‘लवासा’प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने, ही राष्ट्रीय संपत्तीची लूट असून यामध्ये पवार कुटुंबियांचा सक्रिय सहभाग असल्याबाबत गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याची भूमिका स्पट करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार आज एका पत्रकार परिषदेत केली.
काही दिवसांपूर्वी लावासा प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला व निष्कर्ष स्पष्ट केले आणि निरिक्षणे नोंदवली. हा निकाल, निष्कर्ष आणि निरिक्षणे राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी वाचली असतील अशी अपेक्षा आहे. न्यायालय म्हणते की लवासामध्ये राजकीय मनमानी आहे, सत्तेचा दुरूपयोग आहे, प्रशासकीय हलगर्जीपणा आहे, पवार कुटुंबियांचा सक्रिय सहभाग आहे, तसेच राष्ट्रीय संपत्तीची लूट आहे. या कामात पारदर्शकतेचा अभाव आहे, व्यक्तीगत स्वारस्य आहे, कर्तव्य निभावताना हलगर्जीपणा आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत, असे ते म्हणाले.

लवासा ही संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आहे. व्यक्तीगत स्वारस्य खासदार सुप्रिया सुळे यांचे आहे तर कर्तव्य निभावताना परवानग्यांमध्ये निष्काळजीपणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींचे विषय अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे या विषयाकडे सरकारचे लक्ष आहे का, या विषयाशी संबंधित असलेले मंत्री आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.
नवाब मलिक यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांशी थेट आर्थिक व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा. देव, देश आणि धर्मासाठी आता बोलून नाही तर करून दाखवा, असे जाहीर आवाहन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यावेळी केले.
मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दबावासमोर झुकू नये. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मर्जीतील पोलीस आयुक्त नियुक्त केले आहेत. त्यामुळे थेट पोलीस आयुक्तांना आदेश द्यावेत आणि दाऊद हस्तक आणि त्यांचा राजकीय वरदहस्त असलेल्या नवाब मलिक यांच्यासारख्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही शेलार यांनी केली.
सरकारची भूमिका आणि प्रथमिकता कोणती?
राज्यातील आघाडी सरकारची प्रथमिकता कोणती आणि न्यायीक भूमिका कोणती हे कळायला मार्ग नाही. मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले तर त्यांचा राजीनामा घेण्यात आला तर त्यापेक्षा भयंकर आरोप नवाब मलिक यांच्यावर झाले, पण त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. आझाद मैदानात आमचे छत्रपती संभाजीराजे उपोषणाला बसले त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडेपर्यंत सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्यासाठी टाहो फोडायला सगळे मंत्रीमंडळ एकवटले. हे ठाकरे सरकार आडनावे बघून भूमिका घेते का? काही विशिष्ट समाजातील विशिष्ट आडनावाच्या माणसांची विशेष काळजी सरकार घेते का?, असा सवालही आशिष शेलार यांनी केला.

