HomeArchiveजगताप-बारणे यांच्या मनोमिलनामागे...

जगताप-बारणे यांच्या मनोमिलनामागे दडलंय काय?

Details
जगताप-बारणे यांच्या मनोमिलनामागे दडलंय काय?

    11-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी
bhosale.vijay53@ gmail.com
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेणारे आणि गेली काही वर्षे राजकीय हाडवैर असलेले आमदार लक्ष्मण जगताप आणि खासदार बारणे यांनी अखेर देशहितासाठी दोन पावले मागे येत गळ्यात गळा घालून आपले राजकीय मतभेद मिटवले आहेत. आपले मतभेद होते, मनभेद नव्हते, असे सांगून त्यांनी जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले आहे. जगताप आणि बारणे यांना आजपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीने दिलेल्या सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता मिळवली. देशहित म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन पावले मागे घेत असल्याचे सांगून मनोमीलन केले. हे मनोमिलन खरे आहे की नाही याचा विश्वास कार्यकर्त्यांना बसणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण, 2009 पासून ते आजपर्यंत जगताप-बारणे यांचे राजकीय वैर असून जगताप यांनी अखेरपर्यंत लोकसभा मतदारसंघ व उमेदवार बदलण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्याला यश आले नाही. कारण, जगताप यांनाच शिवसेनेने ऑफर दिल्यामुळे त्यांनी अखेर नाद सोडला आणि ताठर भूमिका घेत बारणे यांना खिंडीत पकडले. शिवसेनेचे संपर्क नेते संजय राऊत, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जगताप यांच्याकडे शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. अखेर संकटमोचक महाजन यांना शिष्टाई करण्यात यश आले आणि जगताप-बारणे यांचे नाट्य संपुष्टात आले. या दोन नेत्यांनी नेमके देशहित काय आहे हे आता जनतेला स्पष्ट करावे म्हणजे समाधान होईल.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेत अनेकजण निवडून आले. मोदी यांनी आपल्या वक्तृत्त्वशैलीने देशातील जनतेवर छाप पाडली. मात्र, प्रत्यक्षात ज्यावेळी नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी, शेतकर्यां ची कर्जमाफी, वाढती महागाई या मुद्द्यांवर मोदींचे सरकार पूर्णतः ’बॅकफुटला’ गेले. एवढेच नव्हे तर राफेल विमानाच्या खरेदीवरून राहुल गांधी यांनी मोदी यांना लक्ष केले असता आजपर्यंत ते समोरा-समोर येऊन उत्तर देऊ शकले नाहीत. शिवाय रिजर्व्ह बॅकेकडून राखीव निधीतून सुमारे दीड लाख कोटी रूपयांचा मागितलेला निधी यावरून रिजर्व्ह बँकेचे गर्व्हनर यांनी दिलेला राजीनामा, अनेक अर्थतज्ञांनी याला केलेला विरोध यावरून मोदी सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. एवढेच नव्हे तर वारंवार 70 वर्षांत काँग्रेसने काय केले? असा चुकीचा प्रचार करून जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न केला.

वास्तविक 70 वर्षांत काँग्रेसने काय केले यावर नजर टाकण्याची आवश्यकता असून काय केले हे पुढील माहितीवरून स्पष्ट होईल. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला तर मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला. देश स्वतंत्र झाला त्यावेळी एका अद्वितीय संविधानाची निर्मिती 26 जानेवारी 1950 रोजी झाली आणि देशात संविधान लागू झाले. त्यावेळी मोदी यांचा जन्मही झालेला नव्हता. 1950 मध्ये पहिल्या एशियन खेळाचे आयोजन करण्यात आले होते. 1954 मध्ये आपल्या देशात भाभा अणुशक्ती केंद्र स्थापन करून काम सुरू करण्यात आले. त्याचदरम्यान देशभरात डझनभर आयआयटी, आयआयएम उघडली होती. शेकडो विद्यापीठे उघडली होती. या विद्यापीठांतून व संस्थांमधून जे टॉप क्लास विद्यार्थी घडले, त्यातले काही परदेशात गेले व तेथे स्थायिक झाले. आणि ज्यावेळी मोदी परदेशात गेले त्यावेळी त्याठिकाणी जो मोदी-मोदी जल्लोष ऐकायला मिळाला. तो याच नतदृष्टांचा. 1950 मध्ये खरगपूरला पहिली आयआयटी आणि आयआयएम सुरू झाली. 1961 मध्ये कोलकात्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंन्ट म्हणजे आयआयएम ही संस्था सुरू झाली. याचवर्षी पोर्तुगीजांना गोव्यातून हाकलून देऊन गोवा या खंडप्राय देशात विलीन केला. 1962-63 मध्ये भाकरानानगल नावाचे मोठे धरण बांधून झाले. आपल्या देशात विमानाचे असेब्लींग आणि हेलिकॉप्टर निर्मिती 1964 मध्ये सुरू झाली. तेव्हा देशाच्या जवानांनी लाहोरपर्यंत धडक दिली होती. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भारतीय सैन्यात वाहनचालक होते. 1969 मध्ये तारापूर अणुशक्ती केंद्र सुरू झाले. त्यावेळीच ’इंडियन स्पेस रिसर्ज आर्गेनाझेशन’ देशात अस्तित्त्वात आले.

