पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय राज्यमंत्री जोतिरादित्य सिंदीया, भूसेनाध्यक्ष (निवृत्त) जनरल व्ही. के. सिंग, भूसेनाध्यक्ष (निवृत्त) जनरल टी. एन. रैना, भूसेनाध्यक्ष (निवृत्त) जनरल दीपक कपूर, वायुसेनाध्यक्ष (निवृत्त) सुब्रतो मुखर्जी, वायुसेनाध्यक्ष (निवृत्त) एस. के. सरीन, मार्शल ऑफ दि एअर फोर्स अर्जन सिंह, नौसेनाध्यक्ष (निवृत्त) ॲडमिरल निर्मल कुमार वर्मा, कर्नल (निवृत्त) राज्यवर्धन सिंह राठोड, अनुपम खेर, अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, किरण बेदी, आर. माधवन्, सतीश लळीत…
शेवटचे नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल… या दिग्गजांच्या यादीत माझे नाव कसे… असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे. या मान्यवरांच्या पासंगालाही मी पुरणार नाही. तरीही या यादीत मी येऊन बसलो, याचे कारण आम्ही सगळे एका धाग्याने बांधले गेलो आहोत. तो धागा आहे राष्ट्रीय छात्र सेना किंवा ‘एनसीसी’चा. आम्ही सगळे भूतपूर्व कॅडेटस् म्हणजे छात्रसैनिक आहोत आणि National Cadet Corps Alumni Association (NCCAA) या संघटनेचे ओळखपत्रधारक आजीव सदस्य आहोत. या सर्वांनी आपल्या विद्यार्थीदशेत राष्ट्रीय छात्र सेनेत छात्रसैनिक म्हणून सेवा बजावलेली आहे.
मी सावंतवाडीच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील 2nd Maharashtra Naval Unit NCCचा १९७८ ते १९८१ या काळात सदस्य होतो. या काळात मी गोवा येथे Annual Training Camp, INS Bhavnagar या युद्धनौकेवर Sea Training Camp, INS Venduruthi या केरळमधील नौदल तळावर INS NAU Sainik Camp (Navy Attachment) असे कॅम्प केले. महत्त्वाची अशी ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालो. मला १९८०-८१ सालची महाराष्ट्र राज्य एनसीसी डायरेक्टोरेटची शिष्यवृत्तीही तेव्हाचे डायरेक्टर जनरल ब्रिगेडिअर व्ही. के. दांडेकर यांच्या हस्ते मिळाली होती.
‘एकता और अनुशासन’
‘एकता और अनुशासन’ असे बोधवाक्य असलेल्या एनसीसीने अनेकांच्या जीवनात विधायक बदल केले. देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा अधिक जागृत केली. आपणही देशासाठी, समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, काहीतरी करू शकतो, ही भावना जागी केली आहे. आज्ञापालन, शिस्त शिकवली आहे. माझ्या आयुष्यातही एनसीसीचे योगदान खूप मोठे आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह, सुषमा स्वराज, गोव्याचे माजी मुख्यमंत्री व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, ‘गोदरेज’चे चेअरमन आदी गोदरेज, प्रसिद्ध कार्डिऑलॉजिस्ट डॉ. नरेश त्रेहान, माजी मुख्य निवडणुक आयुक्त एम. एस. गिल हे मान्यवरही त्यांच्या विद्यार्थीदशेत एनसीसी छात्रसैनिक होते.
‘आजादी का अमृतमहोत्सवा’निमित्त राष्ट्रीय छात्र सेनेने आपल्या छत्राखाली केव्हा ना केव्हा योगदान दिलेल्या माजी कॅडेटसना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. हे व्यासपीठ म्हणजे ‘राष्ट्रीय कॅडेट कोअर पूर्व छात्र संघ’ किंवा National Cadet Corps Alumni Association (NCCAA). या संघटनेची नोंदणी करण्यात आली असून भूतपूर्व छात्रसैनिकांना ऑनलाईन अर्ज करुन व आवश्यक शुल्क भरुन यात सहभागी होता येते.

