होय.. आम्ही भिडेंना गुरूजी म्हणतो. त्यात तुम्हाला आक्षेप घेण्यासारखे काय आहे? संभाजी भिडेंना गुरूजीच म्हणतात. संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध अमरावती येथील पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठल्याही महापुरुषाविरुद्ध कुणीही अवमानजनक वक्तव्य केले तर त्याचे समर्थन आम्ही करणार नाही. पण त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या काँग्रेसच्या शिदोरी, या मुखपत्राविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
संभाजी भिडे गुरूजींनी ज्या कार्यक्रमात महात्मा गांधींबद्दल अवमानजनक वक्तव्य केले त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग पोलिसांकडे नाही. जे व्हिडिओ आहेत ते प्रसारमाध्यमांतून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आवाजाचे नमुने गोळा करण्याचे काम पोलीस करत आहेत. पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली असून ती त्यांनी स्वीकारलीही आहे. कोणीही असो.. महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही. मात्र, जसा महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही तसेच स्वा. सावरकरांचाही अपमान सहन केला जाणार नाही. काँग्रेसच्या शिदोरी, या मुखपत्रात सावरकरांचा उल्लेख माफीवीर असा करण्यात आला आहे. त्यांना समलैगिक असल्याचे म्हटले आहे. असे विकृत लिखाण आम्ही कधीही सहन करणार नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे फडणवीस यांनी एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

महाराष्ट्रात कुठल्याही स्थितीत औरंगजेबाचे महिमामंडन आम्ही सहन करणार नाही! औरंगजेब या देशातील मुस्लिमांचासुद्धा नेता होऊ शकत नाही. त्या काळातले चर्किक मंगोल मुसलमान अखंड भारतातही काही लाख होते. त्यामुळे त्यांचे वंशज असण्याचाही प्रश्न नाही. भारतात हिरो केवळ छत्रपती शिवाजी महाराज हेच होऊ शकतात. भारतातील लोक एपीजे अब्दुल कलाम यांना मानणारे आहेत. राणा प्रताप यांना मानणारे आहेत. काही ठिकाणी सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होतो आहे. एटीएस आणि आबी त्यावर काम करत आहे. काही माहिती आम्हाला मिळाली आहे, मात्र ती सभागृहात सांगता येणार नाही. काही प्रकरणात विलंबाने कारवाई करण्याचे प्रकार झाले. त्या पोलिसांवर कारवाई करण्यात येईल. राजकारणात मतांचा विचार केला जात तरी काही बाबी या राष्ट्रहिताच्या असतात, हे कायम लक्षात ठेवावे. मतांच्या लांगूलचालनासाठी असे प्रयत्न होता कामा नये, असेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर मधील फुलंब्री येथील धर्मांतराच्या घटनेबाबत सखोल चौकशी करण्यात येईल. ‘लव्ह जिहाद’बाबत विविध राज्यांकडून कायदे मागविण्यात आले आहेत. त्याचा अभ्यास सुरू असून ही बाब राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. फूस लावून पळवून, धर्मांतरण करून लग्न करण्याच्या प्रकरणांमध्ये राज्याच्या पोलीस महासंचालकांनी स्टॅंडर्ड ऑपरेशन प्रोसिजर तयार करून सर्व पोलीसठाण्यांना त्या कळविण्यात येतील. माथाडी कायद्याबाबत काही मते माझ्याकडे आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे एका शिष्टमंडळाने मांडली आहेत. हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात येईल. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चिरागनगर येथील घराचे संवर्धन करण्यासाठी नवीन आराखडे तयार करण्यासाठी घेतले आहेत. त्यासाठी जो काय निधी लागेल, तो राज्य सरकारतर्फे दिला जाईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर बोलताना विधानसभेत स्पष्ट केले.

