Details
जागतिक जलदिन नि आपण!
22-Mar-2019
| 1
”
विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
kharevinay196509@gmail.com
पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र जगभरात आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, अयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. सध्या पाकिस्तानमुळे तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता दिसत असली किंवा नाही झालं तर पुरेसे पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जाते इतके त्याचे महत्त्व आहे!
पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असून पाणी बचत ही काळाची गरज होऊन बसली आहे. यामुळेच पाण्याच्या बचतीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या १९९२ मध्ये झालेल्या अधिवेशनात २२ मार्च हा ‘जागतिक जलदिन’ म्हणून निश्चित करण्यात आला. त्यानंतर १९९३ मध्ये २२ मार्च रोजी पहिल्यांदा ‘जागतिक जलदिन’ म्हणूनही साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘रियो डि जेनेरियो’मध्ये या दिवसाची सुरूवात झाली. पाणी बचतीबाबत जगभरात जागरूकता करणे हा प्रमुख उद्देश यामागे आहे. संयुक्त राष्ट्राने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी सगळे वचनबध्द असल्याची आठवण यादिवशी केली जाते. स्वच्छ पेयजल, पेयजलाची उपलब्धता कायम ठेवणे, जलसंवर्धन, ताज्या पाण्याच्या स्रोतांना वाचवणे आणि विविध देशांमध्ये याच्याशी निगडीत राबवण्यात येणाऱ्या ठोस कार्यक्रमांना प्रोत्साहित करण्याची शिफारस संयुक्त राष्ट्राने केली होती. जागतिक जलदिनानिमित्त लोकांना या बाबीची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला जातो की, ताज्या पाण्याचे महत्त्व काय आहे आणि कशाप्रकारे त्यांच्या स्रोतांना वाचवले जाऊ शकते.
पृथ्वीवर तीन भाग पाणी आणि एक भाग जमीन आहे. परंतु, असे असतानाही पिण्यायोग्य पाणी अल्प प्रमाणात आहे. पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होणार आहे. नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनं मिसळली जात आहेत. परिणामी, नद्या प्रदूषित होत आहेत. यासाठी पाणी प्रदूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. नाही तर पाण्यासाठीच होईल तिसरे जागतिक महायुद्ध.. जगातील 78 कोटी लोक असे आहेत, की त्यांना पिण्याजोगे पाणी मिळत नाही. मानवाला जगण्यासाठी लागणार्या मुलभूत गरजांमध्ये पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भविष्यात पाणी टंचाईची समस्या आणखी गंभीर होईल. कदाचित पाण्यासाठीच तिसरे जागतिक महायुद्ध होईल, असा इशाराही संयुक्त राष्ट्राने अनेकदा जागतिक जलदिनानिमित्त दिलेल्या अहवालद्वारे दिला आहे.
अनेक देशांच्या नजरा भारताकडे
आगामी काळात २०२५ पर्यंत जगातील काही देशात पाणी पेटणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात गेल्या वर्षी उद्भवलेली पाणीटंचाई निवारली गेली नाही. कारण, पाण्याची तळी, स्त्रोत आटले आहेत. सुरक्षा लावून पाणीवाटप होतंय. आशिया खंडाबाबत सांगायचे झाले तर भारतात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहे. नद्यांचा प्रवाह आणि पाणीवाटपावरून भारत, पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. भारत आणि पाकिस्तानात सिंध, चिनाब, रावी, झेलम आणि सतलज नदीच्या पाण्याच्या वाटपावरून वाद सुरू आहे.
सिंधू नदी करार..
भारत आणि पाकिस्तानात सिंधू नदीच्या पाणीवाटपावरून १९६० मध्ये करार झाला होता. करारानुसार भारत सिंधू नदीचा प्रवाहात कोणताही बदल करणार नाही. कारण, सिंधू नदी भारतात उगम पावते. भारताने सिंधू नदीचा प्रवाह बदलला तर पाकिस्तानात दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल. आतापर्यंत भारताने कराराचे कोणते उल्लंघन केलेले नाही (सिंधू वॉटर ट्रीटी). जम्मू-काश्मीरमध्ये भारत बेकायदा पाणी अडवत असल्यामुळे त्याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. दुसरीकडे भारताने पाकिस्तानकडून होणारा प्रत्येक आरोप फेटाळून लावला आहे. यामुळे दोन्ही देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देश एकमेकांकडे कट्टर शत्रू म्हणूनच पाहताना दिसत आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत तीन युद्धे झाली आहेत.