1970 च्या दरम्यान देशात इंदिरा गांधी यांचे तडफदार नेतृत्त्व आले. या नेतृत्त्वाने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश नावाचा एक नवा देश जन्माला घातला. धर्माधिष्ट संकल्पनेच्या आधारावर निर्माण झालेल्या पाकिस्तानचे दोन तुकडे होत असताना त्यावेळी धर्म बिलकूल आडवा आला नाही. त्याचवेळी देशाने पहिले परमाणू परिक्षण केले ते 1974 मध्ये. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यांनी 1991 दरम्यान सुपर कॉम्युटर, माहिती व तंत्रज्ञान अशी क्रांती आणली आणि देशाने प्रगतीच्या क्षितिजावर भरारी मारली. त्यानंतर राजीव गांधी यांची हत्त्या झाली. नरसिंह राव पंतप्रधान झाले. त्यावेळी देश मोठ्या आर्थिक संकटात होता. देशाचे सोने जागतिक बँकेकडे गहाण ठेवण्यात आले होते. मात्र, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंह नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते. सिंह यांनी पंतप्रधान राव यांच्या सहाय्याने देशात आर्थिक उदारीकरणाची सुरूवात करून देशाला संकटातून बाहेर काढले. हे सिंह पुढे या देशाचे दहा वर्षे पंतप्रधान होते. याचदरम्यान देशात चंद्रयान, मंगळयान, जीएसएलव्ही, मेट्रो, मोनो रेल, आंतरराष्ट्रीय विमानतळ, जहाजे, सबमरिन्स, पृथ्वी, अग्नी, पिनाक नावाची मिसाईल्स, तेजस, चेतक, धनुष्य नावाचे हेलिकॉप्टर, सुखोई, मिग नावाची फायटर विमानांची निमिर्ती केली. अशा अनेक गोष्टी या देशात 70 वर्षांत झाल्या. तरीही 70 वर्षांत काही झाले नाही. असे जर पंतप्रधान मोदी सांगत असतील तर दुर्देव म्हणावे लागेल. 2014 मध्ये मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. अनेक काँग्रेसच्याच योजना त्यांनी पुढे आणल्या आणि सरकारच्या पाठीवर थाप मारून घेतली. हा 5 वर्षांचा इतिहास सर्वांना माहितच आहे. मात्र, वारंवार या देशात काँग्रेसने काहीच केले नाही, हा बिंबवण्याचा जो भाजपने प्रयत्न केला. त्यामुळे 70 वर्षांत देशाने प्रगती कशी केली हे जाणिवपूर्वक सांगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशहितासाठी एक पाऊल मागे आलो, हा जगताप व बारणे यांचा दावा हा पूर्णतः चुकीचा आहे.

गेल्या काही वर्षांत राजकारणात पक्षनिष्ठा याला तिलांजली दिली जात आहे. व्यक्तीपुजेला महत्त्व आल्यामुळे प्रत्येक पक्षातच जो उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षम, निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाते. या बाजारीकरणात मतदारदेखील तितकाच दोषी आहे. कारण, उमेदवारांचे चारित्र्य, शिक्षण, अभ्यास, सामाजिक भान या बाबी आता पाहिल्या जात नाहीत. त्यामुळेच गुंड आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राजकारणात मोठ्या प्रमाणात आल्यामुळे राजकारणाचा ट्रेंड बदलला आहे. जगताप आणि बारणे यांचे हाडवैर आहेच. गेल्या 10 वर्षांतील या दोघांचा अभ्यास केला असता या दोघांचे राजकीय मतभेद इतक्या टोकाला गेले होते की ते मिटणे अशक्य होते. मात्र, भाजपला पुन्हा देशात सत्ता आणायची आहे आणि मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करावयाचे आहे. त्यादृष्टीने खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून जगताप यांना सबुरीचा सल्ला दिला. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही राज्यात सत्तेत सहभागी असताना एकही दिवस असा गेला नाही की शिवसेनेने भाजपला लक्ष केले नाही. त्याउलट मुख्यमंत्र्यांसहीत भाजपच्या अन्य नेत्यांनीही शिवसेनेला धारेवर धरले होते.

