HomeArchive.. ते डायलॉगबाजीइतके...

.. ते डायलॉगबाजीइतके सोपे नाही!

Details
.. ते डायलॉगबाजीइतके सोपे नाही!

    10-Jan-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
तिकडे जालन्यात अमित शाह गुरकावून पटक देंगे, म्हणाले आणि इकडे लगेच शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी भारतीय जनता पार्टीला रोडरोमिओ ठरवून टाकले. बऱ्याबोलाने युती करा नाहीतर आमच्या विरोधातील सर्वांचाच पराभव करू, असे अमित शाह यांनी शिवसेनेला धमकावल्यावर संजय राऊतांपासून रामदास कदमांपर्यंत सर्वच चवताळून डायलॉगबाजी करू लागले आहेत. अफजलखानाला महाराष्ट्रातील मावळ्यांनीच गाडला असे राऊत म्हणतात तर, रामदास कदम हे कोणीही शिवसेनेला महाराष्ट्रात आव्हान दिलं तर आम्ही त्याला गाडून टाकू, म्हणत फुरफुरत आहेत. शिवसेना अटकेपार नेण्याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षेचा रामदासभाईंना बहुदा या भाजपाला गाडून टाकण्याच्या आवेशात विसर पडला असावा. नाहीतर त्यांनी फक्त महाराष्ट्रापुरता आवाज दिला नसता.

मोदींची लाट असताना महाराष्ट्रात शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले होते. आता तर त्यांचं काहीच नाही, असा टोला कदम यांनी लगावला. चौकीदार चोर आहे, असे उद्धव आधीच म्हणाले होते. आता मराठवाडा दौऱ्यावर असतानाही त्यांनी हेच टीकास्त्र भाजपावर सोडले. पटक देंगे, गाडून टाकू अशी आव्हाने-प्रतिआव्हाने दोन्ही पक्षांकडून दिली जात असली तरी पडद्याआड युतीची बोलणी सुरू आहेत. मातोश्री आणि वर्षा यांचा संपर्क अबाधित आहे, अशी खबर काही माहितगार देत असतात. यात तथ्य मानले तर ही लुटूपुटीची लढाई मतदारांनीही समजून घ्यायला हवी. विरोधी पक्षांची आघाडी सध्या विस्कळीतच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपाचा समझोता झाला असला तरी मनोमिलन झालेले नाही. अशावेळी एकत्र लढण्यापेक्षा वेगवेगळे लढून मतविभागणी झाली तर विजयपताका आघाडीच्या घरावर चढणार आहे हे भाजपा आणि शिवसेना या दोघांनाही माहिती आहे. यामुळेच राऊत यांचे बोचरे बोल असोत वा रामदासभाईंचा झणझणीत तडका हे सर्व निवडणुका जाहीर होईपर्यंतच सुरू राहील.

अमित शाह जालन्यात ज्या सभेत बोलले तिथेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वबळाची भाषा केली. लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४० जागा जिंकण्याची तयारी ठेवा, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. तरीही दोन्ही पक्ष लोकसभा, विधानसभेसाठी जागावाटप आणि विधानसभेच्या दृष्टीनेच दबावतंत्र अवलंबत आहेत हे एकूण घडामोडी पाहता लक्षात येते. शिवसेनेचे दुखणे सत्तेवर आल्यापासूनच सुरू झाले असले तरी या कुरबुरीला जाहीर आणि तीव्र स्वरूप गेल्या दोन वर्षांत आले आहे. मोदी यांना थेट लक्ष्य करायला तर उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षातच सुरूवात केली आहे. दुष्काळ, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, दुष्काळग्रस्तांना मदत यावरून मोदी सरकारवर तुटून पडणारे उद्धव आता थेट मोदींना लक्ष्य करत आहेत. मोदी यांची संभावना थेट चौकीदार चोर आहे.. अशी करणाऱ्या उद्धव यांच्या आत्मविश्वासात, राम मंदिराचा मुद्दा घेऊन अयोध्येला जाऊन आल्यापासून प्रचंड वाढ झाली आहे. राफेल व्यवहार ते वित्तीय घोटाळे याबद्दल ते मोदी यांना फटकारत असतानाच शिवसेना निदान काहीतरी करते आहे, भाजपा आणि राज्य-केंद्र सरकार काहीच करत नाही, असे चित्र लोकांसमोर मांडू लागले आहेत. संधीसाधू येती घरा, समजा निवडणुका आल्या, असे ते बीड येथे म्हणाले. युतीची चर्चा गेली खड्ड्यात, पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करता ते बोला!, असे तडाख्यात बोलणारे उद्धव ग्रामीण भागातील निराशेने घेरलेल्या शेतकऱ्यांना, जनतेला आकर्षित करणार हे नक्की. पण, कोरडी भाषणं, कोरड्या घोषणा आणि फोटोंपुरती काही मदत करून हंडे भरत नाहीत, हा त्यांचाच डायलॉग भाजपाही तितक्याच प्रभावीपणे वापरू शकते. तसे झाले तर उद्धव ठाकरे यांना वेगळी नीती अवलंबावी लागेल.

युती झालीच नाही किंवा पडद्याआडची बोलणी फिसकटली तर त्यांचा सामना देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यासारख्या प्रभावी वक्त्यांशी होणार आहे. संवादफेकीत मोदीसाहेब सर्वांपेक्षा सरस आहेत आणि जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तशी त्यांच्या वाणीला धार चढू लागली आहे. नव्या रूपातील, नव्या दमाचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांना नित्य अडचणीत आणू पाहात असले, आरोपांची राळ उडवत असले, चौकीदार म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत असले तरी मोदी खूप वेगळी चीज आहेत. चौकीदारच या चोरांना आत टाकणार आणि २०२२ मध्ये गरीबांसाठीच्या घरांचे उद्घाटनही मीच करणार, असा सोलापूर येथे त्यांनी बुधवारीच मारलेला डायलॉग, त्यांचे आणि भाजपाचे पुढचे डायलॉग काय असतील याची झलक दाखवून गेला. निवडणुका जवळ आल्या आहेत हे तर सर्वच जाणतात. यामुळेच उद्धव म्हणतात तशा संधीसाधूंच्या फेऱ्या वाढू लागल्या आहेत. आता लोकांच्या कल्याणासाठी भविष्यवेधी घोषणांचे तुंबळ वाकयुद्ध तरबेज वक्त्यांमध्ये सुरू होईल. एकट्याने लढण्याचा निर्णय शिवसेनेने खरोखरीच टिकवला तर या सगळ्याचा सामना उद्धव आणि त्यांच्या सेनानींना अनेक पातळ्यांवर करावा लागणार आहे. तिथे फक्त डायलॉगबाजी कामाला येणार नाही.”
 

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content