Details
मुंबई सुरक्षित.. मग?
02-Mar-2019
| 1
”
जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
jayant.s.karanjavkar@gmail.com
भारतीय लष्काराने पाकमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवाद्यांचर अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान काय करेल याचा भरोसा नाही. भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर पाकिस्तानचा डोळा असणारच. त्यामुळे सरकारने मुंबईच्या सुरक्षतेबाबत खबरदारी घेतली आहे. आपल्या देशाच्या सीमा भागात युध्दजन्य वातावरण आहे. परंतु अशावेळी नागरिकांमध्ये तणावाचे, संभ्रमाचे वातावरण असते. पाकिस्तान विशेष करून मुंबईला टार्गेट करणार हे सन २००८ पासून सूज्ञ मुंबईकर जाणून आहेत. परंतु मुंबईकरांसाठी एक समाधानाची बाब म्हणजे मुंबईला रडारचे पूर्णतः कवच आहे.
पाकिस्तानी कसाब व त्याच्या कंपूने समुद्राद्वारे मुंबईत घुसून सुमारे ३०० लोकांना मारले. त्यात हेमंत करकरे, विजय साळसकर, कामटे हे पोलीस अधिकारी मारले गेले तर तुकाराम ओंबळे अतिरेकी कसाबला जिवंत पकडण्याच्या प्रयत्नात असताना शहीद झाले. तेव्हापासून आपले पोलीस आणि सैन्यदल जागृत राहून मुंबईचे संरक्षण करीत आहेत. मुंबईत नौदलाच्या पश्चिम कमांडाचे मुख्यालय आहे. मोठा नाविक तळ त्याठिकाणी आहे. नौदलाच्या अनेक युद्धनौका व पाणबुड्या या तळावर असतात. याच नौदलाकडून मुंबईत मोक्याच्या ठिकाणी शत्रूचा वेध घेणारे रडार बसविले आहेत. दक्षिण मुंबईत, नवी मुंबईत रडार बसविण्यात आले आहेत. या राडारमार्फत कुलाबा, कफ परेडपासून ते उरणपर्यंतच्या समुद्रावर लक्ष ठेवले जाते. मुंबईत तटरक्षक दलाच्या पश्चिम समुद्री क्षेत्राचे मुख्यालयसुद्धा आहे. तटरक्षक दलाचे मध्य व उत्तर मुंबईत रडार आहे आणि याद्वारे पश्चिम समुद्रावर पालघरपर्यंत लक्ष ठेवले जाते.
सीमाभागात युद्धजन्य परिस्थिती असली तरी संपूर्ण देशाला सतर्क राहणे गरजेचे आहे. कसाबने केलेला हल्ला आजही मुंबईकरांच्या समोर ताजा आहे. त्यामुळे प्रत्येक मुंबईकराला वाटणारी काळजी घेण्यासाठी मुंबईतील नौदलाचा हवाईतळ आहे आणि पाकसारख्या शत्रूचा हवाई हल्ला परतविण्यासाठी हेलिकॉप्टर व लढाऊ विमासने तैनात आहेत. त्याशिवाय मुंबईत काही ठिकाणी नौदलाचे रडार आहेत. हे झाले नौदल व तटरक्षक दलाचे. अतिरिक्त सुरक्षतेसाठी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे विमानतळ, धार्मिक स्थळे, महाविद्यालये, गर्दीच्या ठिकाणी, पर्यटनस्थळे आदी ठिकाणी जवानांना तैनात केले आहे. नुकतेच रायगडजवळ एका एसटीत बॉम्ब सापडले होते. त्या पार्श्वभूमीवर खाजगी बस आणि स्कूलबस चालक व मालक यांना अनधिकृत पार्सलची ने-आण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यासाठी विशेष म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आहे.
मुंबईकर कामानिमित्त नेहमीच धावपळीचे जीवन जगत असतो. मध्यमवर्गीय असो, व्यापारी असो, मॉलमधील कर्मचारी असो प्रत्येकाला आता या युद्धजन्य परिस्थिती बदलून काळाची पावले ओळखून सतर्क राहिले पाहिजे. आपले जवान २४ तास आपल्यासाठी सतर्क आहेत. मात्र आपण आपल्या आजूबाजूला संभाव्य घटनेकडे एक देशाचा सैनिक म्हणून पाहिले पाहिजे. मुंबईकर आणीबाणीप्रसंगी एकत्र येतो याचा अनुभव सर्वांना आहेच. पण गाफील राहून चालणार नाही. मुंबईत झोपडपट्ट्यांमध्ये अधूनमधून कोंबिंग ऑपरेशन करण्यात येते. राज्य सरकारला या ऑपरेशनची गरज का भासते? झोपडपट्टीत येणारे बांगलादेशी आणि संशयित पाकिस्तानीसमर्थक असल्याने सरकारवर असे ऑपरेशन करण्याची वेळ येते. झोपडपट्टीतील देशविघातकांना वेळीच ठेचून काढणे गरजेचे आहे. नौदल, तटरक्षक, हवाईदल हे सतर्क आहेत परंतु वोटबँकसाठी झोपडपट्टीत पाकिस्तानला हातभार लावणारे राहत असतील तर नौदल, तटरक्षक, हवाईदल यांचा काय उपयोग आहे? झोपडपट्टीत राहणारे पाकिस्तानी व बांगला देशी नागरिकांना जागा मिळवून देणारे हे देशद्रोही समजून त्यांना फासावर चढविले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच स्मारक बांधण्यापेक्षा गल्लीबोळात आणि मुंबईतील डोंगरावर उभ्या राहणाऱ्या अनधिकृत झोपडया नेस्तनाबूत करायला पाहिजेत. ह्या झोपडपट्ट्याच या मुंबईकरांचा नाश करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असते तर या झोपडया समूळ उपटून काढल्या असत्या. सरकार राष्ट्रभक्तीचे धडे देऊ शकते. कृतीने शून्य आहे. देश संरक्षणापेक्षा वोटबँक महत्त्वाची आहे. हे सत्य आहे. सत्ता राजकारण्यांना प्यारी आहे. देश गेला खड्ड्यात..”

