Details
किरण हेगडे
Kiranhegde17@gmail.com
“राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री, हे निवासस्थान असलेल्या मुंबईतल्या वांद्रे कलानगरमधला चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मुंबईतल्या आरोग्य यंत्रणेने आता मुख्यमंत्री ठाकरे तसेच त्यांच्या कुटुंबियांवर विशेष लक्ष ठेवले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.”
“मुंबईतल्या वांद्रे परिसरात कोरोनाचे काही रूग्ण आढळल्यानंतर मुंबई महापालिकेने वांद्रे पूर्व परिसराला हॉट स्पॉट म्हणून जाहीर केले. मुंबई महापालिकेच्या एच ईस्ट वॉर्डात हा परिसर येतो. या संपूर्ण वॉर्डात कोरोनाचे २५ रूग्ण आढळले आहेत. या त्यामुळे हा सर्व परिसर सील केला गेला असून प्रत्येक घरातल्या व्यक्तीची माहिती गोळा करण्याचे काम सध्या चालू आहे. संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली जात आहे. या सर्व कारवाईतच सोमवारी वांद्रे पूर्वेला असलेल्या कलानगरमधील एका चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान याच कलानगरमध्ये आहे. तेथील दोन नंबरच्या गेटजवळ असलेल्या चहाच्या टपरीवरील हा चहावाला आहे. मातोश्री बंगल्याच्या सुरक्षेसाठी जवळजवळ २०० पोलिसांचा ताफा येथे असतो. यातील बहुसंख्य पोलीस याच टपरीवर चहा प्यायला जातात. त्यामुळेच येथे तैनात असलेल्या सर्वच्या सर्व पोलिसांना नजीकच असलेल्या उत्तर भारतीय संघाच्या इमारतीत क्वारंटाईन करण्यात आले आहे. हेच पोलीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी तसेच चिरंजीव, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांचे बंधू तेजस ठाकरे यांच्या वैयक्तिक बॉडीगार्डच्या संपर्कात आले असले शकू असतात. त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या अंगरक्षकांची टीमही ताबडतोब बदलण्यात आल्याचे कळते. या साऱ्या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबियांना कोरोनाची बाधा झाली आहे का, याची चाचपणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या सर्व कुटुंबाला फारच सावध राहण्यास सांगण्यात आले असून त्यांच्यावर बारीक नजर ठेवण्यात आल्याचे समजते.”
“दरम्यान, काल देशभरात ४६७१ कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ४२८१ बाधितांची नोंद असल्याचे सांगितले. यातील १२८ जणांचा मृत्यू झाला तर ३४३ जणांना यशस्वी उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. ४२०० रूग्णांवर सध्या विविध रूग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत. राज्यात सोमवारी आणखी १२० नव्या रूग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ८६८ झाली आहे. मुंबईत आतापर्यंत ५२६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यातील ३४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.”
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ हजार ५६३ नमुन्यांपैकी १५ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरीता निगेटिव्ह आले आहेत तर ८६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३२ हजार ५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३४९८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
“निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ८ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत. तर, प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशीममधील आहे.”
राज्यातील ज्या भागात रूग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्याठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई परिसरातील इतर मनपा क्षेत्रातही क्लस्टर कंटेनमेंट योजना राबविण्यात येत आहे. कल्याण मनपा क्षेत्रात १७५ सर्वेक्षण पथके काम करत आहेत तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात २१४ टीम कार्यरत आहेत. नवी मुंबई मनपा क्षेत्रात १७८ टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. अहमदनगर जिल्हयात ७१ तर बुलढाणा जिल्ह्यात १४७ सर्वेक्षण पथके काम करत आहेत. राज्यात याप्रकारे एकूण २८५५ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १० लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
“राज्यात कालपर्यंत झालेल्या ४५ मृत्यूंच्या विश्लेषणातून पुढील महत्त्वपूर्ण निष्कर्ष निघतात–एकूण मृत्यूंमध्ये पुरूषांचे प्रमाण (७३%) एवढे आहे. ४५ वर्षांखालील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून साधारणपणे म्हणजे ६०% मृत्यू ६१ वर्षांवरील व्यक्तींचे आहेत. कालपर्यंत झालेल्या एकूण ४५ मृत्यूंपैकी साधारणपणे ७८ टक्के व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर आजारही होते. ६० वर्षांवरील आणि मधुमेह – उच्च रक्तदाब असे आजार असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता या विश्लेषणातून अधोरेखित झाली आहे.”