www.nccauto.gov.in या संकेतस्थळावर जाऊन यासाठी अर्ज करावा लागेल. त्यात आपलं युनिट, एनसीसी कॅडेट नंबर, एनसीसी कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या अचिव्हमेंटस यांची माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमच्या युनिटकडून खातरजमा केल्यावर तुम्हाला या संघटनेचा आजीव सदस्य करुन घेतले जाते. नोंदणी क्रमांक आणि एक आकर्षक ओळखपत्रही दिले जाते. भूतपूर्व छात्रसैनिक असलेले विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना NCCAA-1 या क्रमांकाचे ओळखपत्र देऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत देशभरातील एक लाखाहून अधिक माजी छात्रसैनिक या संघटनेशी जोडले गेले आहेत.
संघटनेची उद्दिष्टे
शिक्षण घेत असताना एनसीसीमध्ये सहभाग घेऊन लक्षावधी नागरिक त्यांच्या जीवनात पुढे गेले आहेत. कित्येकजण उच्च पदापर्यंत पोहोचले आहेत. आपापल्या क्षेत्रात त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण करुन राष्ट्रउभारणीच्या कार्यातही आपल्या परीने योगदान दिले आहे. या सर्वांचा अनुभव, त्यांची ज्येष्ठता याचा उपयोग राष्ट्रीय छात्र सेनेत सध्या कार्यरत असलेल्या छात्रसैनिकांना व्हावा, यासह अनेक उद्देश या संघटनेच्या स्थापनेमागे आहेत. हे उद्देश व ध्येय पुढीलप्रमाणे आहेत. माजी छात्रसैनिकांना एकत्र आणून त्यांची एकी मजबूत करणे, सामुदायिक विकास आणि राष्ट्रनिर्माणासाठी कार्यक्रम आखणे, त्यांच्याकडून सल्ला व मार्गदर्शन मिळवणे, प्रशिक्षण आणि क्रीडा याबाबतीत त्यांची मदत मिळवणे, ‘एनसीसीएए’ या संघटनेचा डेटाबेस तयार करुन तो सतत अद्ययावत करणे, छात्रसैनिकांची प्रगती व विकास यासाठी नोंदणीकृत माजी छात्रसैनिकांच्या अनुभवाचा वापर करणे, भविष्यातील उत्तम संधींबाबत छात्रसैनिकांना मार्गदर्शन मिळवणे, कौशल्य विकासाला चालना देऊन माजी छात्रसैनिकांच्या माध्यमातून छात्रसैनिकांना रोजगारयोग्य कौशल्य विकासाचे कार्यक्रम आयोजित करणे, संपूर्ण सामाजिक विकासामध्ये ‘एनसीसीएए’मध्ये नोंदणीकृत माजी छात्रसैनिकांचा सहभाग मिळविणे. अशा अनेक उद्देशांनी केंद्र सरकारने ही संघटना स्थापन केली आहे.
‘एनसीसीएए’ या संघटनेशी संलग्न असलेल्या माजी छात्रसैनिकांना संबंधित राज्य स्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावरील एनसीसीचे उपक्रम व कार्यक्रम यांना उपस्थित राहता येईल व सहभागी होता येईल. या संघटनेमार्फत दर सहा महिन्यांना बैठका, सभा, सेमिनार आयोजित केले जातील. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर माजी छात्रसैनिकांचा सत्कार केला जाईल. संघटना एक त्रैमासिक सुरू करेल. प्रशिक्षण, समाजसेवा आणि सामुदायिक विकासामध्ये सदस्यांना सहभागी करुन घेतले जाईल. अडचणीमध्ये असलेल्या माजी छात्रसैनिकांना मदत करण्याचे प्रयत्न केले जातील व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आत्मीयता गट स्थापन केले जातील.
तेव्हा तुम्ही जर माजी छात्रसैनिक असाल तर या संघटनेत नक्की सामील व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रातील तुमच्या अनुभवाचा फायदा सध्याच्या छात्रसैनिकांना करुन देण्याची एक उत्तम संधी ही संघटना तुम्हाला देत आहे. तिचा फायदा घ्या आणि राष्ट्रविकासाच्या कार्यात तुमचे योगदान पुढेही सुरू ठेवा. जय हिंद!

