सत्ताधारी तीन पक्षांच्या आघाडीला भारतीय जनता पक्षाने विधानसभेमध्ये नकलांना प्रतिआव्हान दिले आणि अखेर महाविकास आघाडीला, आमदार भास्कर जाधव यांना माफी मागा, असे सांगण्याची नामुष्कीची वेळ महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आली.
वास्तविक, ऊर्जा विभागाच्या लक्षवेधी सूचनेवरून सभागृहात उर्जामंत्री नितीन राऊत उत्तर देत होते. त्यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच्या एका तथाकथित विधानाबद्दलची माहिती सभागृहात दिली. ती देताना राऊत यांनी असा दावा केला की, देशाबाहेर असलेला काळा पैसा परत आणून देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या खिशात १५ लाख रुपये देऊ, असे मोदी यांनी म्हटले होते.
राऊत यांच्या विधानाला हरकतीच्या मुद्द्याद्वारे विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतला. विधानसभेच्या सभागृहात उपस्थित नसलेल्या व्यक्तींबद्दल उल्लेख करू नये, असा संकेत आहे आणि मोदी यांच्याविषयी बोलताना ते देशाचे पंतप्रधान आहेत, असा उल्लेख मंत्र्यांनी केलेला नाही, असा आक्षेप फडणवीस यांनी घेतला. तसेच मंत्रीमहोदय सांगताहेत तसे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी कधीच केलेले नाही, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
भास्कर जाधव यांनी मोदी यांनी तसे विधान केले होते, असा दावा करत मोदी यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर फडणवीस प्रक्षुब्ध झाले आणि त्यांनी भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यामुळे सभागृहातले वातावरण अचानक तणावपूर्ण झाले.
सभागृह दोनदा पंधरा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. तरीही भास्कर जाधव माघार घेत नव्हते. तेव्हा हे सभागृह आहे की तमाशाचा फड, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. जाधव यांना माफ केले तर सभागृहात कोणीही उठून अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांची नक्कल करेल आणि त्यात कोणी तोंड वाकडं करेल, कोणी आवाज हळू करून नक्कल करेल, असेही मुनगंटीवार म्हणाले.
जाधव यांना माफ केले तर इतरही सदस्य अशाच नकला इथे करतील आणि आम्हाला काय नकला करता येत नाहीत का, असं आव्हान देत फडणवीस म्हणाले की, असे झाले तर कोणत्याच पक्षाच्या नेत्यांची किंमत ठेवली जाणार नाही.
सरकार पक्षांच्या वतीने संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पीठासीन अधिकारी नरहरी झिरवळ यांनीही वातावरण निवळण्यासाठी प्रयत्न केले. पण, विरोधक ठाम राहिल्याने आणि इतरही नेत्यांच्या नकला करू, असा इशारा दिल्याने अखेर भास्कर जाधव यांना बिनशर्त माफी मागतो, असे जाहीर करावे लागले.
पंतप्रधान मोदी यांची नक्कल करण्याचा जाधव यांनी प्रयत्न केल्याने विरोधी पक्षाचे सदस्य विशेषतः फडणवीस प्रक्षुब्ध झाले होते. पण सुरुवातीला मंत्री जयंत पाटील यांनीही वातावरण निवळवण्यासाठी आपण जाधव यांनी केलेले अंगविक्षेप पाहिले नाहीत, असं विधान केलं. पण स्वतः जाधव यांनीच मी शब्द मागे घेतो आणि अंगविक्षेपही मागे घेतो, असं जाहीर करून सत्ताधारी पक्षाचीच गोची केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांची समजूत घातली आणि प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन या सभागृहात कोणत्याही नेत्याबद्दल अवमानकारक बाबी होणार नाहीत, हेच आमचेही मत आहे, असे सांगितले. त्यानंतर जाधव यांनी माफी मागितली.

