आयटी क्षेत्रातील नियुक्तीने गेल्या वर्षाच्या एप्रिलच्या तुलनेत नोकरभरतीत २७ टक्क्यांची घट झाली. आयटी क्षेत्रातल्या मोठमोठ्या कंपन्या, स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न या सर्वांना सध्याच्या जागतिक मंदीचा परिणाम जाणवला आहे. बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे यासारख्या आयटीकेंद्रित कंपन्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असलेल्या शहरांना सर्वाधिक फटका बसला. आयटीव्यतिरिक्त बीपीओ, एडटेक व रिटेल अशा क्षेत्रांमध्ये अनुक्रमे १८ टक्के, २१ टक्के व २३ टक्के घसरण नोंदवली गेली.
नोकरी जॉबस्पीक इंडेक्स या भारतातील प्रमुख जॉब इंडेक्सने एप्रिल २०२३ मध्ये व्हाइट-कॉलर हायरिंगच्या वैविध्यपूर्ण स्थितीचे अनावरण केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात रिअल इस्टेट, बीएफएसआय या क्षेत्रांसह ऑईल अँड गॅस, विमा आदी क्षेत्रांमध्ये नोकर भरतीत चांगली वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. रिअल इस्टेट व बीएफएसआय यासारख्या नॉन-टेक क्षेत्रांमधील सक्रिय भरतीने आयटी क्षेत्रातील नोकरभरतीमधील घट कमी केली. भौगोलिकदृष्ट्या अहमदाबाद व वडोदरा या शहरांनी एप्रिल २०२३मध्ये अनुक्रमे वार्षिक २८ टक्क्यांची व १४ टक्क्यांची प्रबळ वाढ दर्शविली. मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये व्हाईट कॉलर नोकऱ्यांच्या मागणीत मात्र ५ टक्क्यांनी घट पहायला मिळाली आहे.
रिअल इस्टेट क्षेत्राने नोकर भरतीत २१ टक्के वाढ दर्शवली आहे. याव्यतिरिक्त नोकरभरतीच्या कामात अधिक वाढ असलेल्या क्षेत्रांमध्ये ऑईल अॅण्ड गॅस (तेल व वायू) क्षेत्राने २० टक्क्यांची, विमा क्षेत्राने १३ टक्क्यांची आणि बँकिंग क्षेत्राने ११ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. तर ऑटो क्षेत्र व फार्मा क्षेत्रातील नोकरभरती अनुक्रमे ४ टक्क्यांनी व ३ टक्क्यांनी वाढली.
एप्रिलमध्ये नियुक्ती प्रक्रियेत वाढीमध्ये रिअल इस्टेट, बीएफएसआय आणि ऑईल अॅण्ड गॅस यासारख्या काही प्रमुख क्षेत्रांचे वर्चस्व होते. आयटीकेंद्रित महानगरांनी सावधपणे नियुक्ती करण्याची भावना दाखवली असताना अहमदाबाद आणि वडोदरासारखी उदयोन्मुख शहरे चमकदार कामगिरी करत असल्याचे नोकरीडॉटकॉमचे प्रमुख व्यवसाय अधिकारी पवन गोयल यांनी सांगितले.
रिअल इस्टेटमध्ये विकासगती कायम
रिअल इस्टेट क्षेत्र नॉन-टेक्नॉलॉजी उद्योगांमध्ये अग्रस्थानी होते. गेल्या वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत नोकरभरतीमध्ये २१ टक्के वाढ नोंदवली गेली. ही वाढ प्रामुख्याने महानगरीय क्षेत्रांमध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांच्या नवीन लाँचमध्ये वाढ झाल्यामुळे झाली. त्यामुळे निविदा व्यवस्थापक, बांधकाम अभियंता आणि स्थापत्य अभियंता यासारख्या महत्त्वाच्या पदांकरिता नियुक्ती करण्यास चालना मिळाली. मोठ्या महानगरांपैकी कोलकाता, पुणे आणि हैदराबादने रिअल इस्टेट क्षेत्रासाठी नियुक्तीमध्ये अनुक्रमे २८ टक्के, २२ टक्के व १९ टक्क्यांची नोकरभरती मध्ये वाढ नोंदवली. १६ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या वरिष्ठ उमेदवारांची या क्षेत्रात मागणी सर्वाधिक होती.
नॉन-मेट्रो शहरांमध्ये नियुक्तीत वाढ
नॉन-मेट्रो शहरांमध्ये अहमदाबाद नवीन रोजगार निर्मितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांच्या वाढीसह नोकरभरती ट्रेण्ड्समध्ये आघाडीवर आहे, त्यानंतर नवीन रोजगार निर्मितीमध्ये १४ टक्के व ९ टक्के वाढीसह अनुक्रमे वडोदरा व जयपूर यांचा क्रमांक आहे. बँकिंग, ऑटो आणि इन्शुरन्स क्षेत्रांनी नॉन-मेट्रो शहरांमध्ये निदर्शनास आलेल्या नोकरभरतीमध्ये प्रामुख्याने योगदान दिले आहे. रिअल इस्टेट आणि ऑईल अॅण्ड गॅस ही इतर क्षेत्रे होती, जिथे नॉन-मेट्रोमध्ये सकारात्मक नोकरभरतीची भावना दिसून आली.
वरिष्ठ उमेदवारांची उच्च मागणी कायम
१६ वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या वरिष्ठ उमेदवारांची मागणी गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढली, तर १३ ते १६ वर्षांचा अनुभव असलेल्या वरिष्ठ उमेदवारांची २० टक्क्यांनी वाढली. नवीन पदवीधर आणि ४ ते ७ वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांच्या मागणीत गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत घट झाली आहे.