HomeArchiveकल्याणकरांचे कहाँ गया...

कल्याणकरांचे कहाँ गया उसे ढूँढो!

Details
कल्याणकरांचे कहाँ गया उसे ढूँढो!

    19-Jan-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
‘कुणी वंदा कुणी निंदा’ दर पाच वर्षांनी येणार्‍या लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांत कल्याण-डोंबिवलीकरांना फसवणे हाच आमचा धंदा! हा विकासाच्या नावाखाली शिवसेना-भाजपाच्या कृपेवरून सुरू असलेला नाट्यप्रयोग लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर न खेळला जाईल तर नवलचं. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये देशाचे विकासपुरूष तथा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेले. त्यांनी नवी मुंबईत उभारल्या जाणार्‍या प्रकल्पाचे कल्याणमध्ये जाहीर सभा घेवून भूमिपूजन केले. नवी मुंबईतील प्रकल्पासाठी कल्याणमध्ये भूमिपूजन कशासाठी? याच काहीएक अर्थबोध कल्याणकरांना वा नवी मुंबईकरांना झाला असेल तर मिळवली.

वाहतूकोंडीने सदा बेजार, शहरातील अनेक रस्त्यांची लागलेली वाट आणि महामार्गावर स्वागताला पदोपदी असलेले खड्डे अशी आमच्या बकाल-भकास कल्याणची ओळख. या कल्याणचे कल्याण करण्यासाठी पंतप्रधान येणार असल्याने येथे करोडो रुपयांचा चुराडा करून एका दिवसापुरते का होईना कल्याण चकाचक करण्यात आले. रस्ते-गल्लीबोळ साफसूफ करून शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन कल्याणमध्ये त्यादिवशी जणू ‘विकास’ दाखल झाल्याची जाणीव अनेकांना झाली. पण, काही तासानंतर ‘कहाँ गया उसे ढूँढो’, असे म्हणण्याची वेळ कल्याणकरांवर आली. आपले पंतप्रधान दमदार भाषण ठोकत होते नि हवेत आश्वासनांची विकासाची गाजरे आपोआप उडत होती. विकासाचा मळा हा हा म्हणता फुलत होता. पंतप्रधानांच्या या भाषणबाजीवर फिदा होऊन कल्याणमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी नवीन वर्षाचे स्वागत मोदींच्या नावाचे निषेधात्मक फलक तयार करून फुग्यांद्वारे आकाशात सोडून केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा फुग्याला बांधून बाय-बाय मोदी, नये सालकी नई पुकार हटाव मोदी सरकार! असा प्रेमभावही व्यक्त केला.

कल्याणमधील पंतप्रधानांच्या भाषणातील घोषणाबाजी त्यांना नक्कीच भावली असावी. अहो नेहमीप्रमाणे काय सुस्साट.. संवादाची फेकाफेक केली आपल्या पंतप्रधानांनी. अगदी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी गाजराचे तोरण, त्यांनी सभा घेतलेल्या फडके मैदान परिसरातील दुकाने बंद, लालचौकी परिसरातील स्मशानभूमीही बंद आणि निषेध करणार्‍या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही आधीच उचलले. मोदीजी विकास की बात करणार म्हणून किती तो तामझाम. यावेळी पंतप्रधांनी पावणेतीनशे किमीचे मेट्रोचे जाळे उभारणार, अशी घोषणा करूनच टाकली. आपले मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत आश्वासने आणि आकड्यांचा खेळ इतका केला की आजतागायत कल्याणकरांना मुख्यमंत्र्यांचा विसर पडू शकला नाही. ते पुन्हा लोकसभेला येतील सभेसाठी मैदान शोधतील अन् पुन्हा विकासाचे बाण हवेत मारून जातील.

