HomeArchiveरिसलदार अजय सावंत...

रिसलदार अजय सावंत यांना “अर्जुन” पुरस्कार!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“मराठा युद्ध स्मारक छात्रावास, बेळगाव (Maratha War Memorial Boys Hostel)चे माजी विद्यार्थी व ६१ कॅव्हलरी दलाचे रिसलदार (सुभेदार) अजय सावंत यांना यंदाच्या म्हणजेच २०२० सालचा घोडस्वारीतील “टेन्ट पिगिंग” या वर्गवारीत दिला जाणाऱ्या क्रीडा क्षेत्रातल्या मानाच्या “अर्जुन” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर बोलताना सावंत म्हणतात की, मला भरपूर आनंद झाला आहे. अर्जुन पुरस्कार मिळाल्याने माझ्या कष्टाचे कौतुक झाल्याची भावना आहे.”
 
“६१ कॅव्हलरी युनिटला घोडस्वारीतील “टेन्ट पिगिंग” या वर्गवारीतील पहिला अर्जुन पुरस्कार कर्नल आर. एच. ब्रार साहेबांनी मिळवून दिला होता. त्यानंतर याच वर्गवारीतील अर्जुन पुरस्काराने मला सन्मानित करण्यात येणार आहे. ६१ कॅव्हलरी युनिटने आजपर्यंत १ पद्मश्री, ११ अर्जुन पुरस्कार मिळविले असून १२वा अर्जुन पुरस्कार मला प्राप्त झालेला आहे. माझ्या युनिटचे कर्नल राजेश पट्टू, कर्नल रवी राठोड हेही अर्जुन पुरस्कार विजेते आहेत. त्यांच्यासह कर्नल रोहित डागर, कमांडिंग ऑफिसर ६१ कॅव्हलरी, ले.कर्नल अर्जुन पाटील क्वाडरंट कमांडंट यांनी प्रत्येकवेळी प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे या यशात माझ्या युनिटमधील सर्वांचा वाटा आहे.”
 
“भारतीय सैन्य दलातील ६१ कॅव्हलरीमध्ये ९ ऑगस्ट १९९३मध्ये भरती झालो व जयपूरला डयुटी जॉईन केली. भारतीय सैन्य दलातील हे एकमेव दल (Unit) आहे जे घोडस्वारीशी संबंधित आहे. पूर्वी हॉस्टेलमध्ये असताना हॉकी, फुटबॉल, मल्लखांब हे खेळ माहिती झाले होते, खेळलो होतो. पण हा खेळ तसा माझ्यासाठी नवीन होता. या दलात सहभागी झाल्यावर येथील वरिष्ठांच्या गाथा ऐकल्यानंतर, युनिटमध्ये पुरस्कारप्राप्त वरिष्ठांच्या नामावलीप्रमाणे आपलेही नाव नोंदवले जावे असे वाटायचे. आपणही या क्षेत्रात नाव कमवावे असे वाटू लागले व या खेळात रस निर्माण झाला. ”
 
“सैन्य दलात दाखल झाल्यानंतर अजय यांनी १९९४ला इंटरनॅशनल व इतर अशा २१०हून अधिक पुरस्कारांसह “अर्जुन” पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. २०१७, २०१८, २०१९ व २०२० अशी गेली चार वर्षे अजय यांच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली होती. मागील तीन वेळा अर्जुन पुरस्काराची त्यांची संधी हुकली होती. पण यावर्षी त्यावर मोहर लागली.”
 
“सैन्य दलात भरती झाल्यानंतर १९९४मध्ये १२० किलो मीटर घोडस्वारीमध्ये त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक पटकावले. १९९६ मध्ये ८० किलो मीटर घोडस्वारी स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर १९९७ ते २००० अशी सतत ४ वेळा आर्मी चँपियनशिपसाठी सुवर्णपदकांची कमाई त्यांनी केली. २०१५मध्ये संपन्न झालेल्या नॅशनल गेम्समध्ये ४ सुवर्ण, नोएडा येथे संपन्न झालेल्या इंटरनॅशनल गेम्समध्ये ५ सुवर्ण व एशियन गेम्समध्ये ३ सुवर्णपदकांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. आबुधाबी येथे संपन्न झालेल्या वर्ल्ड कप २०१६ क्वालिफाईंग राऊंडला ३ सुवर्ण व २ रौप्य पदकांची कामगिरी अजय यांच्या नावावर नोंदवली आहेत.”
 
“अजय यांची ही घौडदौड अशीच चालू असताना इजिप्तच्या कैरो सिटीमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये घोडस्वारीमध्ये ३ सुवर्ण पदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. २०१७मध्ये भारतात क्वालिफाईंग गेम्समध्ये १ सुवर्ण, २ रौप्य व १ ब्रांझ त्यांनी आणले होते. २०१९मध्ये आर्मी चँपियनशिपसाठी त्यांनी १ सुवर्ण व १ रौप्य पदक पटकावले होते. तर चिफ ऑफ आर्मी स्टाफ कमांडेशन २ व जे ओ सी – आय ओ सी कमांडेशन ५ मिळविले आहेत. २००६ ते २००९ पर्यंत अजय सावंत यांनी नॅशनल डिफेंस अकादमीमध्ये प्रशिक्षक म्हणून मोलाचे काम केले आहे. त्यानंतर २०११ ते २०१४ मध्ये एनडीए, खडकवासला येथे पुन्हा प्रशिक्षक म्हणून आपल्या कामाची ओळख त्यांनी पटवून दिली आहे.”
  

