HomeArchiveमहाराष्ट्राची `राजकीय’ वाटचाल!

महाराष्ट्राची `राजकीय’ वाटचाल!

Details
महाराष्ट्राची `राजकीय’ वाटचाल!

    02-May-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

योगेश वसंत त्रिवेदी
yogeshtrivedi55@gmail.com
“मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” म्हणून महाराष्ट्रात/मुंबईत प्रखर आंदोलन झाले. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली आणि 1957 च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने घवघवीत यश मिळविले. यशवंतराव चव्हाण यांनी, संयुक्त महाराष्ट्र आणि पं. जवाहरलाल नेहरू यांच्यात जर मला निवड करावयाची झाली तर मी पं. नेहरूंचीच निवड करीन अशी भूमिका घेतली होती. सदोबा पाटलांपासून मोरारजींपर्यंत काँग्रेसवाल्यांचा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला विरोध होता. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या हातात महाराष्ट्र गेला तर काँग्रेसचे काही खरे नाही, असा विचार करून विदर्भ महाराष्ट्रात सामील करण्याचे पाऊल उचलण्यात आले. त्यावेळी विदर्भातल्या 65 जागांपैकी काँग्रेसचे प्राबल्य जास्त असल्यामुळे यशवंतरावांनी विदर्भ महाराष्ट्रात घेऊन पं. नेहरूंना `तोहफा’च दिला. त्यामुळे 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्याचे `पुण्य’ पदरात पाडून घेत महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता स्थापित केली. योगायोग पाहा की 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर आणि यशवंतरावांचा सह्याद्री पंडितजींच्या हिमालयाच्या मदतीला धावून गेल्यानंतर मारोतराव कन्नमवार 21 नोव्हेंबर 1962 रोजी आणि त्यानंतर वसंतराव नाईक 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. मारोतराव आणि वसंतराव हे दोघेही विदर्भाचे होते. महाराष्ट्रात मराठवाडा आलेला होता आणि शंकरराव चव्हाण मराठवाड्याचे नेते. त्यांनी प्रादेशिक अस्मिता या मुद्यावरुन काँग्रेसच्या श्रेष्ठींकडे रेटा लावून 21 फेब्रुवारी 1975 रोजी मुख्यमंत्रीपद पटकावले.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा 1960 साली मिळाला खरा आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानीही झाली खरी पण मुंबई महाराष्ट्रात असली तरी मुंबईत महाराष्ट्र नव्हता. कारण मुंबईची सर्व आस्थापनांमध्ये मराठी माणसाऐवजी बिगर मराठी लोकांचीच भरती जास्त होती. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी, ते स्वतः आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यंगचित्रकार असल्याने 13 ऑगस्ट 1960 रोजी संपूर्णपणे व्यंगचित्राला वाहिलेले व्यंगचित्र साप्ताहिक `मार्मिक’ सुरू केले आणि त्यात मुंबईतल्या मोठमोठ्या आस्थापनांमधल्या अमराठी अधिकाऱ्यांची नावे ठळक अक्षरात छापून त्यावर `वाचा आणि थंड बसा’ हे शीर्षक दिले. मुंबईतला मराठी माणूस त्यामुळे पेटून उठला. महाराष्ट्रात सत्ता काँग्रेसची होती. पण मराठी माणसाची संघटना असावी, असा विचार पुढे आला आणि 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातले प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी 30 ऑक्टोबर 1966 च्या शिवसेनेच्या पहिल्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात `हा बाळ मी महाराष्ट्राला देत आहे’ असे म्हणत बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती शिवसेनेची सूत्रे सोपवली. शिवसेना हे नावसुध्दा प्रबोधनकारांनीच दिले.

मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि बाळासाहेबांचे संबंध चांगले होते. वसंतराव नाईक यांचीही हीच इच्छा होती की मराठी माणसांची संघटना असावी. त्यामुळे शिवसेनेला `वसंतसेना’सुध्दा संबोधण्यात काहीजण धन्यता मानत असत. संयुक्त महाराष्ट्र झाला असला तरी बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर यासह 865 मराठी भाषिक भाग हा कर्नाटकातच होता आणि बाबूराव ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रखर लढा उभारून हा भाग महाराष्ट्रात आणण्यासाठी परिश्रम घेतले. इथे शिवसेना महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न हाती घेऊन पेटवायला निघाली होती. 1969 साली शिवसेनेने प्रखर लढा उभारला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते दत्ताजी साळवी आणि मनोहर जोशी यांना अटक झाली. मुंबई पेटली होती. अखेर वसंतराव नाईकांनी बाळासाहेबांना मुंबई शांत करण्यासाठी आवाहन केले. बाळासाहेब ठाकरे यांनी तुरूंगातून शांततेचे आवाहन केले आणि आंदोलन स्थगित झाले.

