HomeArchiveकाँग्रेसच्या अस्तित्त्वाचा प्रश्न...

काँग्रेसच्या अस्तित्त्वाचा प्रश्न आहे!

Details
काँग्रेसच्या अस्तित्त्वाचा प्रश्न आहे!

    09-Mar-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

संदीप अंभोरे, उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
sandeep.ambhore4@gmail.com
लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता कधीही जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर भाजपने आपली विरोधाची हत्यारे म्यान करत शिवसेनेला मनवण्यात यश मिळवले आहे. सेना-भाजपची युती झाल्यानंतर सत्तेची स्वप्न पाहणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची मात्र झोप उडाली आहे. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना आता आघाडीचे नेते गोंजारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. एक, दोन जागा देण्याची भाषा करणारे आता आठ जागा देण्याच्या बाता मारत आहेत. खरेतर पायाखालची जमीन सरकायला लागल्यावर आघाडीच्या नेत्यांना सुचलेले हे शहाणपण आहे.

जवळपास एक वर्षापासून प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत युती करण्याची भाषा करत होते. वंचित बहुजन आघाडीची स्थापना पंढरपूरमध्ये झाल्यादिवसापासून त्यांनी यासाठी जाहीर भूमिका मांडली. मात्र त्यांच्या या प्रयोगाला फारसे महत्त्व न देता त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सातत्याने झाला. भाजपबद्दल लोकांना चीड आहे. लोक भाजपवर नाराज आहेत. त्यांच्यावर नाराजी आहे, म्हणून लोक आम्हाला निवडतील, अशा तोर्‍यात काँग्रेस होती. युतीची बोलणी करताना छोट्या घटकपक्षांना कमी लेखण्याची काँग्रेसची जुनी नीती आहे आणि हाच काँग्रेसचा खरा चेहरा आहे.

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही काही दिवसांपूर्वी असाच आरोप केला होता. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये बसपासोबतही काँग्रेसने असेच घाणेरडे राजकारण केले. त्यामुळेच मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बसपासोबत काँग्रेसची युती होऊ शकली नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मायावती यांच्यासोबत युती करण्याची तयारी दर्शवली होती. भाजपला हरवायचे असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे ते त्यावेळी म्हणाले होते. मात्र जागावाटपात अत्यंत कमी जागा देऊन जर बोळवण करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असेल तर कोणताच राजकीय पक्ष असे होऊ देणार नाही. झालंही तसच बसपाने या राज्यांत स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. शेवटी बसपाच्याच पाठींब्याने मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केली.

मायावती यांनी समर्थन देतानाही काँग्रेसला कानपिचक्या दिल्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, काँग्रेस आणि भाजपा दोन्ही एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. यापुढे जाऊन त्या म्हणाल्या की, एक सापनाथ आहे तर दुसरा नागनाथ आहे. परंतु भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही काँग्रेसला समर्थन देत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. एवढ्यावरच न थांबता यापुढे कोणत्याच राज्यात काँग्रेससोबत युती न करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. लगोलग उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबतचा जागावाटपाचा फॉम्युला लोकांसमोर मांडून काँग्रेसच्या पारंपारिक दोन जागांवर उमेदवार न देण्याचा चाणाक्षपणा दाखवला. या निर्णयातून त्यांनी काँग्रेसला त्यांच्याच चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न करून काँग्रेसला त्यांची जागा दाखवली.
अ‍ॅड. आंबेडकरांनीही अशाचप्रकारचे वक्तव्य करून काँग्रेसचा मुखवटा लोकांसमोर टराटरा फाडला.

2014मध्ये भारिपला एकही जागा देण्यास इच्छुक नसणार्‍या काँग्रेसने आता वंचित बहुजन आघाडीला सुरूवातीला दोन, नंतर चार आणि आता त्यापेक्षाही जागा वाढवून देण्याची भाषा वापरली आहे. मात्र शेवटपर्यंत झुलवत ठेवून नंतर पायाखाली तुडवण्याची काँग्रेसची नीती पुरती ओळखणार्‍या आंबेडकरांनी कणखर भूमिका घेतली. आम्ही 22 उमेदवार घोषित केले आहेत आणि आता माघार नाही. आता जर समझोता करायचा असेल तर 22 जागा सोडून बोला, असे आंबेडकरांनी ठणकावून सांगितले.

अ‍ॅड. आंबेडकरांच्या या भूमिकेचे समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत झाले आणि होत आहे. ते वंचित, दलित, मुस्लिम आणि कष्टकरी समाजाच्या मनातलं बोलत आहेत, अशा प्रतिक्रिया लोक देतात. त्यांच्या सभेत गेल्यास याची प्रचिती येते.

