Details
केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
“मुंबईमध्ये सोमवारी खंडित झालेला वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात पूर्ववत करण्यात आला आहे, 2000 मेगावॅटपेक्षा जास्त पुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी सुमारे 1900 मेगावॅटचा पुरवठा रात्रीपर्यंत सुरू झाला होता. राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित असून राज्याच्या ग्रीडच्या काही भागांमध्ये बिघाड झाला होता. हे असे का घडले, याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारचे एक पथक लवकरच मुंबईला रवाना होईल, असे केंद्रीय ऊर्जा आणि नवीन तसेच नवीकरणीय ऊर्जा मंत्री (स्वतंत्र प्रभार) आर. के. सिंग यांनी जाहीर केले.”
अशाप्रकारच्या आपत्तींचे कारण शोधून काढून त्यावर शक्य असलेल्या सर्व उपायांबाबत हे पथक राज्य सरकारला मार्गदर्शन करणार आहे असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
“मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यात बिघाड झाल्यामुळे सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. तथापि, युद्धपातळीवर तीन साडेतीन तासातच बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीजपुरवठा खंडित झालेल्या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे तसेच यापुढे याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत दिले.”
या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वस्तुस्थिती सादर केली. त्याचप्रमाणे रुग्णालये आणि रेल्वेचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरळीत करण्यात आला अशी माहिती ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिली.
हा बिघाड अनपेक्षित होता की अपेक्षित होता किंवा यात काही गाफिलपणा झाला आहे का हे तपासण्याचे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी ज्या कारणांमुळे ही घटना घडली त्या वाहिन्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यास सांगितले. येणाऱ्या चार दिवसांत परतीच्या मुसळधार पावसाचा अंदाज असून यादृष्टीनेही विजेच्या मागणीचा विचार करून सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.
वीज खंडित होण्यामागील कारणे
1) मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या चार 400 केव्ही वीजवाहिन्या आहेत. या चारही वाहिन्या 400 केव्ही कळवा उपकेंद्र येथे येतात व तेथून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला वीज वितरित केली जाते. टाटा आणि अदानी यांचे एकत्रित 1800 मेगावॅट वीजनिर्मितीद्वारे वीजपुरवठा केला जातो.
2) त्या चार वाहिन्यांपैकी ४०० के. व्ही. कळवा-तळेगाव (पॉवरग्रीड) वाहिनी १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजून ४७ मिनिटाला या वाहिनीचा कंडक्टर तुटल्यामुळे बंद झाली होती. तसेच झालेला बिघाड हा सह्याद्री रांगांच्या माथ्यावरील दुर्गम भागात असल्याने तेथे काम करणे अत्यंत खडतर असे असले तरीही युद्धपातळीवर हे काम सुरू आहे.
३) ४०० के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-१ ही १२ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजून ३३ मिनिटाला ओव्हर व्होल्टेजमुळे बंद पडली. तसेच या वाहिनीचे बाधित इन्सुलेटर बदलण्याचे काम चालू होते. तरीही मुंबईतील वीजनिर्मितीद्वारे व उर्वरित दोन वाहिन्यांच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत सुरू होता.
“४) परंतु, सकाळी १० वाजून १ मिनिटांनी ४०० के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-२ तांत्रिक बिघाड झाल्याने बंद झाली आणि मुंबईची वीजव्यवस्था आयलॅंडिंगवर गेली. त्याचवेळेस टाटा पॉवरचे 500 मेगावॅट आणि अदानीचे 250 मे.वॅ.चे डहाणू येथील वीजनिर्मिती संच बंद झाल्यामुळे मुंबईतील वीजपुरवठा बाधित झाला.”
“अशा घटना सलग क्रमाने घडण्याची शक्यता संभवत नसली तरीदेखील ही घटना घडल्यामुळे आपल्याला यापुढील काळात अधिक सावधानता बाळगावी लागेल तसेच यंत्रणेत आवश्यकता भासल्यास अधिक सुधारणा कराव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.”

