अफगाणिस्तानातून न्हावा शेवा बंदरावर आलेल्या एका कंटनेरमधल्या मोहरीच्या तेलाच्या पिंपांच्या तळात लपवलेले तब्बल २५ किलो हेरॉईन महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी नुकतेच हस्तगत केले.
टेनर क्रमांक PARU2252260 द्वारे आयात केलेल्या मालामध्ये एनडीपीएस अधिनियम, 1985 अंतर्गत प्रतिबंधित असणाऱ्या वस्तू समाविष्ट असण्याची शक्यता वर्तवणारी विशेष गोपनीय माहिती महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)च्या मुंबई विभागीय युनिटला प्राप्त झाली होती. मुंबईच्या मस्जिद बंदरचा पत्ता असलेल्या आयातदाराच्या नावाने अफगाणिस्तानच्या कंधहारमधून कंटेनर आयात करण्यात आला होता. हा कंटेनर इराणमधील चाबोहार बंदरातून आला होता.
या गुप्त माहितीच्या आधारे, न्हावा शेवा बंदराच्या मालवाहतूक स्थानकावर उभ्या असलेल्या ईएफसी लॉजिस्टिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कंटेनरची डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणी केली. सीमाशुल्क संबंधित कागदपत्रात कंटेनरमध्ये तीळ तसेच मोहरीचे तेल म्हणून माल असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सखोल तपासणीदरम्यान असे लक्षात आले की, मोहरीच्या तेलाच्या पाच कॅनमधील सामग्री वेगळी आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्या पाच संशयास्पद पिंपांची कसून तपासणी केली आणि त्यांना त्या तेलाच्या पिम्पांच्या तळाशी लपवण्यात आलेले पांढऱ्या रंगाचे साहित्य सापडले. एनडीपीएस फील्ड किटने त्या पदार्थांची चाचणी केल्यावर, या सामग्रीमध्ये हेरॉईन असल्याचे आढळले. या तपासणीनंतर, या पाच डब्यांमधून आणलेले, 25.45 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले.
या प्रकरणात अंमली पदार्थ तस्करीची नवीन कार्यपद्धती समोर आली आहे. तेलाच्या पिंपात लपवलेले हेरॉईन जप्त करण्याची, कोणत्याही भारतीय तपास संस्थेची ही पहिलीच वेळ आहे. आयात कंटेनरच्या नेहमीच्या तपासणीदरम्यान ते शोधणे जवळजवळ अशक्य होते. तपासात असेही निष्पन्न झाले की, इराणमध्ये बऱ्याच काळापासून वास्तव्याला असलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीकडून आयात करणाऱ्या कंपनीचे नाव वापरले जात होते. इराणमधील त्याच्या जुन्या संबंधांचा वापर करून अफगाणिस्तानातून त्याने हा माल पाठवला होता. त्याच्या जबानीत, अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेल्या आयात मालाची खेप त्याच्याच मालकीची होती हे या व्यक्तीने कबूल केले असून त्याने त्याच्या अफगाण संबंधांविषयीचे तपशीलही दिले आहेत.
या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू असताना दिल्लीहून आणखी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांना मुंबईत ट्रान्झिट रिमांड अंतर्गत आणण्यात आले आहे. या मालाची आयात सूरळीत होण्याच्या दृष्टीने, हे दोघे हवालासह आर्थिक व्यवहारात सहभागी होते. पनवेल सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कोठडीत केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
याआधी जुलै महिन्यात महसूल गुप्तचर विभाग, मुंबईने न्हावा शेवा बंदरावर मूळ अफगाणिस्तानातून आलेले 294 किलो हेरॉईन जप्त केले होते. त्यापूर्वी ऑगस्ट 2020मध्ये डीआरआयने अफगाणिस्तानमधून आलेल्या मालाच्या आणखी एका खेपेमधून न्हावा शेवा बंदरावर 191.6 किलो हेरॉईन जप्त केले होते. अफगाणिस्तानातील अंमली पदार्थांचा माल इराणच्या चाबोहार / बंदर अब्बास या बंदरामधून पाठवला जातो. या मोठ्या जप्तींव्यतिरिक्त, डीआरआयने गेल्या एका वर्षात कुरियर पार्सल तसेच आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतून येणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे डझनभर प्रकरणात हेरॉईन आणि कोकेन काही किलोंच्या प्रमाणात जप्त केले आहे.

