राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर मलिक यांना समर्थन देण्यासाठी मविआचे नेते व कार्यकर्ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जमा झाले खरे, पण सर्वांना उत्सुकता राहिली ती शिवसेनेच्या सहभागाची. अखेर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई धरण्यात सहभागी झाले आणि साऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर काल या आंदोलनाची घोषणा केली होती. त्याप्रमाणे सकाळी १० वाजता राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते म. गांधी यांच्या पुतळ्यासमोर हजरही झाले. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे मंत्री घटनास्थळी दाखल झाले. परंतु शिवसेनेच्या कोणा मंत्र्यांचा थांगपत्ता लागेना. नाही म्हटले तर शिवसेनेचे आमदार सुनील राऊत आणि प्रा. मनीषा कायंदे तेव्हढ्या आंदोलनात सहभागी झाल्या. शिवसेनेचे बहुतांश मंत्री त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री प्रकृतीच्या कारणास्तव आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणारच नव्हते. शरद पवार वयोमानामुळे सहभागी झाले नाहीत. आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. अनिल परब भराडीदेवीच्या आंगणेवाडी जत्रेसाठी सिंधुदूर्गात होते. त्यामुळे या आंदोलनात शिवसेना आहे की नाही, अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा लगबगीने उद्योगमंत्री सुभाष देसाई आंदोलनात सहभागी झाले आणि उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
नवाब मलिक जिंदाबाद… ईडी मुर्दाबाद…
नवाब मलिक जिंदाबाद… ईडी मुर्दाबाद… मोदी सरकार हाय हाय… मोदी सरकार चोर है… महाराष्ट्र लढेगा मोदी हारेगा… महाराष्ट्र ना कधी दिल्लीसमोर झुकला ना कधी झुकणार… आवाज कुणाचा महाविकास आघाडीचा.. अशा जोरदार घोषणा व फलक फडकावत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी, पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयाजवळचा महात्मा गांधी पुतळा परिसर दणाणून सोडला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसेपाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक, नगरसेवक कप्तान मलिक, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, सुभाष देसाई, सुनील राऊत, मनीषा कायंदे, सचिन अहिर, यामिनी जाधव, योगेश कदम, विनोद घोसाळकर आदी यात सहभागी झाले होते. एकूण पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते या आंदोलनात सहभागी झालेले दिसले. शिवसेनेकडून फक्त सुभाष देसाईच एकमेव मोठे नेते या आंदोलनात दिसले.
मलिकांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही : बाळासाहेब थोरात
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई केलेली आहे. केंद्र सरकारच्या ह्या दडपशाहीविरोधात आघाडी एकत्र लढा देत असून भाजपाला नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा आणि आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपाने आंदोलन केले पाहिजे, असे विधिमंडळ पक्षनेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.

