Details
केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ६ डिसेंबरला दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर कोणत्याही नागरी सेवा-सुविधा देण्यात येणार नाहीत. मुंबई महापालकेने हा निर्णय घेतला आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना (दिनांक ६ डिसेंबर) निमित्ताने दादर येथील चैत्यभूमी स्मारक येथे करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीची मुंबईचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांनी काल (२० नोव्हेंबर २०२०) पाहणी केली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची संभाव्यता लक्षात घेता यंदा राज्य शासनासह महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याबाबतच्या कामकाजाचा विशेष आढावाही जयस्वाल यांनी यावेळी घेतला.
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंत्यविधी मुंबईत दादर चौपाटी परिसरात झाले, ती जागा चैत्यभूमी स्मारक म्हणून साऱ्यांसाठी वंदनीय आहे. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजे प्रतिवर्षी ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. त्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी व परिसरात वेगवेगळ्या सुविधांची कामे हाती घेतली जातात. प्रामुख्याने चैत्यभूमी येथे पुष्ट सजावट, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, दिवाबत्ती यांचा त्यात समावेश असतो. ही सर्व नियमित कामे सध्या सुरू आहेत.”
“यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा धोका पाहता तसेच त्याची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता, ती रोखण्यासाठी राज्य शासनासह बृहन्मुंबई महानगरपालिकादेखील सतर्क व सज्ज आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना प्रदान करुन हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तथापि, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करता यावे, कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. या कारणाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही. असे असले तरी, यंदा शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाईन व प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहेत, जेणेकरुन अनुयायांसह सर्वांना आपापल्या घरी राहून, स्थानिक स्तरावरुन अभिवादन करता येईल. प्रत्यक्ष चैत्यभूमी येथे न येता, अनुयायांना अभिवादन करणे शक्य व्हावे म्हणून थेट प्रक्षेपणाची ही विशेष सोय करण्यात येत आहे. त्याचीही माहिती जयस्वाल यांनी यावेळी जाणून घेतली.”
“चैत्यभूमी येथील पूर्वतयारीची पाहणी केल्यानंतर जयस्वाल यांनी लगतच्या इंदू मिल येथेही भेट दिली. इंदू मिल जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक साकारत आहे. महापरिनिर्वाणदिनी येणारे अनुयायी इंदू मिल येथेही येतात. त्यामुळे तेथे दरवर्षी नेमकी कशी व्यवस्था केली जाते, त्याची माहिती त्यांनी जाणून घेतली. या पाहणीप्रसंगी उपायुक्त (परिमंडळ २) विजय बालमवार, सहायक आयुक्त किरण दिघावकर, सहायक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.”

