HomeArchiveलायन ऑफ लडाख

लायन ऑफ लडाख

Details
 

 
  
 
 
विनय गजानन खरे 
ज्येष्ठ पत्रकार

 

“आपल्या देशाला शूरवीरांची परंपरा पुरातन काळापासून आहे. भारत वर्षात अनेक प्रांतातून असे योद्धे आढळतात, ज्यांनी त्या त्या काळात आपल्या पराक्रमाची शर्थ करून शत्रूवर मात केली नि खडे चारले. अगदी स्वातंत्र्याचे दुश्मन इंग्रज असून सुद्धा त्यांच्या बाजूने लढतांना पहिल्या दुसऱ्या महायुद्धात अनेकांनी शौर्य गाजवले नि त्याबद्दल पदकं ही मिळवली. असाच एक योद्धा ज्याने आपल्या हयातीत दोन महावीर चक्र आपल्या पराक्रमाने मिळवली. त्यांना लडाखचा सिंह म्हणून ओळखले जाते, अनेकांना हा इतिहास माहितही नसेल ! गेल्याच महिन्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लडाखमधील श्योक नदीवरील पुलाचं उद्घाटन केले. त्याचे नामकरण ‘कर्नल चेवांग रिंचेन ब्रिज’ असे केले. या योध्याची स्मृती जतन करण्यास उशीर झाला असला तरी स्थानिक नि जवानांच्या मनात ती कायम आहे.”
 
 

चीन सीमेपासून ४५ किमी अंतरावर लाईन ऑफ अक्चुअल कंट्रोल (एल ए सी) जवळच्या पुलाला त्यांचे नाव दिले आहे. हा पूल सीमेजवळील दरबुक भागाला दौलतबेग ओल्डी या अति उंचीवरील भागाशी जोडेल. ४.५ मीटर रुंदीचा हा पूल ७० टनी वाहनाचा भार पेलण्यास सक्षम असल्याचे सांगितले जाते. बॉर्डर रोड ऑर्गनाएजेशन (बी आर ओ) ने १४ हजार ६५० फूट उंचीवर बनवलेल्या या पुलाने चीन क्षेत्राजवळील सामरिक युद्ध स्थितीत मोठा परिणाम घडू शकतो.
 
 

लडाख मध्ये पर्यटनाला प्रचंड वाव असून येथील चांगली दळणवळण (कनेक्टिव्हिटी) व्यवस्था पर्यटकांना खेचून घेईल. हा पूल सर्व प्रकारच्या वातावरण बदलात या भागाला जोडून ठेवेल. तसच सीमा भागातील मोक्याची जागा म्हणूनही नाव मिळवेल. भारत चीन दोन्ही देशांच्या दृष्टिकोनात फरक असला तरी चीनसोबत सहकार्याचे संबंध प्रस्थापित आहेत. सीमावाद यावर योग्य समज नि जबाबदारी दाखवत तो हाताळला जातोय. अलिकडेच चीनचे शी जिनपिंग दौऱ्यावर आले असता त्यांनी काश्मीरचा विषय काढला नाही. यावरून काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसतो असे या पुलाच्या उद्घाटन प्रसंगी संरक्षण मंत्री म्हणाले. याच वेळी त्यांनी सियाचीन पर्यटनासाठी खुला केल्याची घोषणा केली होती.
 
 
 
 

 
कोण आहेत कर्नल चेवांग
 
 
“उपाधिवरून ते भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी पदावर होते हे समजले असेलच. १९४८ च्या मे महिन्यात पाकिस्तानने टोळीवाल्यांमार्फत कारगिलवर ताबा मिळवला होता. पण लेह सोडलं होतं. तिथे सहज कब्जा मिळवता येईल असं बहुधा वाटलं असावं कारण त्याभागात सैन्य असल्याचा मागमूस नव्हता. तथापि, जे के स्टेट फोर्सचे ३३ जवान तिथे होते. माहितीवरून लगेचच तिथे पोहचलेले”
 
 
कर्नल आपल्या २० जणांच्या तुकडीसह दाखल झाले. येथील बौद्ध मठ नि शांतताप्रिय लडाख वाचवण्याचे आव्हान त्यांच्यावर होतं. १३ मे ला त्यांनी लेहला तिरंगा फडकवला. पाकिस्तानी टोळीवाल्यांना हुसकवण्यासाठी स्थानिक लोकांकडे मदत मागितली. त्यांच्या हाकेला प्रतिसाद म्हणून १७ वर्षीय कुमार आला. त्यानंतर २८ जण आले. त्यांना प्राथमिक सैन्य शिक्षण दिले गेले नि गटाचे नाव ठेवले ‘नुब्रा गार्डस’. त्याचं नेतृत्व याच कुमारवयीन मुलाकडे देण्यात आलं. यावेळच्या लढाईत या पथकाने मोलाची भूमिका बजावली. त्यांनी टोळीवाल्यांना अधिकची कुमक येईपर्यंत रोखून धरलं.
 