भारत-बांगलादेश व चीन
पाण्यावरून भारत आणि बांगलादेशात पहिले युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत आणि बांगलादेशात गंगेच्या पाणी वाटपावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. दोन्ही देशांचे अधिकारी दरवर्षी या मुद्यावर चर्चा करतात. परंतु ठोस निर्णय घेतला जात नाही. भारत-बांगलादेशात गंगा नदीच्या पाण्याबाबत १९९६ मध्ये एकतीस वर्षांचा करार झाला होता. चीन, आसामच्या वरच्या भागात ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधत आहे. त्यामुळे भविष्यात ब्रह्मपुत्रा नदी सुकण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाणीवाटपावरून दोन्ही देशात वाद पेटण्याची चिन्हे आतापासून दिसू लागली आहेत. चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर आतापर्यंत तीन धरणे बांधून पाणी अडवले आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर धरणे बांधून वीजनिर्मिती करण्याचा चीनचा इरादा आहे. मात्र यामुळे भारतातच नव्हे तर बांगलादेश आणि भूटानमध्ये भयंकर पूरस्थितीचा धोका आणखी वाढणार आहे. चीनने ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह बदलला तर बांगलादेशात भयंकर परिस्थिती निर्माण होईल. सध्या भारत आणि चीनमध्ये अनेक वर्षांपासून ब्रह्मपुत्राच्या पाणीवाटपावरून चर्चा सुरू आहे. मात्र, आतापर्यंत त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. नेपाळच्याही पाण्यावरून कुरबुरी चालूच आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे. उदा. २०१५ची संकल्पना होती पाणी व शाश्वत विकास – कारण पाण्याच्या अविचारी वापराने खरा विकास न होता आपले जीवन भकास होईल. तहान लागल्यावर विहीर खणू लागल्याने पश्न सुटत नाही. त्यासाठी खूप नियोजन लागते.हे लक्षात घेऊन या बाबींकडे सर्वांचेच सतत लक्ष असले पाहिजे. पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे.पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे. जगात गोड्या पाण्याचे प्रमाण मुळातच फार कमी आहे. पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे. साधी तरीही अत्यंत महत्त्वाची कृती, ती म्हणजे स्वत:ला खरोखरी किती पाण्याची गरज आहे हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले आणि या मुद्याचा प्रसार केला तरी खूप काही साधेल!
एक व्यक्ती कसं काय पाणी वाचवणार.. याप्रकारे विचार करून आपण दररोज पाणी वाया घालवतो. आत्ताच्या या जगात सर्व लोक आपल्या घरांमध्ये मोठी-मोठी न्हाणीघरं बांधण्याच्या मागे धावत आहेत. परंतु आपण हे विसरत आहोत की पाण्याशिवाय हे सर्व व्यर्थ आहे. आपण आपल्या गरजेपेक्षा अधिक पाणी पिण्यासाठीदेखील वापरतो, खर्च करतो. आपल्यापैकी प्रत्येकजण कमीतकमी आपल्या घरांमध्ये आणि कार्यालयामध्ये पाणी जपून वापरू शकतो. कित्येकदा आपण बघतो की रस्त्याशेजारील पाण्याचा नळ विनाकारण चालू आहे आणि पाणी वाया जात आहे. आपण त्या बाजूने जातो, परंतु तो वाहणारा नळ बंद करण्याचा विचार आपल्या मनात डोकावत नाही. ग्लासभर पाणी घेऊन अर्धे फेकून देतो. या छोट्या गोष्टींवर विचार करणे गरजेचे आहे आणि आपल्या रोजच्या जीवनात जितके शक्य आहे तितके पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विजेचा वापरदेखील आवश्यकतेनुसार केला पाहिजे. इच्छेनुसार नाही. जेव्हा आवश्यकता आहे तेव्हाच विजेच्या उपकरणांचा वापर केला पाहिजे.
महाराष्ट्र कुठेय?
नुकतीच बातमी वाचनात आली. बडोदा जीएसटी आयुक्तालय अभिनव उपक्रम राबवतेय. सुभानपुरा येथील कार्यालयात, RO पाणी शुद्धीकरणातून नि वातानुकूलित यंत्रणेतून वाया जाणारं पाणी पुनर्वापरासाठी घेण्याचा निर्णय करून यंत्रणा बसवलीय. यामुळे वर्षांला १४.७ लाख लिटर पाण्याची बचत होईल, जे सांडपाणी म्हणून गटारात जातं. तेथील प्रकल्पाचे जे. एस. सेहरा यांनी ही माहिती दिली. R O यंत्र एक लिटर पाणी शुद्ध करण्यास तीन लिटर पाणी वापरते. त्याचा वापर भांडी, लादी धुणे, इतर स्वछतेसाठी गेले सात महिने केला जातोय. त्याचे कोणतेही दुष्परिणाम आढळले नाहीत. बसवण्याचा खर्च नगण्य असून एकदाच करायचा आहे. या इमारतीत सात R O यंत्र तर १२२ वातानुकूल यंत्रे आहेत. गेल्या दोन वर्षांत इव्हेंट साजरा करणाऱ्या राज्य सरकारला यंदा भान नाही आचारसंहितेपूर्वी पाणीबचतीचा कार्यक्रम घेतला असता तर? पण तितका स्मार्टनेस आहे कुठे? आधीच्या बचत मोहिमेत काय फलनिष्पत्ती हे मांडले जातंच नाही. शेवटी सामान्य सामान्यच असतो. सरकारी कार्यालयात वीज, पाणीबचतीचे मार्ग कोण चोखळतेय का? याचं उत्तर नकारात्मक आहे. शेवटी मग धावा देवाचा, चुका मनुष्याच्या!”