मुंबई महाराष्ट्रात काँग्रेसबरोबरच समाजवादी आणि जनसंघ, शेतकरी कामगार पक्ष हेही चांगल्या स्थितीत होते. समाजवाद्यांचे प्रजा समाजवादी आणि संयुक्त समाजवादी असे पक्ष होते. 1966 साली शिवसेना मुंबई-ठाण्यात आली. मुंबई महापालिका निवडणुका 1968 साली आल्या. 1967 साली लोकसभेच्या निवडणुका होत्या. त्यात काँग्रेसबरोबर शिवसेना, समाजवादी, जनसंघही मैदानात उतरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शेड्युल कास्ट फेडरेशन रिपब्लिकन पार्टी ही होता. भाई डांगे यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष होता. 1967 साली शिवसेनेने काँग्रेसला ईशान्य मुंबईत मराठीच्या मुद्यावर स. गो. बर्वे यांना समर्थन दिले होते तर 1968 साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि प्रजा समाजवादी पक्षाची युती झाली. ठाण्यात शिवसेनेचे वसंतराव मराठे आणि सतीश प्रधानांनी जम बसविला होता.

1977 साली आणिबाणीनंतर राजकीय धृवीकरण होऊ लागले. 1977 साली भारतीय जनसंघ, समाजवादी पक्ष, भारतीय लोकदल आणि संघटना काँग्रेस यांची जनता पार्टी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनानंतर स्थापन झाली. 1971 च्या बांगला देश निर्मितीच्या वेळी इंदिरा गांधी यांनी घेतलेली भूमिका आणि मग त्यांची एकहाती राजवट याचे पर्यवसान आणिबाणीत झाले. आणिबाणीमुळे इंदिरा गांधींविरोधी असंतोष उफाळून आला आणि त्याचे रूपांतर सत्तापरिवर्तनात झाले. देशपातळीवर सत्तांतर झाल्यावर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले नाही तरच नवल. 1975 साली शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांनी 1977 साली काँग्रेस सोडून महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस स्थापन केला. शरद पवार यांनी समांतर काँग्रेस काढली. यशवंतराव चव्हाण आणि रेड्डी यांची चड्डी काँग्रेस, विदर्भातले नेते नाशिकरराव तिरपुडे आणि मुंबईतले बॅ. रामराव आदिक, पुण्याचे बॅ. विठ्ठलराव गाडगीळ हे इंदिरा गांधींसमवेत इंदिरा काँग्रेसमध्ये राहिले. 1978 साली वसंतदादा पाटील आणि नाशिकराव तिरपुडे यांच्या सरकारमधून राज्यमंत्री शरद पवार यांनी बाहेर पडून पुरोगामी लोकशाही दल स्थापन करत जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्षांना सोबत घेऊन वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी मुख्यमंत्रीपद पटकावले. शरद पवार हे महाराष्ट्राचे पहिले तरूण मुख्यमंत्री ठरले.

दिल्लीतले सरकार पडताच महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले. महाराष्ट्राची धुरा बॅ. अ. र. अंतुले या इंदिरानिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या हाती गेली. महाराष्ट्रात काँग्रेसी मुख्यमंत्र्यांचा पाळणा सातत्याने हालताच राहिला. बॅ. अंतुले यांच्यानंतर बॅ. बाबासाहेब भोसले, डॉ. शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री झाले. या दरम्यान काँग्रेसच्या बाहेर पडलेले नेते कासावीस होऊ लागले आणि यशवंतराव चव्हाण, शरद पवार, शंकरराव चव्हाण हे नेते स्वगृही परतले. फरक इतकाच होता की यशवंतराव चव्हाण यांना अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागला तर शरद पवार यांनी राजीव गांधी यांना औरंगाबादेत बोलावून जाहीर मेळाव्यात आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर हळूहळू भाजपा आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष एकमेकांच्या जवळ आले. 1989 साली प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भाजपा युती घडवून आणली. 1990 च्या निवडणुका शिवसेना व भाजपाने युती म्हणून लढवल्या आणि मग ही युती पुढे थेट 2014 पर्यंत एकत्र होती. 1992 च्या बाबरीच्या पतनानंतर शरद पवार केंद्रात संरक्षणमंत्री पदावरून महाराष्ट्रात येण्यासाठी कासावीस झाले होते. कारण सुधाकरराव नाईक या बहाद्दर मुख्यमंत्र्यांनी त्यांची झोप उडवली होती. 1993 च्या 12 मार्च रोजी झालेल्या बॉम्बस्फोट आणि तत्पूर्वीच्या दंगलीत परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचे खापर फोडून त्यांनी सुधाकररावांना पायऊतार व्हायला लावले. शरद पवार मुख्यमंत्री झाले.

