माहितीपट, लघुपट आणि एनिमेशनपट यांना समर्पित असलेला 17वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून मुंबईतील फिल्म डिव्हिजन परिसरात सुरू होत आहे. आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम वरळी इथे, नेहरू केंद्रातल्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. उद्घाटनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर महोत्सवातील ओपनिंग फिल्म्स म्हणून तीन चित्रपटदेखील रसिकांना दाखवले जाणार आहेत.
आयोजकांनी शुभारंभाच्या चित्रपटांसाठी तीन विविध प्रकारच्या चित्रपटांची निवड केली आहे. यात ‘कास्ट अवे’ हा फ्रान्सचा एनिमेशनपट, जपानचा ‘शाबु शाबु स्पिरीट’ हा लघुपट आणि भारतातला मणिपुरी माहितीपट ‘मीरम- द फायरलाईन’ दाखवले जाणार आहेत. हा महोत्सव माहितीपट, लघुपट आणि एनिमेशनपटांना समर्पित असतो. त्यामुळे शुभारंभाच्या चित्रपटांसाठी प्रत्येक प्रकारातून एका चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
हे तिन्ही चित्रपट मिफ्फमध्ये नंतरही दाखवले जाणार आहेत. मिफ्फमध्ये समाविष्ट चित्रपटांमधील, भाषा, आशय, विषय आणि पद्धती यांच्यातील वैविध्य या तीन चित्रपटांतून रसिकांना नक्कीच दिसेल.

शुभारंभाच्या चित्रपटांविषयी:
कास्ट अवे – अॅनिमेशन | फ्रांस | 2020
दिग्दर्शक: रेचेल ब्ऑस्क-बिरेन, व्हेसो कॅरेत, सीमॉ फॅब्री, मॅरी गुटीयेर, मॅर्गो लोपेझ, लेओपोल्दीन पैरद्री आणि फ्लोरन व्हिक्टर.
स्पेशल पॅकेजमधून: अनिम! आर्ते (ANIM!ARTE)– विद्यार्थी अॅनिमेशन चित्रपट महोत्सव, ब्राझिल.
कथासार:
एक एकाकी मुलगी, आकाशात राहत असते. तिला भीती वाटणाऱ्या पृथ्वीवरील जगापासून खूप दूर. एक दिवस, कोणी एक आगंतुक तिच्या जगात येतो आणि तिचे शांत चालणारे आयुष्य ढवळून टाकतो. आणि तिच्या हक्काच्या ढगावरुन ढकलून देतो.
शाबु शाबु स्पिरीट- लघुपट | जपान | 2015
दिग्दर्शक: युकी साईतो
स्पेशल पॅकेज: फिल्म फ्रॉम शॉर्ट्स फिल्म फेस्टिव्हल, जपान.
कथासार:
किटा हा प्रियकर, आपल्या प्रेयसीच्या कुटुंबियांना, तिचे वडील शोजो ह्यांना भेटायला जातो. शोजो गुपचुप त्याची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करतो. किटा आपल्या मुलीशी लग्न करण्यास पात्र आहे की नाही, याची तो आडून आडून परीक्षा घेत असतो. त्यातून दोघांमध्ये नकळत निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी, मुलीची आई, शाबु-शाबु या एकाच भांड्यात बनवलेला नेब हा पारंपरिक जपानी पदार्थ बनवायला घेते. आणि हा शाबु-शाबुच शोजो आणि किटाला एकमेकांच्या जवळ आणतो. त्यांच्यातला तणाव निवळतो.