 
“माझे पहिली ते ४थीपर्यंतचे शिक्षण कोकणातील दोडामार्ग तालुक्यातील सरगवे परिसरात झाले. माझे वडिलही सैन्य दलात असल्याने मला बेळगावच्या मराठा युद्ध स्मारक छात्रावास (Maratha War Memorial Boys Hostel) येथे १९८६मध्ये प्रवेश मिळाला व ५वी ते १०वीपर्यंतचे शिक्षण येथेच पूर्ण केले व १९९२ला पासआऊट झालो. हॉस्टेलच्या काळात मल्लखांब, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल आदी खेळांनी हॉस्टेलमधील आम्हा सर्वांना समृद्ध केले आणि कोणत्याही खेळात आपण प्राविण्य मिळवू शकतो याची खात्री पटली. हॉस्टेलमधील माझे बरेचसे मित्र सैन्य दलात असून त्यांनी हॉकी, बॉक्सिंग आदी खेळांमध्ये नाव कमावले आहे. खऱ्या अर्थाने हॉस्टेलमध्ये आम्हाला अशा खेळाची संधी मिळाली व त्यामध्ये माझ्यासह माझ्या अनेक मित्रांनी खेळाचे धडे याच हॉस्टेलमध्ये गिरवले. नव्हेतर आमचे तत्कालीन हॉस्टेल सुपरिटेंडट माजी ले. कर्नल अवस्थी साहेबांनी आमच्याकडून अभ्यासाबरोबरच खेळातही प्राविण्य मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळे त्या हॉस्टेलचा मी शतश: ऋणी आहे. ”
 
“लवकरच बेळगाव येथील हॉस्टेलला भेट देण्याची माझी तीव्र इच्छा आहे. मराठा वॉर मेमोरीयल बाईज हॉस्टेल ही शिक्षणासह, सैन्य दलाला अधिकारी, जवान व खेळाडू देण्याची एक खाण आहे. येथील अनेकांना जर योग्य प्रशिक्षणानंतर संधी प्राप्त झाली तर हॉस्टेलचे विद्यार्थी डॉक्टर, आयुक्त, प्राध्यापक, पत्रकार, उद्योजक व चांगले शेतकरीही झाले आहेत. हॉस्टेलमधील प्रत्येक विद्यार्थी खेळामध्येही जबरदस्त होते. बॉक्सिंग व हॉकीसाठी हॉस्टेलचे विद्यार्थी सैन्य दलात नाव कमावून आहेत. हॉस्टेलचा विद्यार्थी आहे असे समजल्यावर संबंधित युनिटचे अधिकारी खास त्यांना बोलावून कोणत्या खेळात चांगला आहेस याची चौकशी करून त्याला त्या-त्या खेळामध्ये संधी दिल्याच्या अनेक घटना आहेत. हेच अन्य कामांच्या बाबतीतही बोलले जाते. त्याचमुळे हॉस्टेलमधील सर्व आजी व माजी विद्यार्थ्यांना भेटून हा आनंद मला वाटायचा आहे. कोरोना काळ संपल्यावर बेळगावला एकत्र भेटण्याचा विचार आहे. तशी विनंती आम्ही मराठा लाईट इन्फन्ट्री, बेळगावचे कमांडिंग ऑफिसर साहेबांना करणार आहोत. ”
 
माझ बालपण म्हणजे कोकणातील एखादया गरीब कुटुंबाची जी स्थिती असते तीच थोडयाफार फरकाने आमचीही होती. वडिल सैन्य दलात असल्याने थोडे फार चांगले दिवस होते असे म्हणायचे. आई गृहिणी. आम्ही तीन भावंडे. त्यापैकी एक सैन्य दलात आहे तर दुसरा मुंबईत एका प्रायव्हेट कंपनीत काम करतो. मला दोन मुलगे आहेत एक १२वी पास झाला आहे. दुसरा ७वी पास झाला आहे. माझे आईवडिल व माझी पत्नी प्रियांका हिनेही मला नेहमी खूप सपोर्ट केला आहे. तुमच्या मेहनतीला व कतृत्त्वाला यशाची झळाळी मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तिने नेहमीच मला दिला.
 
“घोडस्वारीतील “टेन्ट पिगिंग” क्रीडा प्रकारात अर्जुन पुरस्कार मिळविणारे अजय सावंत हे हॉस्टेलमधील पहिलेच विद्यार्थी आहेत. त्यामुळे मराठा लाईट इन्फट्री, बेळगावचे कमांडिग ऑफिसर यांनी मराठा वॉर मेमोरियल बॉईज हॉस्टेल, बेळगाव येथे यथोचित सत्कार करावा व त्यांच्या विजयी पताक्याची मोहर हॉस्टेलमध्ये सन्मानाने रोवली जावी. ज्याने फक्त हॉस्टेलच नव्हे तर मराठा लाईट इन्फट्री सेंटर, बेळगावसह एकूणच मराठाच्या सर्व युनिटसच्या शिरपेचात अजून एका यशाची पताका रोवली जाईल. तसेच मराठा वॉर मेमोरियल बॉईज हॉस्टेल हे एक वेगळे व कसदार हॉस्टेल आहे. ते फक्त सैन्य दलाला सैनिक व अधिकारीच नाही तर अर्जुन पुरस्कारावर मोहर लावणारे अजय यांच्यासारखे खेळाडूही देते हे सिद्ध होईल. त्याचबरोबर यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये व “मराठा”मध्ये या गौरवाला मानाने समाविष्ट केले जावे, अशी हॉस्टेलच्या माजी विद्यार्थ्यांची इच्छावजा विनंती आहे.”

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content