल्या आहेत. त्यासाठी कुटुंबाचीदेखील मोलाची साथ मिळाली. तसेच गेल्या २० ते २५ वर्षांत संगीत व चित्रपटसृष्टीतील अनेक लहानमोठ्या व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळाली. यापूर्वीदेखील मी निर्मिती केलेल्या “आरसा” या लघुपटाला दादासाहेब फाळके सन्मान मिळाला होता. आज चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा सन्मान दुसऱ्यांदा मिळाला, हे मी माझे भाग्य समजतो.

या सन्मान सोहळ्याप्रसंगी कॅनव्हास थिएटर्स यांच्या वतीने स्वर साद, हा मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. डॉ. सलील कुलकर्णी, जयदीप बगवाडकर, केतकी भावे-जोशी यांनी एकाहून एक सुरेल गीत सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, गायिका गौतमी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

उल्हास महाले यांची मुलाखत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, गायिका गौतमी देशपांडे यांनी घेतली आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्व रसिकांसमोर उलगडले. संगीत हे माझे पॅशन असून ते छंद म्हणून जोपासतो. वेळेच्या बाबतीत मी काटेकोर असून गाण्यासाठी माझी आखणी ही नियोजन बद्ध असते. कार्यक्रम १०० टक्के यशस्वी होण्यासाठी तीन महिने आधी तयारी करतो. पालिकेत विविध जबाबदाऱ्या पार पाडताना कामातदेखील मी त्याच तन्मयतेने काम करतो असे त्यांनी आवर्जून सांगितले. पुढच्या वर्षी पालिकेच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर चित्रपट काढण्याचा आणि संगीत क्षेत्रात सतत नवनवीन उपक्रम राबवणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त आपल्या मुलाखतीत व्यक्त केला.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content