Homeटॉप स्टोरी‘शक्ती’ कायदा दूरच.....

‘शक्ती’ कायदा दूरच.. येथे ‘भक्ती’ उपक्रम!

एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात. काय चालले आहे महाराष्ट्रात? सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण, येथे सरकारमध्ये केवळ ‘भक्ती’ उपक्रम चालू आहे, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या एक दिवसाच्या बैठकीच्या समारोपाच्या भाषणात ते बोलत होते. हे कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे’चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणी पाहायला तयार नाही. राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध आणि अवैध रेती, अवैध दारू आणि सट्टा गावोगावी झाला आहे. महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच झाली नव्हती, असे ते म्हणाले.

आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट उभे आहे. सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामी नाही. त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही. अमरावतीत जे घडले ती कोणती साधी घटना नाही तर हा एक प्रयोग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अल्पसंख्याक समाजाला उभे करण्याचा हा प्रयत्न आहे. सावध व्हा. त्रिपुरात काय झाले? 26 ऑक्टोबरला बांगला देशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात त्रिपुरात रॅली निघाली. त्यानंतर 28 ऑक्टोबरपासून फेक न्यूज फॅक्टरीचे काम सुरू झाले. त्रिपुरा पोलिसांनी कारस्थान उघड केले. पण तरीही 8 नोव्हेंबरला काँग्रेसचे नेते राहुल गांधींचे ट्विट आले आणि मग प्रयोग सुरू झाला. हा हिंसाचार सरकार समर्थित होता. अमरावतीत एसआरपीच्या 7 तुकड्या होत्या. पण त्यांना कोणते आदेश दिले गेले नाहीत. त्यामुळे आझाद मैदानात जे झाले तो सेम पॅटर्न राबविला गेला. पोलिसांवर हल्ले झाले. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अटक झाली नाही. आमचे पोलीस काय मार खाण्यासाठी आहेत आहे का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विचारांचा नक्षलवाद आता नाही. आता तो दहशतवाद्यांशी निगडित आहे. भाजपचा कार्यकर्ता कधीही दंगल करीत नाही. आम्ही सर्वसमावेशकतेचे राजकारण करतो. पण लांगूलचालन करीत नाही. लांगूलचालन करणाऱ्या शक्तींना वाटत असेल की आता आपले सरकार आहे, तर आपण काहीही करू. पण भाजपचा कार्यकर्ता असे होऊ देणार नाही. कुणी अंगावर आले तर सोडणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मराठवाडा, विदर्भाच्या सर्व योजना बंद आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही. वैधानिक विकास मंडळे बंद आहेत. सिंचन, पाण्याच्या योजना बंद आहेत. शेतकऱ्यांची वीज बंद आहे. शाळा सुरू केल्या आणि लगेच शाळांच्या वीज कापल्या. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कर कमी केला, तर देशातील २५ राज्यांनी त्यात भर घातली. पण महाराष्ट्र मात्र काहीच करायला तयार नाही. हे म्हणतात उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. मंदिर बंद होते, पण दारू सुरू होती ना! त्यातून तुम्ही कमाई केलीच ना, असा सवालही फडणवीस यांनी व्यक्त केला.

छोटी-छोटी राज्य रडत नाहीत तर लढतात. महाराष्ट्रात मात्र रोज सकाळी नरेंद्र मोदींचे नाव घेऊन रडतात. बिल्डरांना सवलती देताना यांना जीएसटी आठवत नाही. गरिबांना, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटले की, जे पैसे टप्प्याटप्प्याने मिळत आहेत आणि मिळत राहतील त्या जीएसटीचे रडगाणे गातात. या महाविकास आघाडी सरकारने सर्वांसोबत विश्वासघात केला आहे. सामान्य माणसाची ताकद आता दाखविण्याची वेळ आली आहे. जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी लढायला मैदानात उतरण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

Continue reading

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...
Skip to content