Homeब्लॅक अँड व्हाईटमोफत वीज योजनेत महाराष्ट्राचे २५...

मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचे २५ हजार ग्राहक

घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज  योजनेत राज्यात २५,०८६ ग्राहकांनी १०१.१८ मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसविल्यामुळे राज्याने शंभर  मेगावॅटचा टप्पा पार केला आहे.

सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त अशा या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे. योजनेची अंमलबजावणी महावितरणच्या माध्यमातून होत असून शंभर मेगावॅटचा टप्पा ओलांडल्याबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचे अभिनंदन करत ग्राहकांनी या योजनेचा  अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. राज्यात सौर प्रकल्प बसविणाऱ्या २५,०८६ ग्राहकांना अनुदानाची रक्कम रुपये १६० कोटी थेट ग्राहकांना हस्तांतरीत करण्याचे काम सुरू आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात एकूण ३,५१,९४२ ग्राहकांची प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या पोर्टलमध्ये  नोंदणी झालेली आहे. यापैकी योजनेत २,३३,४३१ ग्राहकांनी महावितरण पोर्टलवर अर्ज केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करुन  देण्यासाठी १ कोटी घरांना रुफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्या  अनुषंगाने महाराष्ट्रासाठी २० लाख घरांवर रुफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे.  देशाचा हा प्रकल्प ७५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचा आहे. ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते.

निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३०,००० रुपये अनुदान, २ किलोवॅटपर्यंत मिळते. ३  किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी रु. १८,००० अनुदान मिळते. ३ किलावॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान रु. ७८,००० पर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरीता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी रु. ९०,००,०००पर्यंत रु. १८,००० प्रति कि.वॅटप्रमाणे अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी एकूण कमाल मर्यादा ५०० किलो वॅटपर्यंत लागू आहे.

महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे १०किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात  बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध असून ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content