आपल्याला पोलिसांनी काल एक प्रश्नावली पाठवली होती. त्यावर आपण उत्तर द्यायला पोलिसांसमोर येतो, असे जाहीर केले. त्यानंतर पोलिसांनीच आपण उद्या घरी येत असल्याचे कळवले. आज त्याप्रमाणे पोलीस चौकशीसाठी आले होते. यावेळी त्यांनी जी प्रश्नावली आपल्याला दिली त्यात आणि पाठवलेल्या प्रश्नावलीत मोठा फरक होता, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.
आधी आपल्याला साक्षीदाराप्रमाणे प्रश्न पाठवण्यात आले होते. आज त्यांनी आपल्याला आरोपी किंवा सहआरोपी करण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारले. आपल्या अधिकाराचा जराही वापर न करता आपण त्यांना उत्तरे दिली. सरकारमधल्या लोकांचे दाऊदबरोबर असलेले संबंध उघड करणे, भाजपाच्या नेत्यांविरूद्ध रचलेल्या षडयंत्राचा भंडाफोड करणे, असले प्रकार घडू नये म्हणून हा प्रयत्न चालू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
गोपनीयतेचा भंग नवाब मलिकांकडूनच
गेल्या काही दिवसांपासून विधानसभेत आपण सरकारला उघडे पाडत असल्यामुळे चवताळलेल्या राज्य सरकारने आपल्याला गोपनीय कायद्याचा भंग केल्याच्या आरोपाखाली गोवण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु त्यांचा हा मनसुबा पूर्ण होणार नाही. कारण, गोपनीय कायद्याचा भंग केल्याचा गुन्हाच दाखल करायचा असेल तर तो त्यांच्या सरकारमधले मंत्री नवाब मलिक यांच्यावरच दाखल व्हायला हवा. कारण या बदली कांडातला संवाद त्यांनीच प्रसिदधीमाध्यमांकडे दिले, असा पलटवारही त्यांनी केला.
बदली कांडाचा अहवाल ६ महिने दाबून ठेवला
या राज्यात कोट्यवधी रूपयांचे बदली कांड होत असल्याचा अहवाल सरकारने सहा महिने दाबून ठेवला. आपण हे कांड उघडकीस आणले. राज्य सरकारच हा अहवाल दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे तसेच आयपीएस अधिकारी यात गुंतले असल्यामुळे आपण या संदर्भातले सर्व पुरावे योग्य अशा अधिकाऱ्याकडे, केंद्रीय गृहसचिवांकडे सादर केले. उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले. आपण या प्रकरणाचे फक्त कव्हरिंग लेटर प्रसिद्धीमाध्यमांसमोर आणले. संपूर्ण प्रकरण संवेदनशील असल्यामुळे यातला संवाद उघड केला नाही. परंतु संध्याकाळी नवाब मलिक यांनीच हा संवाद माध्यमांसमोर आणला. त्यामुळे गुन्हा दाखल करायचाच असेल तर तो मलिकांविरूद्ध व्हायला हवा. मला हे कांड उघड केल्याबद्दल संरक्षण मिळायला हवे, असे ते म्हणाले.
अनेक पुरावे आपल्याकडे
षडयंत्राच्या आरोपावर गृह मंत्री काय उत्तर देणार याची आपल्याला कल्पना आली आहे. परंतु सीबीआय चौकशीची मागणी आपण सोडणार नाही. सादर केलेल्या पुराव्यांव्यतिरिक्त अनेक पुरावे आपल्याकडे आहेत. आपण त्याआधारे न्यायालयात जाऊ, असेही त्यांनी सांगितले.
मी पुन्हा येईन, असे म्हटले नाही
चौकशीनंतर पोलिसांनी पुन्हा येणार असल्याचे सांगितले का, असा सवाल करताच मी पुन्हा येईन, असे ते म्हणाले नाहीत, असे फडणवीस यांनी सांगताच एकच हंशा पिकला. आपण चौकशीला घाबरत नाही हे आपल्या कृतीवरूनच राऊत यांना कळले असेल. उलट तेच रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन मला का बोलावतात, मला का बोलावतात, असा सवाल करतात, असेही ते म्हणाले.

