HomeArchiveदहशतवादाचे उगमकेंद्र!

दहशतवादाचे उगमकेंद्र!

Details
दहशतवादाचे उगमकेंद्र!

    21-Feb-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
पाकिस्तानाच्या आयएसआयच्या प्रेरणेने मसूद अझरच्या इशाऱ्यावर भारतीय निमलष्करी दलाच्या बस ताफ्यामध्ये पुलवामा इथे स्फोटकांनी भरलेली गाडी घुसवण्यात आली आणि त्या भीषण व संतापजनक दहशतवादी कृत्यामध्ये भारतीय केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४४ जवान मारले गेले. त्याचा निषेध जगभर केला गेला. पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांनी त्याविरोधात दोन दिवसांनंतर भाष्य केले. त्यात त्यांनी दहशतवादी कृत्याचा निषेध केलाच नाही, ते करणाऱ्यांवर कारवाईची भाषा केलीच नाही. उलट ती घटना फार महत्त्व देण्यासारखी नाही असा सूर लावला. निर्लज्जपणाची हद्द म्हणजे पाक पंतप्रधानांनी भारताला धमकावले की आमच्या विरोधात काही पाऊल उचललेत तर, त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ! भारताबरोबर बोलणी करण्याची आमची तयारी आहे असेही इम्रान खान म्हणाले.

पुलवामा हल्ल्यानंतर सर्व बाजूंनी टीकेचे धनी झालेला पाकिस्तान “बॅकफूट’वर गेला असला तरी जबाबदारी झटकण्याची त्यांची सवय कायम असल्याचेच यातून सिद्ध झाले. भारताने कृती करण्याइतपत सबळ पुरावे दिल्यास हल्ल्यास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करू, असे तुणतुणेही पंतप्रधान खान यांनी लावले. मुंबईवरील हल्ल्यानंतरही पाकिस्तानने हाच कांगावा केला होता. त्यांच्या या भंपक वक्तव्याला भारताने चोख उत्तरही दिले आहे. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, पुलवामा येथे सुरक्षा दलावर झालेला हल्ला ही दहशतवादी घटना असल्याचे मान्य करण्याचे पाकिस्तानी पंतप्रधानांनी नाकारणे ही भारतासाठी आश्‍चर्याची बाब नाही. पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वाधिक बळी ठरलेला देश असल्याचा त्यांचा दावा वस्तुस्थितीशी विसंगत असून, पाकिस्तान हेच दहशतवादाचे उगमकेंद्र असल्याचे आंतरराष्ट्रीय जगतात मान्य झालेले वास्तव आहे, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.

तुम्हाला याआधीच्या कितीतरी दहशतवादी कारवायांतील पाकिस्तानी लष्कराच्या सहभागाचे पुरावे दिले. त्याचे काय लोणचे घातलेत तुम्ही? मुंबईवरील 26 सप्टेंबर 2008 च्या दहशतवादी हल्ल्यावेळीही पाकच्या सहभागाचे पुरावे भारताने दिले होते. पठाणकोट लष्करी तळावर जो हल्ला याच जैश ए मुहंमदच्या दहशतवाद्यांनी केला होता. त्यावेळीही अझरच्या विरोधातील पुरावे दिले होते. काय कारवाया केल्यात? इम्रानची सतत बाजू घेणाऱ्या सिद्धूलाही जनतेने चांगलाच दणका दिला आहे. त्याची हकालपट्टी टीव्ही कार्यक्रमातून झालीच आहे आणि पंजाबच्या विधानसभेतच त्याची संभावना गद्दार म्हणून करण्यात आली आहे. आता तरी तो गप्प बसतो का हे पाहवे लागेल. इम्रान खान यांना पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदिर सिंह यांनीही परस्पर उत्तर दिले असून मसूद अझरवर आधी कारवाई करून दाखवा. मुंबई बाँबस्फोटाचे खटले चालवून दाखवा. मग टिवटिव करा असे बजावले आहे.

दहशतवादाविरोधात लढण्यासाठी तसेच दहशतवादापासून बचाव करण्यासाठीही भारताला विनाअट लागेल ती मदत करण्याचे आश्‍वासन इस्राईलने दिले आहे हेही लक्षणीय आहे. आम्ही तुम्हाला अमर्याद मदत करू, अशी ग्वाहीही इस्राईलने दिली आहे. दहशतवादी हल्ल्यांविरोधात कारवाईसाठी इस्राईलची पद्धत वापरण्याची मागणी सरकारकडे होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर इस्राईलने दिलेल्या या आश्‍वासनाला महत्त्व आले आहे. बचावासाठी भारत आमच्याकडे कोणत्याही प्रकारची मदत मागू शकतो. आम्ही आमच्या या जवळच्या मित्राला हरतऱ्हेची मदत करू. दहशतवाद हा केवळ भारत आणि इस्राईलचा प्रश्‍न नसून संपूर्ण जगाचा आहे. त्यामुळेच दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आम्ही आमच्या या अत्यंत महत्त्वाच्या मित्राला सर्व प्रकारची माहिती आणि युद्धतंत्र देण्यास तयार आहोत असे इस्राईलने भारताला अधिकृतरीत्या कळवले आहे, हे विशेष.

