Details
शेतकऱ्यांना सुखाने जगू द्या!
21-Dec-2018
| 0
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ येथे काँग्रेसने सत्ताग्रहण केल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. या राज्यांतील पराभवामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी, सबसिडी हे हुकमाचे एक्के निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसच्या हाती आले आहेत हे भाजपाच्या ध्यानी आता आले आहे. भाजपानेही निवडणूकपूर्व प्रचार सुरू करताना कर्जमाफी, अनुदान सवलती या लोकप्रिय आणि तात्पुरत्या मलमपट्ट्या जाहीर करण्याची तयारी केली आहे. गुजरातमध्ये वीज थकबाकी माफ करून भाजपाने त्याचे संकेत दिलेच. भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये आणि केंद्रातूनही आता अशा लोकानुनयी घोषणा केल्या जातील असे आम्ही कालच लिहिले होते. त्याची सुरूवात कांदा उत्पादकांना अनुदान जाहीर करून महाराष्ट्रातून गुरूवारी झाली.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा गेले दोन महिने रडवतो आहे. खरे तर दलाल, अडते आणि व्यापारी नाडत असल्यामुळे शेतकरी रडवले झाले आहेत. ऐन दुष्काळी परिस्थितीत टँकरने पाणी आणून, शेत भिजवून या शेतकऱ्यांनी जगवलेल्या कांद्याला किलोमागे मिळणारा अवघा रूपया या शेतकऱ्यांना हतबल करून गेला आहे. मंत्र्यांना कांदे फेकून मारा, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारीच नाशिकला बोलले होते. पण या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नव्हता. मात्र शेतकऱ्यांची ही हताशा, विफलता निवडणुकीत संतापाच्या रूपात प्रकटून घरी पाठवू शकते याची जाणीव भाजपाला मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतील निकालांमुळे झाली आहे. त्यामुळेच कनवाळू होत राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १५० कोटी रूपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. पण त्यातही मेख आहे. ज्या शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबरपासून कमी दरात कांदा विकला त्यांना प्रतिक्विंटल २०० रूपये अनुदान मिळेल. म्हणजे किलोमागे दोन रूपये. आता ज्या शेतकऱ्याने रूपया-दोन रूपयाने कांदा विकला, रस्त्यावर फेकला त्याला भरपूर लिखापिढीनंतर सरकार दोन रूपये अनुदान हातावर टेकवणार असेल तर ती चेष्टाच म्हणावी लागेल.
शेतकऱ्यांची अशी दारूण थट्टा भाजपानेच नव्हे तर आजवरच्या सर्वच सरकारांनी, सत्ताधारी पक्षांनी चालवली आहे. त्याचाच संताप शेतकरी आता मतदानातून व्यक्त करू लागले आहेत. कर्जमाफीची मलमपट्टी हा शेतकऱ्यांच्या दुखण्यावरील अक्सीर इलाज नव्हे, ते एक तात्पुरते औषध आहे. भरमसाट आश्वासनांनी शेतकऱ्यांना सर्वच सरकारांनी आजवर भुलवले होते. आताही त्यांना कर्जमाफीच्या आश्वासनावरच झुलवले जात असते. राहुल गांधी यांनी अत्यंत हुशारीने कर्जमाफीचा हा मुद्दा उचलल्यावर भाजपा आणि केंद्र सरकारसमोर कर्जमाफी देण्याचे आव्हान उभे राहिले आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा मोदी आणि भाजपाने केला होता. पण उत्पन्न दुप्पट करण्याची अशी कुठलीही योजना सरकारकडे नाही, अशी माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी संसदेतच दिली. मग शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मंत्रालयीन समिती स्थापन केल्याचे जुलै, २०१८ ला सरकारने जारी केलेले पत्रक धूळफेक म्हणावी लागेल. दुर्दैव असेलच तर ते शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊनही शेतीचे प्रश्न सुटणारे नाहीत याची जाणीव शेतकऱ्यांनाही आहे आणि अर्थतज्ज्ञांना. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे उपाय वेगळे आहेत. हमीभाव बांधून देणे हा त्यावरील एक प्रमुख उपाय आहे. पण दीडपट हमीभावांचे आश्वासन देऊनही भाजपाने ते अद्याप पूर्ण केलेले नाही. कर्जमाफीने वा केवळ आश्वासनानेही शेतकरी तात्पुरता सुखावतो, मते मिळतात, सत्ता मिळते, दिल्ली जिंकता येते हे २००९ च्या निवडणुकांनीच सिद्ध केले आहे.
अशा कर्जमाफीने फासावर लटकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. मुळात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची म्हटली की सरकारची अनिच्छा प्रकट होते. ग्रामीण आणि नागरी भेद प्रकर्षाने समोर येतात. मग अशा कर्जमाफीने अर्थव्यवस्थेची वाट लागेल, असे सांगायला निती आयोग पुढे येतो. कर्जमाफीने कृषिक्षेत्रापुढील समस्या सुटणाऱ्या नाहीत हे सांगायला निती आयोगाची गरज नाही. ते तर कोरड्या ठक्क जमीनीतून आसवांचे पिक काढणाऱ्या शेतकऱ्याला माहित आहेच. १९९० मध्येही अशी सरसकट कर्जमाफी जाहीर झाली होती. त्यानंतर २००८ मध्ये मध्यम आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना थकबाकी माफ केली गेली. यातील कशानेही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. आत्महत्त्या वाढत गेल्या. राहुल यांनी तीन राज्यांत कर्जमाफी देऊन केंद्र सरकारला आणि भाजपाला कोंडीत पकडले असले तरी कर्जमाफी ही शेतीच्या मूलभूत समस्यांवरील ठोस उपाययोजना नाही. सिंचन योजना, साठवणीचे उपाय, हमीभाव, वितरण व्यवस्थेचे जाळे अशा काही उपायांनीच शेतकऱ्यांचे दुष्टचक्र संपुष्टात येऊ शकते. तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी या ठोस उपायांनीच शेतकऱ्याचे जीणे सुखाचे होऊ शकते.”