शाबु-शाबु हा जपानी पदार्थ याच नावाच्या भांड्यात विविध जिन्नस एकत्रित करुन तयार केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ एकत्र येऊन एकजिनसी उत्तम पदार्थ तयार होतो. हे रूपक वापरून, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र येऊन एक चांगलं कुटूंब तयार होऊ शकतं, असा संदेश यातून दिला आहे.
मीरम – द फायरलाईन- माहितीपट | माणिपूर, भारत| 2021
दिग्दर्शक: जेम्स खामेग्नबाम
स्पेशल पॅकेज: द पोर्टेट्स फ्रॉम द नॉर्थ इंडिया, भारत.
कथासार:
माणिपूरच्या इंफाळ शहराबाहेर असलेली लंगोलची टेकडी एरव्ही ओसाड असते. मात्र, ऋतु कूस बदलतो तशी ही टेकडीही या शहराच्या एखाद्या झालरीसारखी नटते. जंगलात एखादी जादू झाल्यासारखं निसर्गचित्र बदलतं. लोइया, या तरुणाचं स्वप्न असतं की, ही टेकडी कायमच हिरविगार असावी. त्याला तशाच समविचारी मित्रांची साथ मिळते. या सगळ्या ग्रुपची भटकंती, टेकडी हिरवीगार करण्याचे त्यांचे प्रयत्न दाखवतानाच, त्यात वनसौंदर्य आणि जैवविविधतेचं वैविध्य चित्रपटात हळुवारपणे टिपलं आहे.
हा महोत्सव यंदा प्रथमच मिश्र म्हणजे प्रत्यक्ष आणि ऑनलाईन स्वरूपात होत असून रसिकांना नोंदणी करून चित्रपटांचा प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन आस्वाद घेता येणार आहे. महोत्सव चार जून 2022पर्यंत चालणार आहे.
मिफ्फ चित्रपट महोत्सवात तुम्ही जाणार तरी कशासाठी?
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बघायला कोण कोण जाईल? आणि का?, असा प्रश्न तुम्हाला कोणी मित्रांनी, तुमच्या सहकऱ्यांनी किंवा कोणी नाही तर तुम्हीच स्वतःला विचारला का? आणि जेव्हा तुमच्यासाठी मनोरंजनाचे इतर हजारो पर्याय एक क्लिकवर उपलब्ध असताना, मिफ्फ बघायला कोणी का जावं? माहितीपट तर फार बोअरिंग असतात आणि अॅनिमेशन्स तर फक्त लहान मुलांसाठी!
असं मुळीच नाही! आपली केवळ पाच मिनिटं द्या आणि एक नजर मारा, 17व्या मिफ्फमध्ये तुमच्यासाठी काय काय आहे त्याकडे.. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील…

मिफ्फमध्ये तुम्हाला वाटतंय तसं पारंपरिक काहीही नाही. चित्रपट रसिक आणि कलाप्रेमी, ज्यांना त्यांच्या मनाला सुखावणाऱ्या, आत्म्याला साद घालणाऱ्या कथा बघायच्या असतील तर त्याचं उत्तर आहे- मिफ्फ! जर तुम्हाला खरोखरच उत्तम सिनेमा आवडत असतील, तर मिफ्फमध्ये जरूर या! 17वा मिफ्फ, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र स्वरुपात आहे आणि तोही पूर्णपणे मोफत…
यावर्षीच्या मिफ्फमध्ये तुम्हाला, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही स्वरुपात 400 चित्रपट बघायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही, तुमच्या घरी आरामात बसून चित्रपट बघू शकाल किंवा दक्षिण मुंबईत पेडर रोडवरच्या फिल्म डिव्हिजनच्या सुंदर परिसरात येऊनही सिनेमांचा आनंद घेऊ शकता. हाही एक नवा अनुभव असेल. कारण इथेही सिनेमा प्रदर्शन पूर्णपणे मोफत आहे. फिल्म्स डिव्हिजनच्या परिसरात संपूर्ण महोत्सव बघण्यासाठी, तुम्हाला केवळ 300 रुपये नाममात्र शुल्क भरुन नोंदणी करायची आहे, https://miff.in/ या संकेतस्थळावर जाऊन.. आणि मग या महोत्सवाचा आस्वाद तुम्हीही घेऊ शकता..
ऑनलाईन मोडवर तुम्ही हे सिनेमे पूर्णपणे मोफत बघू शकता..
विद्यार्थ्यांसाठी नोंदणी करण्यासाठी लिंक खालीलप्रमाणे:
https://miff.in/delegate2022/?cat=c3R1ZGVudF9kZWxlZ2F0ZQ==
माध्यमांसाठी नोंदणी करण्यासाठी लिंक:
https://miff.in/delegate2022/?cat=bWVkaWE=
सर्वसामान्यांना नोंदणी करण्यासाठी लिंक:
https://miff.in/delegate2022/?cat=ZGVsZWdhdGU=
इथे तुमची मनोरंजनाची उपासमार तर होणार नाहीच, शिवाय, पोटापाण्याचीही सोय केलेली आहे. इथे, तुमच्यासाठी उत्तम चित्रपटांसोबत, उत्तम खाद्यपदार्थही असतील- तुंगा, शालिमार, आमची मुंबई, मेधा’ज किचन, चेतन फूड अशा स्टॉल्सवरचे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि उन्हाळ्याची काहिली शांत करणारे थंडगार कोक! म्हणजे, मनही तृप्त होणार आणि पोटही!
त्याशिवाय, चित्रपट रसिकांना, इथे, चित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती- जसे की नल्लामुथु, ऑस्कर पुरस्कार विजेते नामवंत साऊंड डिझायनर रसूल पुक्कूटी, लेखक आणि गीतकार प्रसून जोशी आणि इतर अनेक मान्यवर या महोत्सवात उपस्थित असतील.
मिफ्फच्या बेवसाईटवर जाऊन, ‘स्क्रीनिंग’मध्ये, तुम्हाला चित्रपटांची संपूर्ण यादी मिळू शकेल. मग, कोण कोण जाणार आहे @ #MIFF2022 मध्ये?

