Homeपब्लिक फिगरअर्थसंकल्प वाचायला शिकवता...

अर्थसंकल्प वाचायला शिकवता शिकवता तुम्हीच केला खेळखंडोबा..

अर्थसंकल्प कसा वाचावा, हे तुम्ही शिकवले. पण तुम्ही गेल्या दहा वर्षांतल्या विक्रमी ५० हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या पुरवण्या मागण्या मांडून अर्थसंकल्पाचा खेळखंडोबा केला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत राज्य सरकारवर विशेषतः अर्थमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावर केली.

पुरवणी मागण्यांमधून मत्ता निर्माण होण्यासाठी कोणतीही तरतूद नसल्याने या मागण्या म्हणजे आर्थिक बेशिस्तीचे उत्तम उदाहरण असल्याची टीकाही पवार यांनी केली. सत्ताबदलातल्या घडामोडींचा आढावा घेऊन फडणवीस यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले की, तुम्ही काय काय केलेत, कोणाकोणाला फोन केलेत आणि कुठे कुठे पाठवलेत, ते आम्हाला माहीत आहे. तुम्ही अगदी वेष पालटूनही कोणाला भेटत होतात आणि हे कोणी सांगितले, हे काही मी सभागृहात सांगणार नाही. (फडणवीस वेष बदलून रात्री जायचे आणि एकनाथ शिन्दे यांना भेटून यायचे, हे राज्यातील सत्तांतरानंतर अमृता फडणवीस यांनी सांगितले होते.)

पवार बोलत असताना संजय कुटे यांनी हस्तक्षेप करताच पवार म्हणाले की, मी विदर्भावरच बोलतोय. विदर्भातल्या नेत्यांवरच बोलतोय. मला सगळं माहीत आहे अगदी पहाटे आठ वाजता उठून झालेल्या शपथविधीबद्दलही माहीत आहे… पवार यांनी ही गोष्ट सांगताच सभागृहात हशा उसळला. त्यावर लगेचच पवार म्हणाले की, मात्र माहीत असले तरी ते आमच्या दोघांतले (अजित पवार आणि फडणवीस) आहे आणि ते मी सर्वांना सांगणार नाही.

अर्थसंकल्प

ईडी माहीत होती, एनआयए माहीत होते. पण आता उठसूट एसआयटी लावतो, हा प्रकार सुरू झाला आहे, अशी टीकाही पवार यांनी केली. ती करताना त्यांनी फडणवीस यांची नक्कल केली आणि मी तपासून बघतो आणि एसआयटी लावतो, असे पवार यांनी सांगताच सभागृहात पुन्हा एकदा हशा उसळला.

भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्रात देवेन्द्र फडणवीस सर्वात प्रभावी नेते आहेत, असे सांगून अजित पवार म्हणाले की, तुमचे एक नेते म्हणाले की घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम बारामतीत करतो. बारामतीत आमचं काम आहे. आणि हे आमचा करेक्ट कार्यक्रम करायला निघालेत… अरे, मी एखाद्याचा चॅलेन्ज घेतला तर कोणाच्या बापाचं ऐकणार नाही… आम्ही कार्यक्रम केला तर हे कोलमडून पडेल… पवार यांच्या फटकेबाजीला संपूर्ण सभागृहाने दाद दिली.

सहा महिने झाले. पण, अजून तुम्ही एकाही महिलेला मंत्री करत नाही, अशी टीका करून पवार म्हणाले की, मी आता वहिनींनाच सांगतो म्हणजे मग त्या तुम्हाला सांगतील आणि मग तुम्ही ऐकाल. मग तरी महिला मंत्री होईल. महिला मंत्री नाही हा महाराष्ट्रातील महिलांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.

राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांबद्दलही अजित पवार यांनी टीका केली. बुट्टीबोरी असो की मिहान. हे प्रकल्प गतिमान होऊ शकलेले नाहीत, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. तुम्हीही कमी पडलात आणि आम्हीही कमी पडलो… यात विदर्भाचा काय दोष, असा प्रश्न करून पवार म्हणाले की आपण सगळेच कमी पडलोय.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content