Homeएनसर्कल३० व ३१...

३० व ३१ जानेवारीला निम्म्या मुंबईत पाणी नाही!

भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विविध कामांमुळे येत्या ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबई महापालिकेच्या २४ विभागांपैकी १२ विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद तर इतर २ विभागातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे, असे मुंबई महापालिकेचे जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी जाहीर केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला विविध नागरी सेवासुविधा देणारी पालिका मुंबईकरांना पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, यासाठीदेखील अव्याहतपणे कार्यरत असते. मुंबईकरांना करण्यात येणारा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीतपणे व्हावा, यासाठी पालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे आणि पाणीपुरवठा प्रकल्प खात्याद्वारे पाणीपुरवठाविषयक सुधारणांची तसेच परिरक्षणाची विविध कामे वेळोवेळी हाती घेतली जातात. याच कामांचा भाग म्हणून भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम पालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जलवाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामे हाती घेतली  जाणार आहेत. त्यामुळे हा पाणीपुरवठा होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या ९ विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल विभागातील अनेक भागांतदेखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. याव्यतिरिक्त ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ या २ विभागातील माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात ३० व ३१ जानेवारी २०२३ रोजी २५ टक्के कपात करण्यात येणार आहे. धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ या दरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी २०२३ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा अधिक सुरळीतपणे व चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी ही कामे हाती घेतली जात आहेत. या कामांमुळे २९ जानेवारी २०२३ तसेच ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान पालिकेच्या या विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तरी पाणीपुरवठा खंडित असण्याच्या कालावधीत व पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याच्या कालावधीदरम्यान नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

Continue reading

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना अजून शासकीय ई-मेलच नाही?

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अनेक आघाड्यांवर जोरदार कार्यरत असले तरी राज्य सरकारने त्यांना तसेच या विभागाच्या प्रधान सचिवांना शासकीय ई-मेलच दिला नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी हिंदू मंदिर संवर्धन अभियान, मुंबई सांस्कृतिक...

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....
Skip to content