Details
योगेश वसंत त्रिवेदी
yogeshtrivedi55@gmail.com
दूरदर्शनच्या महाजनादेश कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि मग चटकन लेखाचं शीर्षक सुचलं. देवेंद्रपर्वाचा शिल्पकार! पण मग विचार केला की हा मर्यादित मुद्दा होईल. खरं म्हणजे ‘देवेंद्र पर्व सुस्साट’, ‘झंझावाती देवेंद्र पर्व’, हेच म्हणणे योग्य ठरेल. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे तसं पाहयला गेलं तर एकदम नवीन, ताजेतवाने नेतृत्त्व म्हणावे लागेल. देवेंद्र पर्वचे खरे शिल्पकार आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे. २०१३ साली भारतीय जनता पक्षाचे घटनादुरूस्ती अधिवेशन मुंबईत नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात भरले होते. नितीन गडकरी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि घटनादुरूस्ती करून त्यांना तीन वर्षांचा कार्यकाल आणखी एकदा वाढवून देण्यात येणार होता. हीच घटनादुरूस्ती राज्यांच्या अध्यक्षांनासुद्धा लागू करण्यात येणार होती. घटनादुरूस्ती झाली. परंतु अचानक पूर्ती कारखान्याचे नसलेले प्रकरण पुढे आले आणि गडकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजनाथ सिंह भाजपचे अध्यक्ष झाले.
महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते सुधीर मुनगंटीवार. घटनादुरूस्तीमुळे सुधीरभाऊ आणखी तीन वर्षे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहू शकत होते. परंतु गोपीनाथ मुंडे यांनी मुनगंटीवार यांना पुन्हा पदावर राहयला विरोध केला. मुनगंटीवार जर प्रदेशाध्यक्षपदावर कायम राहिले तर मी पक्षत्याग करीन, अशी भूमिका मुंडे यांनी घेतली. मुंडे यांनी मुनगंटीवार यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढे केले. एक अत्यंत अभ्यासू, उच्चविद्याविभूषित आणि तरूण असा नवा कोरा चेहरा देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने मुंडे यांनी पुढे आणला होता. १९९७ साली मुंडे महाराष्ट्रातील शिवशाही सरकारचे उपमुख्यमंत्री होते तेव्हा फडणवीस नागपूरचे महापौर होते. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की देवेंद्र फडणवीस विदर्भातील नेते आहेत ते नितीन गडकरी यांच्यासमवेत घनिष्ट संबंध असणारे नेते आहेत. मग गडकरी गटाच्या फडणवीस यांचे नाव मुंडे यांनी कसे काय सुचविले? पण, फडणवीस ना तर गडकरी गटाचे होते ना मुंडे गटाचे. ते आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक. झालं. फडणवीस भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर विराजमान झाले.
याचवेळी नरेंद्र मोदी यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. पायाला भिंगरी लावून मोदी यांनी संपूर्ण भारतात झंझावात निर्माण केला. २०१४ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत एकेकाळी दोन खासदार असलेल्या भाजपचे तब्बल २८२ खासदार निवडून आले आणि काँग्रेसेतर पक्षाला ५४३ सदस्य असलेल्या लोकसभेत पहिल्यांदा स्पष्ट बहुमत मिळाले. मोदी यांनी मनात आणलं असतं तर निव्वळ भाजपचे एकाच पक्षाचे बहुमताचे सरकार स्थापन करू शकले असते. पण त्यांनी तसे न करता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन केले. मंत्रिमंडळ बनविताना मोदी महाराष्ट्रातील नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांचा समावेश निश्चित करतील अशी अपेक्षा होती. परंतु केवळ गडकरी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता आणि मुंडे यांचा समावेश त्या यादीत नव्हता. तेव्हा महाराष्ट्रात एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते आणि फडणवीस प्रदेशाध्यक्ष असल्याने मुंडे यांनी फडणवीस आणि खडसे या दोघांना दिल्लीत बोलावून घेतले. फडणवीस आणि खडसे हे दोन्ही नेते नवी दिल्ली येथे पोहोचले. मुंडे यांनी या दोन्ही नेत्यांशी चर्चा केली आणि आपले नाव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या यादीत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
आता काय करायचं? मोदी यांच्या दरबारात जाणार कोण? अखेर फडणवीस प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना मोदी यांच्या दरबारात जाणे सहज शक्य होते. त्याप्रमाणे फडणवीस मोदी यांच्या दरबारात हजर झाले. त्यांनी मोदी यांच्यासमवेत चर्चा केली. मुंडे यांचा समावेश मंत्रिमंडळाच्या यादीत नसल्याचे सांगताना मोदी म्हणाले की, भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक येत्या दोन दिवसांत मी बोलाविणार असून या बैठकीत मुंडे यांचे नाव भाजपचे महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येणार आहे. मी जर आता मुंडे यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात केला तर त्यांचे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होईल. मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात भाजपचे सरकार मला आणायचे आहे. फडणवीस यांनी मोदी यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांच्यासमोर युक्तिवाद केला की, मोदीजी आपण म्हणता ते बरोबर आहे. पण, आपण दुसऱ्या बाजूने विचार केला की मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले आणि त्यांना जे कोणतेही खाते आपण द्याल तर त्या खात्यामार्फत येत्या सहा महिन्यांत महाराष्ट्राकडे निधी वळविला तर त्याचा आपल्या पक्षालाच फायदा होऊ शकेल. मोदी यांना फडणवीस यांचा हा युक्तिवाद तंतोतंत पटला आणि त्यांनी मुंडे यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात केला. दुर्दैवाने ३ जून २०१४ रोजी मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलली.
