भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरीता मुंबई महापालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी सुसज्ज नागरी सेवासुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविधस्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्यसेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून समाजमाध्यमांद्वारेदेखील थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान व चैत्यभूमी इत्यादी ठिकाणी करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचे नियोजन व अंमलबजावणी प्रामुख्याने पालिकेच्या जी उत्तर विभागाद्वारे करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती देताना जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना काही काळ विश्रांती घेता यावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून सदर परिसरातील पालिकेच्या ६ शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्येदेखील आवश्यक त्या सर्व नागरी सेवासुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
पालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहितीपुस्तिका प्रकाशित करण्यात येते. प्रतिवर्षी या पुस्तिकेच्या १ लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्यभूमी येथे करण्यात येते. यावर्षीच्या पुस्तिकेचे प्रकाशन सोमवार, दि. ५ डिसेंबर, २०२२ रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

पालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वेस्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश आहे.
• चैत्यभूमी येथे शामियाना व व्ही.आय.पी. कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था.
• चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या ३ ठिकाणी रुग्णवाहिकेसहीत आरोग्यसेवा.
• १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा.
• छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) व परिसरात पुरेशा संख्येतील फिरती शौचालये.
• रांगेत असणाऱ्या अनुयायांसाठी पुरेशा संख्येतील फिरती शौचालये.
• पिण्याच्या पाण्याच्या नळांची व्यवस्था.
• पिण्याचे पाणी असणाऱ्या टँकर्संचीही व्यवस्था.
• संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था.
• अग्निशमन दलामार्फत आवश्यक ती सेवा.
• चौपाटीवर सुरक्षारक्षकासहीत बोटीची संपूर्ण परिसरात व्यवस्था.
• मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण.
• फेसबुक, ट्विटर, यूट्यूब या समाजमाध्यमांवर असणाऱ्या पालिकेच्या अधिकृत खात्यांद्वारे दि. ६ डिसेंबर रोजी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था.
• विचारप्रवर्तक पुस्तकांसह वैविध्यपूर्ण बाबींच्या विक्रीसाठी स्टॉल्स्ची रचना.
• दादर (पश्चिम) रेल्वेस्थानकाजवळ आणि एफ उत्तर, चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर (पूर्व) स्वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण व माहिती कक्ष.
• राजगृह येथे नियंत्रण आणि वैद्यकीय कक्ष.
• स्काऊट गाईड हॉल येथे भिक्कू निवासाची व्यवस्था.

• मैदानात धुळीचा त्रास रोखण्यासाठी पायवाटांवर आच्छादनाची व्यवस्था.
• अनुयायांना मार्गदर्शनाकरीता १०० फूट उंचीचे चैत्यभूमी परिसर येथे निदर्शक फुग्यांची व्यवस्था.
• भ्रमणध्वनी चार्जिंगकरीता शिवाजी पार्क येथे पॉइंटची व्यवस्था.
• फायबरच्या तात्पुरत्या स्नानगृहाची व तात्पुरत्या शौचालयांची पुरेशा संख्येने व्यवस्था.
• रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत असलेल्या बाकड्यांची व्यवस्था.
• छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) व्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथेदेखील तात्पुरत्या निवाऱ्यांसह पुरेशा संख्येने फिरती शौचालये.
• स्नानगृहे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व अनुयायांना नागरी सेवासुविधा देण्यासाठी पालिका सुसज्ज आहे. अनुयायांनी या सेवासुविधांचा लाभ घ्यावा. तसेच पालिका व मुंबई पोलिस इत्यादींद्वारे देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चहल यांनी केले आहे.

खाद्यपदार्थ वितरण समन्वयासाठी अवगत करा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (दिनांक ६ डिसेंबर २०२२) महाराष्ट्र व इतर राज्यांतून येणाऱ्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. येथे येणाऱ्या अनुयायांना अनेक सामाजिक संस्थांमार्फत खाद्य वितरण करण्यात येते. सदर इच्छुक संघटना / संस्था / व्यक्ती यांच्यातर्फे प्राचार्य एम. एम. पिंगे चौक, राजाबढे चौकलगत, ट्रॉफिमा हॉटेलच्या बाजुला छत्रपती शिवाजी महाराज मैदान, एस. एच. परळकर मार्ग (विष्णू निवासजवळ) आणि पद्माबाई ठक्कर, वेस्ट साईडच्या मागे अनुयायांना खाद्यपदार्थ वितरित करण्यात येईल. संबंधित संघटना / संस्था / व्यक्तींनी पालिकेच्या जी उत्तर विभाग (सहायक अभियंता परिरक्षण) व छत्रपती शिवाजी महाराज मैदान, पोलिस ठाणे (मुंबई) यांना ४ डिसेंबर २०२२पूर्वी लेखी स्वरुपात अवगत करावे, जेणेकरुन सदर कामादरम्यान अन्न सुनियंत्रित पद्धतीने वितरण करणे, वितरणाकरीता येणाऱ्या वाहनांचे नियंत्रण करणे, तसेच सुयोग्यप्रकारे कचरा संकलन करणे इत्यादी बाबींचे उचितप्रकारे नियोजन करणे व त्यानुसार अंमलबजावणी करणे शक्य होईल, असेदेखील सहायक आयुक्त सपकाळे यांनी सांगितले.

