Homeन्यूज ॲट अ ग्लांस2 वर्षांची आर्यतारा...

2 वर्षांची आर्यतारा बनली नेपाळची नवी जिवंत कुमारी देवी!

नेपाळमधील दशैन सणाच्या वेळी 2 वर्षे वयाच्या नवीन कुमारीला जिवंत देवीचा मुकूट घालण्यात आला आहे. आर्यतारा शाक्य ही नेपाळची नवीन जिवंत देवी कुमारी म्हणून घोषित करण्यात आली आहे. हिंदू आणि बौद्ध धर्मियांमध्ये ती पूजनीय असते. ती काठमांडूच्या मंदिर राजवाड्यात राहून भक्तांना तारुण्याचा आशीर्वाद देते, अशी भावना आहे. या हिमालयीन राष्ट्रातील हिंदूंमध्ये आदराचे सर्वोच्च स्थान असलेल्या कुमारी देवीचे चरणस्पर्श करण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. कुमारी देवीला फुले वाहून दक्षिणा अर्पण केली जाते. नवीन कुमारी देवी गुरुवारी राष्ट्रपतींसह देशातील तमाम भक्तांना आशीर्वाद देतील.

आर्याताराच्या कुटुंबाने मंगळवारी काठमांडूमधील त्यांच्या घरातून तिला मंदिराच्या महालात नेले. कुटूंब, मित्र आणि भक्तांनी काठमांडूच्या रस्त्यांवरून नवीन कुमारीची मिरवणूक काढली आणि नंतर मंदिराच्या महालात प्रवेश केला, जे अनेक वर्षे तिचे घर राहील. नेपाळमधील सर्वात महत्त्वाच्या दशैन, या हिंदू सणाच्या वेळी नेपाळची नवीन जिवंत देवी म्हणून तिला ओळख देण्यात आली. 2 वर्षे आणि 8 महिन्यांच्या वयात, आर्यतारा शाक्य यांना त्यांच्या पूर्वसुरीनंतर नवीन “कुमारी देवी” म्हणून घोषित करण्यात आले. नेपाळी परंपरेनुसार तारुण्यावस्थेत पोहोचल्यानंतर कुमारी देवींना मर्त्य मानले जाते. कुमारी पारंपारिकपणे काठमांडू खोऱ्यातील नेवार समुदायाच्या शाक्य कुळातून निवडल्या जातात आणि हिंदूबहुल देशात हिंदू आणि बौद्ध दोघेही त्यांचा आदर करतात. 2 ते 4 वयोगटातील निवडलेल्या उमेदवारांची त्वचा, केस, डोळे आणि दात निर्दोष असले पाहिजेत आणि त्यांना अंधाराची भीती वाटायला नको, या प्रमुख अटी असतात. कुमारी नेहमीच लाल रंगाचे कपडे घालते, केसांना गाठींमध्ये बांधते आणि तिच्या कपाळावर “तिसरा डोळा” रंगवलेला असतो.

इंद्रजत्रा उत्सवादरम्यान, भक्तांनी ओढलेल्या रथावर कुमारी देवीला फिरवले जाते. आठवडाभर चालणारा इंद्रजत्रा उत्सव ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या उत्सवांच्या मालिकेतील पहिला उत्सव असतो, ज्यामध्ये मुख्य सण दशैन आणि दिव्यांचा सण तिहार, अर्थात दिवाळी यांचा समावेश असतो. मंगळवारी दशैनचा आठवा दिवस होता. दशैन हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा 15 दिवसांचा उत्सव असतो. लोक त्यांच्या कुटुंबियांसोबत हा सण साजरा करतात. या काळात नेपाळमधील सर्व कार्यालये आणि शाळांना सुट्टी असते. नव्या कुमारी देवीचे वडील अनंत शाक्य म्हणाले की, “ती काल माझी मुलगी होती, पण आज ती संपूर्ण राष्ट्राची देवी आहे. तिच्या जन्मापूर्वीच ती देवी होणार असल्याची चिन्हे होती. माझ्या पत्नीला गरोदरपणात स्वप्न पडले होते की, गर्भात एक देवी आकार घेत आहे. आम्हाला माहित होते की, ती खूप खास कोणीतरी होणार आहे.”

2017मध्ये जिवंत कुमारी देवी बनलेल्या, तृष्णा शाक्य या आता 11 वर्षांच्या आहेत. नव्या देवीच्या घोषणेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी आणि समर्थकांनी मंदिरातील मागच्या प्रवेशद्वारातून त्यांना पालखीतून मिरवणुकीने बाहेर नेले. शाक्य कुळातील अनेक कुटूंब या प्रतिष्ठित स्थानासाठी आपल्या मुली पात्र ठराव्यात म्हणून जोरदार स्पर्धा करतात. कुमारी देवी कुटुंबाला समाजात आणि त्यांच्या स्वतःच्या कुळात उच्च स्थान मिळते. माजी कुमारी देवी मात्र नंतर एकटे जीवन जगतात. त्यांना वर्षातून फक्त काही वेळाच सणांसाठी बाहेर पडण्याची परवानगी असते. माजी कुमारींना सामान्य जीवनाशी जुळवून घेण्यास, घरकाम करायला शिकण्यास आणि नियमित शाळेत जाण्यास अडचणी येतात. नेपाळी लोककथा अशी आहे की, जे पुरुष माजी कुमारीशी लग्न करतात, ते तरुणपणीच मरतात. त्यामुळे अनेक जिवंत कुमारी देवी  मुली अविवाहित राहिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत, या परंपरेत बरेच बदल झाले आहेत आणि कुमारींना आता मंदिराच्या महालात खाजगी शिक्षकांकडून शिक्षण घेण्याची आणि टेलिव्हिजन ठेवण्याची परवानगी आहे. नेपाळ सरकार निवृत्त कुमारींना सुमारे 110 अमेरिकी डॉलर्स म्हणजे 15,650 नेपाळी रुपये (9,750 भारतीय रुपये) इतके तुटपुंजे मासिक पेन्शनदेखील देते. अर्थात ते नेपाळमध्ये सरकारने निश्चित केलेल्या किमान वेतनापेक्षा थोडे जास्तच आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content