Homeकल्चर +विद्या बालनने केले...

विद्या बालनने केले सुधारक ओलवेंच्या ‘लावणी’ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन

मुंबईतल्या भायखळ्याच्या ‘नाइन फिश आर्ट गॅलरी’मध्ये कलात्मकतेने मांडण्यात आलेल्या, सुप्रसिद्ध सोशल डॉक्युमेंटरी फोटोग्राफर सुधारक ओलवे यांच्या ‘लावणी’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन ख्यातनाम अभिनेत्री विद्या बालन यांच्या हस्ते नुकतेच एका अतिशय मनोरम्य अशा लावणीसंध्येमध्ये झाले.

सुमारे दोन दशकांच्या काळात वारंवार सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथील संगीतबारी थिएटरला व तेथील लावणी कलावंतांच्या निवासांना भेट देऊन लावणी कलावंतांच्या जीवनाचे वास्तव सुधारक ओलवे यांच्या कॅमेऱ्याने अतिशय संवेदनशीलतेने टिपले. महाराष्ट्रभरात व सर्वसाधारणपणे जगाच्या कोपऱ्यात जिथे कुठे मराठी माणूस असेल तिथे-तिथे त्याच्या मनात लावणीविषयीचे प्रेम अजूनही टिकून असले तरी प्रत्यक्षात पारंपरिक लावणी व ती सादर करणाऱ्या कलाकारांची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आधुनिक काळात मनोरंजनाच्या बदलत्या संकल्पनांच्या रेट्यात लावणीचा पारंपरिक बाज टिकवून ठेवणे या कलावंतांसाठी दिवसेंदिवस कठीण होत चालले असून सोबतच अन्य सामाजिक बदलही त्यांच्या विवंचनांमध्ये भरच टाकत आहेत. त्यांचे हे विषण्ण करणारे वास्तव ओलवे यांनी आपल्या छायाचित्रांमधून नेमकेपणाने मांडले आहे.

संवेदनशीलतेने टिपलेल्या या छायाचित्रांचे उद्‌घाटन बॉलिवुडच्या प्रस्थापित ग्लॅमरस व्यवस्थेच्या विरोधात आपले स्वत्व जपत ठामपणाने उभ्या राहणाऱ्या विद्या बालन यांच्यासारख्या अभिनेत्रीच्या हस्ते होणे हा अतिशय समर्पक असा योग होता. विद्या बालन यांनी स्वत:ही एका चित्रपटात ‘मला जाऊ दे ना…’ ही लावणी सादर केलेली असल्यामुळे की काय, कार्यक्रमात लावणीसम्राज्ञी वैशाली काळे-नगरकर आणि त्यांच्या पथकाच्या लावण्यांचा त्यांनी अतिशय मनापासून आस्वाद घेतला.

विद्या बालनच नव्हे तर कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रसिद्ध भजनगायक अनुप जलोटा, पार्श्वगायक रूपकुमार राठोड, उद्योजक परवेज दमानिया, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह कित्येक दूतावासांचे अधिकारी व कलाविश्वातील मान्यवर या पारंपरिक लावणी सादरीकरणात अगदी रंगून गेले होते. अपेक्षेपेक्षा अधिकच गर्दी झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांच्या फर्माईशींनुसारही काही लावण्या वैशाली काळे-नगरकर यांनी सादर केल्या.

कृष्णधवल छायाचित्रांचे ‘लावणी’ हे प्रदर्शन येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसात या वेळेत खुले असणार आहे. भायखळा पूर्व येथील राणी बागेनजीकच्या न्यू ग्रेट ईस्टर्न मिल कम्पाऊंडमध्ये नाइन फिश आर्ट गॅलरी आहे. तेथे छायाचित्रांची विक्रीही केली जाईल.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content