मात्र, देशातील बदलेले राजकीय वातावरण पाहता भाजपला एकहाती सत्ता मिळेल, अशी परिस्थिती नाही. हे लक्षात येताच खुद्द पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी थेट मातोश्री गाठून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन झाले गेले गंगेला अर्पण करत गळाभेट घेतली. आणि शिवसेनेला हव्या असलेल्या जागा देऊन कोकणातील नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणाही करून घेतली. एकमेकांना पाण्यात पाहणारी शिवसेना आणि भाजपा आता एकमेकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यामुळे मावळमध्ये जगताप-बारणे यांचे जे मनोमीलन झाले याचे आश्चर्य नाही. कारण राजकारणात कोण-कोणाचा वैरी कायमचा नसतो. अथवा मित्रही कायमचा नसतो. त्यामुळे अशा घटना घडत असतात. मात्र, या सगळ्या घडामोडींमुळे मतदार मात्र मूर्ख ठरत असतो. जगताप-बारणे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जणू काही आमच्यामध्ये वादच नव्हता असा आभास निर्माण केला. दोन लाखांच्या मताधिक्याने बारणे यांना निवडून आणणार असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केल्यामुळे बारणे यांना जणू काही आभाळ ठेंगणे झाले असल्याचा आभास झाला असावा.

राष्ट्रवादी काँग्रेसने सुरूवातीपासूनच अनेक चुका केल्यामुळे आज खुद्द शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर आपला नातू आणि मुलासाठी हातापाया पडण्याची वेळ आली आहे. या शहरात एकाच व्यक्तीला व त्याच्या घरातील सदस्यांना किती पदे द्यायची याचा कधी विचार केला नाही? त्यामुळे ठराविक नेते मोठे आणि मातब्बर झाले. त्याचा फटका आज राष्ट्रवादीला बसत आहे. या शहरात अनेक सामान्य नगरसेवक निवडून आले. कित्येकांना आपल्या टेलिफोन, मोबाईलचे बिल भरता आले नाही. मात्र, काहींची अवस्था दयनीय असताना त्यांना पदांवर पदे मिळाल्याने आज ते कोट्याधीश आणि उद्योगपती झाले आहेत. त्यामुळे कित्येक वेळा महापालिकेतील वेगवेगळ्या समिती निवडणुका आणि महत्त्वाच्या पदांच्या निवडणुकीत नेत्यांनी सांगूनदेखील परस्पर उमेदवार बदलले आहेत. त्यावेळेस जर योग्य दखल घेतली असती तर आज कोणी हिंमत केली नसती. याच गोष्टींचा फायदा घेऊन या शहरातील राष्ट्रवादी संपविण्यात आली. याचा कधीतरी विचार करून सर्वांना समान न्याय दिला तर प्रत्येकजण हा प्रामाणिकपणे काम करेल. मात्र, हे राजकीय गणित चुकल्यामुळे साहेब आणि दादा यांना आज हातपाय जोडण्याची वेळ आली आहे. आजही राष्ट्रवादीचे काहीजण केवळ नेत्यांसमोर प्रचारात देखावा करत आहेत, याची दादांनी दखल घ्यावी. कारण, आता जगताप-बारणे यांच्या मनोमिलनाने आपणास अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर भाजपचे चुकीचे राजकारण जनतेसमोर आणून जागृती करण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहे. हे करत असताना दोन्ही पक्षातील मतभेद आणि पाडापाडीचे राजकारण आता तरी बाजूला ठेवा. तरच काँग्रेस-राष्ट्रवादीला ’अच्छे दिन’ आहेत.”
 

Continue reading

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...

तृप्ती देसाईंच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंचा पलटवार!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिला नेतृत्त्वावरून नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत तातडीची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही नेत्यांमधील...

युद्धाच्या वणव्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!

पश्चिम आशियातील युद्धाचा ३१वा दिवस जागतिक अर्थव्यवस्थेसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे थेट पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड...
Skip to content