नारीशक्ती आणि विकसित भारताच्या संकल्पनेचे स्मरण करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल तिन्ही सेनादलांतील महिलांच्या ‘समुद्र प्रदक्षिणा’, या ऐतिहासिक पृथ्वीप्रदक्षिणा नौकानयन मोहिमेला राजधानी दिल्लीत आभासी पद्धतीने झेंडा दाखवून रवाना केले. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथून सुरु होणारी ही जगातली अशा प्रकारची पहिलीच नाविक पृथ्वीप्रदक्षिणा मोहीम आहे. संरक्षण मंत्र्यांसोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग साउथ ब्लॉकमध्ये उपस्थित होते. फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, नौदलाचे पश्चिम विभागप्रमुख व्हाइस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि इतर वरिष्ठ अधिकारी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे उपस्थित होते.
या सागरी मोहिमेत येत्या 9 महिन्यांच्या काळात, या 10 महिला अधिकारी भारतीय लष्कराच्या त्रिवेणी या स्वदेशी नौकानयन नौकेतून (आयएएसव्ही) सुमारे 26 हजार सागरी मैलांचे अंतर पार करतील. या प्रवासादरम्यान त्या दोनदा विषुववृत्त ओलांडतील तसेच केप लीयुविन, केप हॉर्न आणि केप ऑफ गुड होप अशा तीन महत्त्वाच्या केप्सना फेरी घालतील. सर्व महत्त्वाचे महासागर तसेच दक्षिणी महासागर आणि ड्रेक पसाजसह पृथ्वीवरच्या सर्वात धोकादायक जलमार्गांवरून त्यांचा हा प्रवास होणार आहे. मे 2026मध्ये मुंबईला परतण्यापूर्वी हे पथक चार आंतरराष्ट्रीय बंदरांनादेखील भेट देईल.
या 10 सदस्यांच्या पथकामध्ये मोहिमेच्या प्रमुख लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर, उपप्रमुख स्क्वाड्रन लीडर श्रद्धा राजू, मेजर करमजीत कौर, मेजर ओमिता दळवी, कॅप्टन प्राजक्ता निकम, कॅप्टन डॉली बुटोला, लेफ्टनंट कमांडर प्रियंका गुसैन, विंग कमांडर विभा सिंह, स्क्वाड्रन लीडर अरुवी जयदेव आणि स्क्वाड्रन लीडर वैशाली भंडारी या महिलांचा समावेश आहे. या पथकाने

तीन वर्षांचे कठोर प्रशिक्षण घेतले आहे, ज्याची सुरुवात बी वर्ग श्रेणीतील नौकांवरील अपतटीय लहान मोहिमांपासून झाली आणि त्यानंतर ऑक्टोबर 2024मध्ये वर्ग अ नौकेच्या आयएएसव्ही त्रिवेणीपर्यंत त्या पोहोचल्या. त्यांच्या तयारीत भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील उत्तरोत्तर आव्हानात्मक होत जाणारा प्रवास आणि मुंबई ते सेशेल्स तसेच या वर्षाच्या सुरुवातीला परतणारी एक ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय मोहीम समाविष्ट होती. यातून त्यांची सागरी निपुणता, सहनशक्ती आणि स्वयंपूर्णता सिद्ध करुन प्रमाणित केली होती.
जागतिक नौकानयन गती रेकॉर्ड परिषदेच्या कठोर नियमांचे पालन करून ही प्रदक्षिणा पूर्ण केली जाईल. त्यामध्ये कालवे किंवा ऊर्जेचा वापर न करता सर्व रेखांश, विषुववृत्त ओलांडणे आणि केवळ जहाजातून 21,600 पेक्षा जास्त नॉटिकल मैलांचा प्रवास पूर्ण करणे अपेक्षित आहे. डिसेंबर 2025 – फेब्रुवारी 2026 दरम्यान दक्षिण महासागरातील केप हॉर्नला प्रदक्षिणा घालणे हा त्यातील सर्वात कठीण टप्पा असेल. मोहिमेदरम्यान, हे पथक राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या सहकार्याने वैज्ञानिक संशोधनदेखील करेल. यामध्ये सूक्ष्म प्लास्टिकचा अभ्यास, महासागरातल्या जीवनाचे दस्तऐवजीकरण आणि सागरी आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे समाविष्ट आहे.
सर रॉबिन नॉक्स-जॉन्स्टन (यूके) यांनी 1969मध्ये एकट्याने जराही न थांबता, सर्वप्रथम ही प्रदक्षिणा पूर्ण केली होती. भारतात, कॅप्टन दिलीप दोंदे (निवृत्त) यांनी पहिल्यांदा एकट्याने ही प्रदक्षिणा पूर्ण केली होती (2009–10). कमांडर अभिलाष टॉमी (निवृत्त) 2012–13मध्ये जराही न थांबता ही प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले भारतीय होते. भारतीय नौदलाने आयएनएसव्ही तारिणीद्वारे केलेली नाविका सागर परिक्रमा (2017–18) आणि नाविका सागर परिक्रमा-II (2024-25) या, याआधी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या सागरी परिक्रमा आहेत.