धार्मिक ध्रुवीकरण करत यावेळी निवडणुका लढल्या गेल्या आणि त्याचा अनुभव देशाने घेतला. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी, हे समाजघटक विरोधात गेलेले असतानाही महायुतीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळेच ८२ हजाराचे मताधिक्य मिळाले हे माझ्या कामाचे फलित आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी दापोली येथील आभार सभेत कृतज्ञता व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळाले असले तरी काही मतदारसंघात आघाडी कमी मिळाली आहे. मात्र याची जी कारणे आहेत त्याचा विचार करुन पूर्ण क्षमतेने विधानसभा निवडणुकीत उतरायचे आहे. आपले उद्दिष्ट फक्त विधानसभा निवडणूक असता कामा नये तर आपल्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या पदावर बसवत नाही तोपर्यंत काम थांबवायचे नाही, असे तटकरे म्हणाले.
सर्वंकष नेत्यांचे पाठबळ या रायगड लोकसभा मतदारसंघात मला जसे लाभले तसे सर्वाधिक महिला मतदारांनी माझ्या विजयात तितकाच मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळेच घासून नाही तर ठासून निवडून आलो. कमी मताधिक्य जरी मिळाले असले तरी या मतदारसंघात काकणभर सरस काम केले जाईल असा शब्द त्यांनी दिला. जे समाजघटक या लोकसभा निवडणुकीत आपल्यापासून दूर गेले आहेत त्यांना आपल्याकडे नक्कीच आणण्याचा प्रयत्न करु आणि येणाऱ्या आव्हानाला ताकदीने सामोरे जाऊ असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.