1995 च्या विधानसभा निवडणुकीत युतीकडे 1990 साली हुकलेली सत्ता आली आणि पहिल्यांदा राजभवनाबाहेर शिवतीर्थावर 19 मार्च 1995 रोजी डॉ. मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाची तसेच गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अरबी समुद्राला लाजवील असा जनसागर शिवतीर्थावर लोटला होता आणि अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे असे दिग्गज नेते यावेळी हजर होते. 1999 ला मनोहर जोशी यांना बदलून बाळासाहेबांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री बनवले. पण 1999 साली लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घेण्याची चूक नारायण राणे यांना महागात पडली. 1999 साली विदेशी मूळ या मुद्द्यावर शरद पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. पण 1999 साली काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी स्वतंत्र निवडणुका लढवूनही शिवसेना-भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडी केली. फाजील आत्मविश्वास आणि असुरी महत्त्वाकांक्षामुळे युतीची सत्ता गेली होती. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या विलासराव देशमुख यांना पाठींबा दिला. 1978 नंतर 1995-1999 मध्ये राज्याला दोन पक्षांच्या सरकारमुळे उपमुख्यमंत्री मिळाला. मग युती आणि आघाडी सरकारांमध्ये खात्यांचे विभाजनही झाले. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण अशी 15 वर्षे आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले.

2014 साली देशात नरेंद्र मोदी नावाची लाट आली आणि देश व राज्यात सत्तापरिवर्तन झाले. दोन खासदारांनी सुरूवात करणाऱ्या भाजपचे 282 खासदार झाले आणि महाराष्ट्रातही 2014 साली देवेंद्र फडणवीस हा दुसरा तरूण मुख्यमंत्री पाहयला मिळाला. भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. 2014 साली काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपा यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या. पण सत्ता स्थैर्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत तडजोड केली. 2014 ते आजतागायत शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पार्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची सत्ता राबवली. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांना एकत्रित आणून देवेंद्र फडणवीस यांनी 18 फेब्रुवारी 2019 रोजी पुन्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युती निश्चित केली. 1997 साली नागपूरचे महापौरपद भूषविणारे फडणवीस 2014 ला थेट मुख्यमंत्री झाले आणि अल्पमतातले सरकार पाच वर्षे चालवून वसंतराव नाईकांनंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम त्यांनी केला. योगायोग म्हणजे देवेंद्र फडणवीस हेही विदर्भाचेच.

याकाळात रिपब्लिकन पार्टी, समाजवादी पार्टी, एम.आय.एम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे अनेक पक्षही महाराष्ट्रातल्या राजकारणात आले. काही काळाच्या ओघात पुढे तर काही मागे गेले. आता एका पक्षाची राजवट हा प्रघात बहुधा मागे पडला आहे. कारण युती आणि आघाडीशिवाय तरणोपाय नाही. एन. टी. रामाराव यांनी तेलगू अस्मितेसाठी तेलगू देसम पक्ष स्थापन केला आणि 9 महिन्यांत तो पक्ष सत्तेवर आला. पण मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेला महाराष्ट्रात सत्तेवर येण्यासाठी 1966 पासून 1995 सालापर्यंत वाट पाहवी लागली. तीही 45 अपक्ष आणि भाजपाला सोबत घेऊनच. बाळासाहेबांच्या भाषेतच सांगायचे तर, `तुम्हाला तुमच्या नशीबाप्रमाणे तुमचे सरकार मिळते’ हेच खरे आहे! जय महाराष्ट्र!!”
 

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content