त्यातही कधी नव्हे ते बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेल्या राजगृह या निवासस्थानी एखाद्या पक्षाचं शिष्टमंडळ येते. ही घटना आंबेडकरी समाजातील प्रत्येकाच्या मनामनात प्रचंड आनंद निर्माण करणारी होती. त्यामुळे प्रकाश आंबेडकर जी भूमिका घेत आहेत, नेमकी तीच भूमिका आंबेडकरी समाजातील प्रत्येकाच्या मनात आहे, असे लोक सांगतात. कधी नव्हे ते रिपब्लिकन चळवळीचा नेता एवढा ताकदवर झाल्याचे पाहून लोकांची मने हर्षित झालेली आहेत. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यामुळे अ‍ॅड. आंबेडकरांच्या मागे लोकांचा रेटा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यांच्या सभांमधील गर्दी बघून अनेकांच्या काळजात धडकी भरली आहे. त्यात स्वकीय तर आहेतच पण परक्यांनासुद्धा घाम फुटला आहे. दोन जागांच्या आठ जागा त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीला सोडण्याची आता भाषा व्हायला लागली आहे. अ‍ॅड. आंबेडकरांच्या राजकीय ताकदीचा हा परिणाम आहे.

नरेंद मोदींची भीती दाखवून लोकांना भयभीत करायचे आणि मोदी नको म्हणून आम्हाला मतदान करा, अशी एकूणच काँग्रेसची रणनिती या निवडणुकीत असणार आहे. त्याची सुरूवात पाच राज्यांतील निवडणुकांत त्यांनी केली. बघा, आम्हाला निवडून द्या अन्यथा मोदी येईल, अशी भीती दाखवून सत्ता मिळवणे एवढाच काँग्रसचा अजेंडा आहे. काँग्रेसला वाटतय की, आपल्याशिवाय लोकांकडे पर्याय नाही. मोदींची भीती दाखवून सत्तेत बसायची अशी स्वप्ने आघाडीच्या नेत्यांना दिवसाढवळ्या पडायला लागली होती. मात्र सेना-भाजपची युती झाल्यानंतर ती आशाही मावळली. आता आघाडीला आंबेडकरच तारू शकतात याची काँग्रेसच्या नेत्यांना कल्पना आली. त्यामुळेच ते आता त्यांच्यासोबत समेटाची भाषा करत आहेत. याऊलट प्रकाश आंबेडकरांनी जवळपास वर्षभरापासून काँग्रेसला टाळी देण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेकडून कधीची प्रतिटाळी आली नाही. उलट त्यांना काँग्रेसने शेवटपर्यंत किंमत दिली नाही. दलित नेत्यांना आपण खिशात घेऊन फिरतो. सत्तेचा एखादा तुकडा फेकला की, दलित नेते ताटाखालचे मांजर होतात. हीच प्रतिमा काँग्रेसच्या नजरेत दलित नेत्यांबद्दल होती. प्रकाश आंबेडकरांनाही ते याच मापात मोजत असतील कदाचित! म्हणूनच 22 जागी उमेदवार घोषित होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली असावी.

प्रकाश आंबेडकरांनी मात्र आपण बाबासाहेबांचे नातू आहोत हे दाखवून दिलं आणि आता समझोता नाही, असे सांगत जाहीर केलेल्या 22 जागा सोडून उर्वरित जागांबाबत बोला, अशी भूमिका घेतली. त्यांच्या भूमिकेला समाजातून प्रचंड पाठींबा मिळत आहे. मुळात ते लोकांच्या मनातील खदखद बोलून दाखवत आहेत, अशाच सर्वांच्या भावना आहेत. त्यांनी सुरू केलेला वंचित बहुजन आघाडीचा झंझावात आता कोणालाही थांबवणे शक्य नसल्याचेही लोक बोलत आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या प्रयत्नांनी कधी नव्हे ती नेत्यांची नव्हे तर समाजाची एकी झालेली पाहयला मिळत आहे. समाज आंबेडकरांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनीशी उभा आहे. त्यामुळे आता काँग्रेसलाच तडजोड करून आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. कारण राज्यातल्या संपूर्ण 48 जागा लढवल्या तरीही वंचित बहुजन आघाडीकडे गमावण्यासारखे काहीच नाही, याचा विचार काँग्रेसच्या नेत्यांना करावाच लागेल. कारण प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या नव्हे तर काँग्रेसच्या अस्तित्त्वाचा आहे.”
 

Continue reading

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...

तृप्ती देसाईंच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंचा पलटवार!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिला नेतृत्त्वावरून नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत तातडीची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही नेत्यांमधील...

युद्धाच्या वणव्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!

पश्चिम आशियातील युद्धाचा ३१वा दिवस जागतिक अर्थव्यवस्थेसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे थेट पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड...
Skip to content