HomeArchiveफसव्या साखळी योजनांचा...

फसव्या साखळी योजनांचा गळफास!

Details
फसव्या साखळी योजनांचा गळफास!

    05-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
चेन मार्केटिंग, मल्टिलेव्हल मार्केटिंग, इझी मनी स्कीम यासारख्या योजनांमधून पैसे कधीच दामदुप्पट होत नसतात. होते ती फक्त तुमच्या कष्टाच्या पैशांची लेव्हल. कितीतरी योजना आल्या नी गेल्या. शेरेगरची योजना, कल्पवृक्ष स्कीम, सागाची लागवड, इमू पालन आणि काय काय.. यात अनेकजण बुडाले, कफल्लक झाले. गडगंज झाले ते या योजना चालवून, गोरगरिबांचे पैसे घेऊन गाशा गुंडाळून फरार झालेले भामटे. हे भामटे रातोरात अशा योजनांच्या कार्यालयांना कुलूप लावून बेपत्ता होतात आणि पैसे गुंतवणाऱ्यांवर कपाळाला हात लावून बसण्याची वेळ येते. यात पैशाची हमी गुंतवणूकदारांना मिळत नसते. पण, आयोजकांना मात्र आयता आणि राजरोस पैसा मिळत राहतो. एक हजार ते पाच हजारांच्या पटीत गुंतवणूक असलेल्या या योजनांमधून कोट्यवधी रूपयांची माया गोळा केली जाते. महागड्या बक्षिसांच्या हव्यासापोटी, आकर्षक परताव्याच्या लोभाने अशा योजनांना राज्यात, देशात दररोज लाखोजण बळी पडतात. आपली कष्टाची कमाई या भामट्यांकडे सुपूर्द करतात.

ठाण्यातही नुकतीच झट्पट पैसे कमावून देण्याचे आमिष दाखवून लोकांना फसवणारी एक टोळी पोलिसांनी उजेडात आणली आहे. या टोळीतील भामट्यांनी बनावट कंपनी सुरू करून गुंतवणूकदारांना 7,50,000 रूपये गुंतवल्यास दरदिवशी एक टक्का असे 200 दिवसात 21 लाख रूपये देण्याचे आमिष दाखवले होते. जर मल्टीलेवल मार्केटिंगप्रमाणे कंपनीला आणखी सदस्य मिळवून दिले तर त्याच्या तीन टक्के दर आठवड्याला असे 200 दिवस मिळतील असेही मधाचे बोट लावण्यात आले होते. जवळपास 650 लोकांना या पाच जणांच्या टोळीने गंडा घातला. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने ही टोळी जेरबंद केली. पण त्याआधी या टोळीने रेडरॉक गेम, टिप्सझोन अड्वायजरी प्रा. लि. क्रिप्टो ट्रेड ड्ब्लुएस, जिआ कुल या नावाच्या बनावट कंपन्या उघडून 9 गुंतवणूकदारांकडून एकूण 1,40,27,500 /- रूपये उकळले होते.

या प्रकारची फसवणूक गेली अनेक वर्षे सुरू आहे. काही देशांमध्ये अशा योजनांना बंदी आहे. कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट परतावा देणाऱ्या या योजनांना पाँझी योजना म्हटले जाते. १९२० मध्ये चार्लस पॉन्झी याने अशा पद्धतीने मोठी फसवणूक केली होती. त्याच्या नावावरूनच या प्रकारच्या फसव्या योजनांना ‘पॉन्झी स्किम’ असे नाव पडले आहे. या योजनांमधून गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी एक वटहुकूमही काढण्यात आला होता. नव्या वटहुकूमान्वये अशा योजना सुरू करणाऱ्यांना १ ते १० वर्षे शिक्षा आणि अशा व्यक्तीशः २ लाख ते ५० कोटींपर्यंत दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण तरीही इझी मनीच्या मागे धावणाऱ्या लोकांसाठी भामटे असे सोनेरी जाळे वेळोवेळी टाकत असतातच. यामुळे लोकांनीही जागृत होऊन फसव्या आर्थिक योजनांपासून दूर राहण्याची गरज असते. या सर्व योजनांमध्ये परताव्याची साखळी बंद झाल्यास गुंतवणूकदाराला दुप्पट परतावाच नव्हे तर साधे मुद्दलही हाती लागत नाही.

योजनांचे प्रवर्तक रातोरात फरारी होतात आणि गुंतवणूकदारांना पोलिसांकडे धाव घ्यावी लागते वा न्यायालयाची पायरी चढावी लागते. ठाण्यातील या भामट्यांच्या टोळीचा सूत्रधार प्रकाश गोविंद मोरे हा खडकपाडा, कल्याण येथे राहतो. कंपनीचा संचालक म्हणवणारा संदीप गोविंद पाटील हा वाघबीळला प्रेस्टीज रेसिडन्सीमध्ये राहातो. या टोळीने गुंतवणूकदारांचे पैसे पद्धतशीरपणे सूरतला उमंग कनकभाई शाह याच्या खात्यावर वळवले होते. पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचल्यावर अजय महेशचन्द्र जरीवाला आणि रितेश सुरेशचंद्र पटेल या दोघांचीही नावे समोर आली आणि त्यांना बलसाडमधून उचलण्यात आले. अशा योजनांना फसू नका, आणखी कुणी या बनावट कंपन्यामध्ये गुंतवणूक केली असेल तर पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन आता उपायुक्त संजय जाधव यांनी केले आहे.

पोलीस त्यांचे काम जागरूकतेने करत असले तरी झटपट श्रीमंतीचे स्वप्न प्रत्येकालाच खुणावत असते. अशी सावजे ही मंडळी हेरत असतात. यातूनच दरवर्षी काही ना काही नवीन योजना बाजारात येतात. पद्धतशीरपणे या योजना पसरवल्या जातात. मग साखळी वाढत जाते, पैसे येत राहतात आणि एक दिवस सगळे थांबते. कृषिसंपन्न सधन ग्रामीण भागातही हे प्रकार वारंवार घडत असतात. पंछी उड जाता है, पिंजरा खाली रहता है.. शेकडो कोटींची माया गोळा करून अशा योजनांचे प्रवर्तक गुल होतात. आजवर अनेकांचे हात यात पोळले असले तरीही माणसाला दामदुप्पट, हजारचे लाख, लाखाचे कोटी अशा शब्दांचे जबरदस्त आकर्षण असते. यामुळे अशा आधीच्या योजनांमध्ये फसगत झालेल्या व्यक्तींच्या बातम्या वाचूनही माणसे धडा घेत नाहीत. कुठल्याही योजनेची सत्यता आधी पडताळून पाहा, आकर्षक परतावा देतो सांगणाऱ्या फसव्या योजनांच्या जाहिरातींना भुलू नका, फसवणूक झाल्यास सरकार व न्यायालयात दाद मागा, संघटित होऊन गुंतवणुकीची माहिती घ्या, हे गुंतवणूकदारांना नेहमी कानीकपाळी ओरडून सांगितले जात असते. तरीही, पुढच्यास ठेच, मागचा शहाणा ही उक्ती येथे दुर्दैवाने खोटी ठरते.”
 

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content