अहो.. त्याआधी शिवसेनेतील युवराजांची एन्ट्री झाली. विकास आणि शिवसेना हे अतूट नातं असल्याने कल्याण-डोंबिवलीचा डोळ्यांत भरलेला असा जो काही विकास झाला तो फक्त शिवसेनेमुळेच. शहर नियोजन, स्मार्ट शहर आणि इथले खड्डेमुक्त रस्ते तर जागतिक पातळीवर दखल घेण्यासारखे. शहर स्वच्छतेबाबत नवी मुंबई शहराला मिळालेला नंबर काढून खरतरं कल्याणलाच दिला पाहिजे. अहो.. इतकं कशाला कल्याणमध्ये हवेत उडणारी रिक्षा चालवली तरी इच्छित स्थळी लवकरच पोहोचू, असे रस्ते आमच्या शिवसेनेने केले आहेतच. मग.. आमचे युवराज इथे आले आणि ठाण्याच्या धर्तीवर कल्याणमध्येही हवेत उडणार्‍या रिक्षा दाखल करू, अशी घोषणा केली तर जळफळाट होण्याचं कारण काय? त्यांनाही तुम्ही फेकू कसं ठरवता? कल्याणकरांना जरा जपून कल्याणमध्ये जो काही विकास आहे तो फक्त शिवसेना-भाजपामुळेच. कल्याणमध्ये कोणतेही विकासकाम रखडले तर सेना-भाजपाचे पक्षश्रेष्ठी झोपत नाहीत. मुख्यमंत्री तर विकासनिधीचे जे-जे आकडे आपण फुगवून सांगितले आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी फायलींवर फायली नजरेखालून घालत आहेत. कल्याणमध्ये स्मार्ट सिटी पार्कच्या भूमिपूजनासाठी आलेले आमचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे लवकरच कल्याणमध्ये हवाई रिक्षा सुरू करणार असल्याने कल्याणकरांनो आता निश्चिंत राहा! तुम्हाला वाहतूकोंडी, डागडुजीअभावी मोडकळीस आलेले पूल आणि खराब रस्त्यांवरून ये-जा करावी लागणार नाही. कारण आता फक्त हवेत उडून रिक्षा प्रवास करायचा आहे!

असे चिडू नका, मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पहिल्यापासून कल्याण-डोंबिवलीवर विशेष प्रेम आहे. इथली जनता काही घोषणा केली तरी समजून घेते. निवडणुकीत शांतपणे आम्हालाच मतदान करते, हे जाणून असल्याने कल्याणकरांसाठी हवेतल्या बाता नव्या नाहीत. तरीही काही शहाणी कंपनी सोशल मिडियावरून उगाच टीकास्त्र डागते.

कल्याण शहरात येण्यासाठी पत्रीपूल, दुर्गाडी पूल, शहाड उड्डाणपूल, वालधुनी पूल हा प्रमुख एन्ट्री पॉईंट असून येथे सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. शहरात येताच वाहतूककोंडी आपल्या स्वागताला असते. वाहतूककोंडीमुळे शहरवासीय जेरीस आले आहेत. स्टेशन परिसराला बकालपणा आला असून बेशिस्तपणे उभ्या राहणार्‍या रिक्षांमुळे व एसटी डेपोत येणार्‍या बसेसमुळे येथे प्रचंड वाहतूककोंडी होत असते. येथे उभारलेला स्कायवॉक फक्त शोभेचे बाहुुले ठरत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याने महिलांना पाण्यासाठी दाही दिशा करावी लागत आहे. महापालिकेच्या रूक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात पुरेशी व्यवस्था नसल्याने कल्याणकरांना मुंबईची रूग्णांलयांची वाट धरावी लागत आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या वासाने व धुराने कल्याणकरांच्या आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. केडीएमसीच्या अग्निशमन दलात अद्ययावत साधनसामग्री नसल्याने तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू होतो, हे या शहरासाठी व येथील सत्ताधार्‍यांसाठी किती भूषणावह आहे. गटार, नाले, मलवाहिन्या, सार्वजनिक शौचालय असे अनेक मुलभूत प्रश्न प्रलंबित आहेतच. हा कल्याण-डोंबिवली शहराच्या चहूबाजूला नांदत असलेला ‘विकास’ सर्वांना उघड्या डोळ्यांनी बघता यावा, यासाठी आमचे युवराज आदित्य जर कल्याणकरांसाठी हवेत उडणारा रिक्षा आणत असतील तर त्यात गैर काय?

विकास आणि कल्याण शहराचे अतूट नाते आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दर पाच वर्षांनी शहरवासीयांना विकासाचे चॉकलेट दाखवतात. ते कल्याणकरांना आवडतेही. मग हवेत रिक्षा असो अथवा करोडो रुपयांच्या आकड्यांचा खेळ असो, घोषणा करणारे मुख्यमंत्र्यांचे भाषण आम्हा कल्याणकरांना भावतेच.”
 

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content