Homeएनसर्कलहोय, मी आहे...

होय, मी आहे कंत्राटी मुख्यमंत्री!

आमच्यावर रोज उठून गद्दार, गद्दार असे आरोप केले जातात, असे सांगून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले, आज तर माझ्यावर कंत्राटी मुख्यमंत्री असा शिक्काही मारलाय. होय, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केलेली नाही. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाण्यापेक्षा मी दुकान अर्थात शिवसेना बंद करेन, असं सांगणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलीत आणि म्हणून बाळासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी आम्ही खुद्दारी केली. नाही तर आमच्या स्वागताला सगळीकडे हजारो लोक रस्त्यांवर दुतर्फा जमले नसते.  

होय, मी कंत्राट घेतलेय, असे सांगून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले, मी महाराष्ट्राच्या विकासाचे, राज्य अधिक समृद्ध करण्याचे, गोरगरीबांचे अश्रू पुसण्याचे, जनतेचे अश्रू पुसण्याचे, बहुजनांच्या विकासाचे, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे कंत्राट मी घेतलेय आणि त्या अर्थाने मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे, हे मान्य करतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य केले आणि बिचाऱ्या काँग्रेसची अवस्था एकूणच वाईट झालेली आहे, अशी टिप्पणी करून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवसही गाजवला.

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चा गुरुवारी विरोधी पक्षांनी सुरू केली होती. तो विरोधी पक्षांचा अधिकार असतो. या चर्चेत विविध आघाड्यांवर राज्य सरकार कसे अपयशी ठरले आहे, याचा लेखाजोखा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विविध वक्त्यांनी मांडला.

या सर्व आरोपांना सविस्तर उत्तरे देऊन मुख्यमंत्री शिन्दे यांनी अजित पवार तसेच जयंत पाटील यांची चांगलीच खेचली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मला श्रद्धा-सबुरीचा सल्ला दिला आहे. पण त्यांना सांगू इच्छितो की दादा, खरे तर सकाळी उठून शपथविधीला गेलात तेव्हा तुम्हीच थोडी घाई केलीत. तुम्ही तेव्हा सबुरीने घेतले असते, तर तुमचा चुकीचा कार्यक्रम झाला नसता. त्यात तुम्ही जयंतरावांना सांगितले असते तर.. तर करेक्ट कार्यक्रम झाला असता. कारण मला जयंतरावच तसं त्यावेळी म्हणाले की, मला सांगितलं असतं तर असं झालं नसतं.

जयंत पाटील यांचा समाचार घेताना मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, जयंतराव तुम्ही मला म्हणालात की मुख्यमंत्री व्हायचे होते तर इकडच्या बाजूला म्हणजे तुमच्याकडे यायचे होते. तुम्ही मला मुख्यमंत्री केले असते. पण तुम्ही मुळात हे बोलताना विरोधी पक्षनेते असलेल्या अजितदादांची परवानगी घेतलीय का… खरे तर जयंतराव तुम्हालाच विरोधी पक्षनेता व्हायचे होते. पण… असे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी एक पॉझ घेतला आणि सारे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

अजित पवारांना उद्देशून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, दादा तुमच्या लोकांवर माझे बारकाईने लक्ष आहे. दादा तुम्ही महाविकास आघाडीची बांधली होती मोट, मुख्य बसले होते घरी तुम्ही चालवत होते बोट….

संजय राऊत यांचं नाव न घेता मुख्यमंत्री शिन्दे यांनी त्यांच्यावरही टिप्पणी केली. ते म्हणाले, अजितदादा तुम्ही भाषणात म्हणालात की, सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी येत नाही. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. पण काही लोक म्हणत होते की पाच वर्षे नाही तर पंचवीस वर्षे आम्हीच सत्तेवर राहणार… कोण राहतंय पंचवीस वर्षे. आम्ही असं काही म्हणत नाही. आम्ही इतकंच म्हणतोय की अडीच वर्षे इतकं चागलं काम करणार की, लोक पुन्हा पाच वर्षे देतील सेवेसाठी. आम्ही फार पुढचे बोलत नाही. पण काही लोक बोलले, आता बघू ते किती वर्ष राहताहेत ते… (आतमध्ये)

आता हे मुख्य प्रवक्ते आतमध्ये गेले तर जयंतराव तुम्ही काय शिवसेनेचे उपनेते किंवा प्रवक्ते होताय की काय… कारण तुम्ही तुमच्या भाषणात इतके टोमणे मारले की तुम्ही राष्ट्रीय प्रवक्त्यांची जागा घेताय की काय, असे वाटले. काँग्रेसची अवस्था तर काय सांगू, असं म्हणून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, मुळात स्थिती वाईट झालेली आहे. त्यात शिवसेनेबरोबर गेले. वरच्या सभागृहात अंबादास दानवे आणि खाली अजितदादा झाले विरोधी पक्षनेते, असे सांगून काँग्रेस कुठे उरलीच नाही, अशी टीका मुख्यमंत्री शिन्दे यांनी केली. इंदिरा गांधी यांच्याबद्दल आपल्याला प्रेम होते. कारण त्या डँशिंग होत्या, असे सांगून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, इंदिराबाईंची होती किती वट, शिवसेनेबरोबर झाली नुसती फरफट…. अशी अवस्था आज काँग्रेसची झाली.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content