महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार आजपासून राज्यातील सर्व महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. बेमुदत संपाचा आजचा पहिला दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर संप १००% यशस्वी झाल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष हेमंत साळवी यांनी केला आहे.

राज्यातील जवळपास २२००० वर्ग ३ व वर्ग ४चे कर्मचारी संप करत असून त्यामुळे महसूल कार्यालयातील सेवा ठप्प झाल्या आहेत. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने या संपास पाठिंबा दिला आहे. शासनाने वेळीच लक्ष घालून महसूल संघटनेस तातडीने चर्चेसाठी बोलवावे असे आवाहन बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी केले आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सुरूवातीला काळ्या फिती लावून काम करण्याचे आंदोलन केले. त्यानंतर भोजन अवकाशात निदर्शने, एक दिवसाचे कामबंद आंदोलन, असे सर्व मार्ग निरूपयोगी ठरल्यानंतर आजपासून आम्ही बेमुदत संप पुकारल्याचेही साळवी यांनी सांगितले.

महसूल सहायकांची रिक्तपदे तातडीने भरणे, अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्याने तसेच इतर १४ प्रमुख मागण्याकडे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