 

यावेळी सदर मुलाचे साहस नि शौर्य पाहून भूदलात कमिशन ऑफिसर नेमले गेले. यांचेच नाव चेवांग रिंचेन ! सैन्यातील सर्वोच्च दुसरा पुरस्कार महावीर चक्र सर्वात कमी वयात दिले गेले. हे पहिले अधिकारी जे नुब्रा खोऱ्यातुन सैन्यात सामील झाले. ११ नोव्हेंबर १९३१ रोजी त्यांचा जन्म. सप्टेंबर १९४८ सालात त्यांच्या मदतीने सैन्याने १७ हजार फूट उंचीवरील लामा हाऊसवर ताबा मिळवला. तर डिसेंबरमध्ये बैगाडांगडो जवळील उंच डोंगरावर हल्ला चढवून तेही हस्तगत केले. तुक्कार हिलवर जी एकवीस हजार फूट उंचीवर आहे तिथे निर्णायक लढाई होती. भयंकर थंडी नि पर्वतावर असलेल्या बर्फाने तुकडीच्या तब्येतीत फरक पडत होता. पण चेवांग यांच्या चमकदार नेतृत्वात यावर ताबा मिळवला गेला.
 
 

“पुढे १९७१च्या युद्धात रिंचेन नि लदाख स्काऊट बँडने पाकिस्तानच्या ताब्यातील ८०४ चौ की मी भूभाग मुक्त केला. यात तुरतुक गाव देखील होते जे सामरिकदृष्ट्या भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या नेतृत्वात कोणालाही न दगवता ही कारवाई सफल झाली. रिंचेन यांच्या रणनीती नि युद्ध पद्धतीविषयी फ्रेंच इतिहासकार क्लाऊड अर्पि यांनी सविस्तर लिहिले आहे. त्यांच्या सैन्य तुकडीला पाहताच स्थानिक लोकांनी गावाच्या बायका मुलांना जवळच्या नदी किनारी लपवले. हे लक्षात आल्यावर कर्नल रिंचेन यांनी सर्वांना एकत्र आणत त्यांना विश्वासात घेऊन सांगितले की तुम्हाला काही होणार नाही. २३ वर्षांनी तुमचे भारतात स्वागत आहे. माझा एकही जवान गैर वागल्यास त्याच्यावर कारवाई मी करेन. ज्या स्वतंत्र भारतात विविध जाती धर्माचे लोक शांती सद्भावनेने काम करतात, राहतात तसे तुम्ही रहा.”
 
 

या लढाईतील शौर्याबद्दल पुन्हा एकवार त्यांना महावीर चक्र दिले गेले. मिलिटरी कमांडर म्हणून कर्नल शत्रूला धक्का तंत्र देण्यावर भरवसा ठेवत होते. स्थानिक असल्याने कडाक्याच्या थंडीत उंच डोंगरावरील मोहिमेत यश कसे मिळवायचे याची त्यांना कल्पना होती. नेहमीच त्या भागातील लोकांना सोबत घेऊनच मोहिमा केल्या कारण त्यांच्या मदतीवर जवानांची जिंदगी अवलंबून आहे हे ते ओळखून होते. दोनदा महावीर चक्र मिळवणारे रिंचेन १९८४ सैन्यातून निवृत्त झाले. तर १ जुलै १९९७ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
 
 

इंडियन आर्मीने अलिकडेच कर्नल चेवांग रिंचेन यांच्या घराला वारसास्थळ बनवत पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित केलंय. अशा या वीर पुत्राची आठवण म्हणून श्योक नदीवरील पुलाला त्यांचं नाव देण्यात आलयं ! अशा शूरवीरांच्या पराक्रम नि असीम त्यागावर तिन्ही दलांचे मनोधैर्य कायम असते. मग कोणी लष्करी कारवाईवर ( सर्जिकल स्ट्राईक) कितीही शंका उपस्थित करो ते देशासाठी जीवाची बाजी लावतातच अशा सुपुत्रांना आपण सलाम करीत म्हणू या ‘जय हिंद’ !!!

Continue reading

जनआरोग्य योजनेत आता होणार २३९९ उपचार

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या आता १,३५६वरून २,३९९पर्यंत वाढविण्यात येणार आहे. एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन उपचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या...

राज्यपाल देवव्रत यांच्या शपथविधीलाही अजितदादांची दांडी!

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. राजभवनातल्या दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्य न्यायमूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ...

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...
Skip to content