जेव्हा पुलवामाचा हल्ला झाला त्याच्या दोनच दिवसआधी पाकमधील दहशतवाद्यांनी इराणमध्ये घुसून इरणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या बसवर स्फोट घडवला. त्यात वीस जवान मारले गेले. इराणने पाकिस्तानच्या पदरात त्या हत्त्यांचे माप घातले आहे. इराणच्या लष्करप्रमुखांनी इशारा दिला आहे की, पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात व त्यांच्या म्होरक्यांच्या विरोधात कारवाई नाही केली तर पाकमध्ये घुसून कारवाई करण्याचा आमचा आधिकार अबाधितच आहे. तेच आता भारतालाही पाकला बजवावे लागेल. पाकिस्तान जे भारतात उगवू पाहत आहे ते दहशतवादाचे पीक त्यांच्या देशात उगवते आहे. पश्चिम सीमेवरील वजिरिस्तान भागाचा ताप पाकला आहे व त्यावरून त्यांचे अफगाण सरकारशी बिनसले आहे. वजिरिस्तानमध्ये पख्तुन आणि बलुची टोळ्यांच्या जनतेला पाकचे लष्कर छळत आहे. त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी याच फेब्रुवारीमध्ये 7 तारखेला पाकला फटकारले होते. त्याचाही लाभ भारताला उठवता येऊ शकतो.
भारत, इराण आणि अफगाणिस्तान अशा तीन्ही शेजारी देशांबरोबर पाकिस्तान असे दहशतवादाचे छुपे युद्ध खेळतो आहे. केवळ चीनच्या पाठबळावर त्याच्या या उड्या सुरू आहेत.

चीनला पाकचा इतका पुळका का आहे? मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवले पाहिजे या भारताच्या संयुक्त राष्ट्रांकडे सुरू असलेल्या मागणीला चीन सातत्याने का अडवत आहे? संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चीन कायमस्वरूपी सदस्य आहे व त्या जोरावर चीन कोणताही ठराव नकाराधिकार वापरून फेकून देऊ शकतो. तेच करून चीन मसूदला सध्या संरक्षण देत आहे. 2016 मधील पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने मसूद अझरच्या विरोधातील कारवाईची मागणी चार वेळा केली. अमेरिकेने तसा ठराव मांडला तो चीनने फेटाळून लावला. अमेरिका, फ्रान्स व इंग्लंडने या मागणीला पाठिंबा दिला आहे. याच तीन देशांनी चार वेळा मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याचे प्रयत्न केले. चीनला त्या मसूदचा इतका पुळका का येतो आहे. कारण चीनचे आर्थिक घोंगडे पाकमध्ये अडकले आहे. चीनच्या पश्चिमेकडील झिनजिआंग प्रांतापासून ते पाकच्या पश्चिम किनाऱ्यावरील अरबी सागरावरील ग्वादार बंदरापर्यंत चीन पाक आर्थिक कॉरिडॉर (सीपीइसी) हा महाकाय प्रकल्प चीन सरकार चिनी कंपन्यांच्या सहकाऱ्याने उभा करत आहे. त्यात 45 लहान मोठे प्रकल्प समाविष्ट असून हजारो चिनी कामगार तंत्रज्ञ सद्या पाकमध्ये राहत आहेत.

ग्वादार बंदराचा व अनेक एसईझेडचा विकास पूर्ण होत आला आहे. ग्वादारपासून चिनी सीमेपर्यंत भलामोठा महामार्ग बांधण्यात येत आहे. त्याच्या अवतीभोवतीची हजारो हेक्टर जागा चिनी कंपन्यांना पाकने दिलेली आहे. त्यावर विशेष चिनी वसाहतीही उभ्या राहत आहेत. या महाकाय प्रकल्पात चीन व चिनी कंपन्यांनी 40 बिलिअन डॉलर्सची म्हणजेच सुमारे अठ्ठावीस ते एकोणतीस लाख कोटी रूपयांची महाप्रचंड गुंतवणूक आताच केली आहे. आणखी कितीतरी मोठा पैसा चीन त्यात घालणार आहेत. या सर्व गुंतवणुकीमधून चीन आयात-निर्यातीचे स्वस्त मार्ग तयार करीत आहे. युरोप व आफ्रिकन खंडाशी अतिपूर्वेचा व्यापार त्यातून वाढणार असून त्यामधून चीनचा पैसा परत येणार आहे. या सर्वात चीनला पाकचे, पाकच्या लष्कराचे व त्यांनी पोसलेल्या अतिरेक्यांचेही सहकार्य हवे आहे. चीनच्या झिनजिआंग प्रांतामध्ये मुस्लमी अतिरेकी उगवले आहेत. तिथे त्यांच्या कारवाया वाढू नयेत त्यांना जैश वा अफगाणी तालिबान्यांची मदत मिळू नये या स्वार्थापोटीही चीन या अतिरेक्यांना आंतरराष्ट्रीय दबावापासून वाचवत आहे. 2008 मध्ये हाफीज सईद त्याच्या जमात उद् दावा संघटनेला अशाच प्रकारे चिनी संरक्षण लाभले होते. पण मुंबई हल्ल्यानंतर जो आंतरराष्ट्रीय दबाव तयार झाला त्यात चीनला हाफीज सईदला दहशतवादी ठरवण्यास मान्यता द्यावी लागली. आताही भारताने आंतरराष्ट्रीय दबाव तयार केला आहे. फ्रान्स आता पुन्हा मसूद अझरला दहशतवादी ठरवावे असा प्रस्ताव संयुक्त राष्टरात दाखल करत आहे. त्याला पुरेसा पाठिंबा भारताला मिळवावा लागेल.”
 

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content