मुंडे यांच्या पश्चात भाजप आणि शिवसेना यांच्यात जो दुवा मुंडे यांच्या रूपाने होता तो निखळला होता. महाराष्ट्र भाजपमध्ये कोअर कमिटी स्थापन करण्यात आली. फडणवीस या समितीचे प्रमुख होते आणि त्यात मुनगंटीवार, एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश महेता यांच्याबरोबरीने पंकजा मुंडे यांचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १५ ऑक्टोबर २०१४ रोजी घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. २५ सप्टेंबर २०१४ रोजी गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना-भाजप युती तोडण्याची घोषणा खडसे यांनी केली. त्यानंतर केवळ अर्ध्या तासात १५ वर्षे महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची आघाडीसुद्धा तोडण्यात आली. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी मतदान घेण्यात आले आणि १९ ऑक्टोबर २०१४ रोजी मतमोजणी झाली. भाजप १२३ जागा जिंकून २८८ सदस्यांच्या सभागृहात अव्वल ठरला. सर्व विरोधकांना अंगावर घेऊन अभिमन्यूसारखी लढत दिलेल्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदरात ६३ जागा पाडून घेतल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पंधरा वर्षे सत्ता उपभोगलेल्या पक्षांना अनुक्रमे ४२ आणि ४१ जागाच मिळविता आल्या.
बहुमत कुणालाही मिळाले नाही म्हणून चाणाक्ष शरद पवार यांनी न मागता भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर करून टाकला. वास्तविक जनादेश भाजप आणि शिवसेना या दोघांना नैसर्गिक मित्र असा मिळून होता. पण २५ सप्टेंबर रोजी युती तुटल्याने दोन्ही पक्षांमध्ये गढूळ वातावरण निर्माण झाले होते. अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस यांच्या रूपाने नवा चाणक्य उदयाला आला होता आणि त्यांना पवार यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे २२ वर्षं जेवढी बदनामी सहन करावी लागली नाही तेवढी केवळ २२ दिवसांत सहन करावी लागली. १२ नोव्हेंबर २०१४ रोजी अल्पमतातील सरकारने बहुमताचे शिवधनुष्य उचलले खरे, परंतु तसे पाहता सरकार अल्पमतातलेच असल्याने ते जर पाच वर्षे टिकवायचे असेल तर शिवसेनेला सोबत घेणे अपरिहार्य होते. फडणवीस यांनी आपले विश्वासू सहकारी चंद्रकांत पाटील आणि धर्मेंद्र प्रधान यांना मातोश्री वर धाडले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत चर्चा घडवून आणली. १२३ भाजपचे तर ६३ शिवसेनेचे अशा १८६च्या मजबूत संख्येच्या आधारे भरभक्कम असे महायुतीचे सरकार ५ डिसेंबर २०१४ रोजी खऱ्या अर्थाने राज्यात अधिकारारूढ झाले.
भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महायुती सत्ताधारी बनली आणि त्यात विनय कोरे यांची जनसुराज्य पार्टीसुद्धा सामील झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे असा शेतकऱ्यांचा संप झाला. मराठा आरक्षणावर अठ्ठावन्न मोर्चे काढणारी मराठा क्रांती संघटना उदयाला आली. पंधरा वर्षे प्रश्न रेंगाळत ठेवणारे सत्ताधारी विरोधी पक्ष बनल्याने सैरभैर झाले होते. पण सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या जबरदस्त विश्वासाने राज्यशकट कुशलतेने चालविताना तारेवरची कसरत करीत मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षे पूर्ण केली आणि वसंतराव नाईक यांच्यानंतरचे सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा मान पटकावला. पाच वर्षांत राज्यात झालेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे स्थान पहिल्या क्रमांकावर आणले. पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्याला त्याची योग्य ती जागा दाखवून देत विधानमंडळ आणि बाहेर विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपल्या वक्तृत्वाने आणि कर्तृत्त्वाने धोबीपछाड देण्यात मागेपुढे पाहिले नाही.
महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना ६० हजार कोटी रूपये त्यांच्या खात्यात थेट जमा करण्याची कामगिरी बजावली आणि महाराष्ट्राच्या इतिहासात त्याची सुवर्णाक्षरांनी नोंद करणे राजकीय पंडितांना भाग पाडले. मराठा आरक्षणावर ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय घेऊन आजवरच्या तमाम मराठा नेत्यांना डोके खाजवायला भाग पाडले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती अभेद्य व्हावी म्हणून सॉफिटेल, मातोश्री आणि हॉटेल ब्ल्यू सी येथे भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत योग्य ती चर्चा केली आणि यापुढेही युती कायम राहवी यासाठी आपल्या ‘चाणक्य’नीति चे दर्शन घडविले. ‘यशस्वी देवेंद्र पर्व’ महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारताला दाखवून देताना भारतात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र येती काही वर्षे तरी हे समीकरण कायम राहील यासाठी फडणवीस यांनी कंबर कसली आहे. ठाकरे यांना फडणवीस यांनी आपला मोठा भाऊ असे संबोधताना मोदी हे ठाकरे यांचे मोठे भाऊ अशी उपमा दिली आणि योग्य ते संकेत दिले. २०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी फडणवीस यांनी व्यूहरचना आखली आहे. त्यांना त्यात यश येवो आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी नागरिकांना अच्छे दिन येवोत. जय महाराष्ट्र!

