महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती शिवरायांची जयंती तारखेने नव्हे तर तिथीने करायला हवी, अशी भूमिका घेतली आहे. शिवसेनेचीही वर्षानुवर्षे तीच भूमिका आहे. पण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने त्यांना सरकारी शिवजयंती म्हणजे १९ फेब्रुवारीची शिवजयंतीदेखील साजरी करावीच लागते.
अलीकडेच पुण्यात झालेल्या मनसेच्या वर्धापनदिन विशेष जाहीर सभेत राज ठाकरे यांनी शिवजयंती दिवाळीसारखी आहे. आपले पाडवा, गुढी पाडवा हे सण आपण तारखेने नाही तर तिथीने साजरी करतो. त्यामुळे त्याच्या तारखा दरवर्षी वेगळ्या असतात. त्याप्रमाणेच शिवजयंती हीदेखील अशाच सणासारखी असून ती तिथीनेच साजरी व्हायला हवी, हे स्पष्टपणाने सांगितले.
पण सत्ता भल्याभल्यांना वाकवते किंवा लवचिक बनवते. याची प्रचिती सध्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात येतच आहे. वर्षानुवर्षे तिथीनेच शिवजयंतीचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपुढे हा ठाकरी बाणा सोडावा लागल्याचे सोमवारी विधानसभेत स्पष्ट झाले.
या तिरपागड्या महाविकास आघाडी सरकारला जन्माला घातलेय ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी. अर्थात, त्यातला एका सुईणीचा रोल संजय राऊत यांनीही बजावला आहेच. पण प्रत्यक्ष विधानसभेत काही बाका प्रसंग उद्भवला तर मात्र धडाडीने काम करणारे अजित पवार आपल्या मुत्सद्देगिरीची साक्ष पटवतात, याचे प्रत्यंतर सोमवारी विधानसभेत आले. त्यामुळे वेगळे वळण लागू शकले असते अशा तिथीने शिवजयंतीचा गुंतागुंतीचा पारंपरिक विषय अजित पवारांनी हलक्या हाताने सहजतेने सोडवला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात आले नाहीत. पण सभागृहाबाहेरच्या शिवजयंती कार्यक्रमांना त्यांनी ऑनलाईन का होईना, उपस्थिती लावली. विधानभवनाच्या आवारातल्या सिंहासनारूढ शिवपुतळ्याला वर जाऊन अभिवादन करणे मुख्यमंत्र्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शक्य नव्हते. पण विधानभवनाच्या आत लिफ्टजवळ शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील शिवजयंती कार्यक्रमालाही उपस्थिती लावली.

भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय उपस्थित केला. मुख्यमंत्री ठाकरे तिथीने साजऱ्या केल्या जात असलेल्या शिवजयंतीला उपस्थिती लावतात, आणि तिथीने शिवजयंती साजरी करतात. पण ज्या सरकारचे ते प्रमुख आहे, ते सरकार मात्र सरकारी पातळीवर १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करतात. त्यामुळे आजही शिवजयंती सरकारने साजरी करायला हवी आणि ही द्विधा वा गोंधळाची स्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बाजू लावून धरली आणि सरकारी शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच असते, हे ठणकावून सांगितले. काही वर्षांपूर्वी रामकृष्ण मोरे मंत्री असताना त्यांनी शिवजन्माची तारीख निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालानंतर सरकारी पातळीवर १९ फेब्रुवारी १९३० ही शिवजन्माची तारीख निश्चित झाल्यामुळे सरकारी पातळीवर १९ फेब्रुवारीला दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते, असे पवार यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री ठाकरे शिवजयंतीला उपस्थित आहेत ते शिवसेनाप्रमुख म्हणून, असे सांगून अजित पवार म्हणाले की, शिवसेना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून तिथीने शिवजयंती साजरी करते. त्यामुळे ते शिवसेनाप्रमुख म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. या विषयावरून अनाठायी वादविषय करू नये, असे आवाहनही पवार यांनी सर्व सदस्यांना केले आणि छत्रपती शिवाजी महाराज हे या राज्यातल्या सर्व नागरिकांसाठी दैवतच आहेत, असेही सांगितले. त्याबरोबरच मुनगंटीवार पाच वर्षे अर्थमंत्री असताना आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असतानाही केवळ तारखेनेच सरकारने शिवजयंती साजरी केलेली आहे, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.
शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत येण्याआधी विधानभवनाच्या आवारात असलेल्या शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला अभिवादन करूनच सर्व नेते विधानभवनात आल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना टोमणा मारत टिप्पणी केली की, सर्वच सदस्यांनी या पुतळ्याला उन्हात जाऊन अभिवादन केले तर काय त्रास होतो का… त्यावर सुनील प्रभू यांनी शिवराय हा एक दिवस नाही तर ३६५ दिवस जयंती साजरी करण्याचा विषय आहे, असे ठणकावले.

