कोरोनावरील उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रेमडेसिविर, या इंजेक्शनच्या भरमसाठ मागणीनंतर आता कोरोनातून बरे झाल्यानंतर उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसीस, या डोळ्यांच्या आजारावर परिणामकारक मारा करणाऱ्या अॅम्फोटेरिसिन बी, या औषधाची चणचण भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय रसायन मंत्रालयाने या औषधाच्या वाढीव मागणीची दखल घेत काल यावर चर्चा केली आणि या औषधाचा तुटवडा टाळण्यासाठी उत्पादनवाढ तसेच आयातीवर विचार करण्यात आला. देशातील काही राज्यांमध्ये, अॅम्फोटेरिसिन बी, या औषधाच्या मागणीत अचानक वाढ दिसून आली आहे. हे औषध डॉक्टरांद्वारे रुग्णांना कोविडपश्चात म्युकरमायकोसीस या गुंतागुंतीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना घेण्यास सांगितले केले जात आहे. यामुळे केंद्र सरकार या औषध उत्पादकांसोबत त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी बोलणी करीत आहे. या औषधाची अतिरिक्त आयात करून तसेच स्थानिक उत्पादनात वाढ करत पुरवठ्याच्या स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, असे रसायन मंत्रालयाकडून काल सांगण्यात आले.
उत्पादक / आयातदार यांच्याकडे असलेल्या शिल्लक साठ्याच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि 11 मे 2021 रोजी औषध विभागातील अॅम्फोटेरिसिन बी, या औषधाच्या मागणीचा तपशील पाहिल्यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे औषध वाटप अपेक्षित पुरवठ्यानुसार दिनांक 10 मे ते 31 मे, 2021पर्यंत उपलब्ध केले जाईल.
केंद्र सरकारने सरकारी, खाजगी रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांमधून समान प्रमाणात पुरवठ्याचे वितरण करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्याची विनंती राज्यांना केली आहे. या वाटपातील औषध मिळविण्यासाठी खाजगी आणि शासकीय रुग्णालयांशी संपर्क साधून त्याच्या आवश्यकतेचा तपशील रुग्णांच्या सोयीसाठी जाहीर करण्याचे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत.
याव्यतिरीक्त यापूर्वी पुरवठा केला गेलेला साठा आणि उपलब्ध असलेला साठा यांचा काटेकोरपणे वापर करावा. राष्ट्रीय औषध मूल्यांकन प्राधिकरण (नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटी, एनपीपीए) यांच्याद्वारे पुरवठ्याच्या व्यवस्थेचे परीक्षण केले जाईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

