Homeमुंबई स्पेशलशरद पवार यु...

शरद पवार यु टर्न घेणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करत राज्य सरकारमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह संपूर्ण पक्ष आपल्यासोबत घेण्यात यशस्वी होतात की आपले काका, शरद पवार यांच्यासमोर गुडघे टेकत पुन्हा एकदा सरकारमधून बाहेर पडतात, याकडे आता राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी पुन्हा तो खिशात टाकला. त्याचप्रमाणे राज्य सरकारमध्ये जाण्यासाठी विरोध करणारे शरद पवार पुढे सर्व आमदारांच्या आग्रहासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णयही घेतील, अशी चर्चा आज सुरू झाली आहे.

काल आपल्या सहकारी मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण केंद्रात भेट घेतली. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत चर्चेच्या फेऱ्यांवर फेऱ्या झाल्या. आज थोरले पवार बेंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या बैठकीत सहभागी होणार होते. परंतु त्यांनी हा दौरा रद्द केला. त्यानंतर आज पुन्हा अजित पवार यांनी आपल्या सहकारी आमदारांसह शरद पवार यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यावेळीही त्यांच्यासोबत होते. राष्ट्रवादी एकसंघ राहवी याकरीता काहीतरी मार्ग काढावा, अशी विनंती पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांना केली.

विधानसभेतही आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून व्हिपचा विषयच उपस्थित करण्यात आला नाही. कोणत्याही बाजूकडून कोणावरही आक्षेप घेण्यात आला नाही. विधानसभेच्या पायऱ्यांवरही विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून आंदोलन करण्यात आले. त्यातही शरद पवार गटाचे आमदार सहभागी झाले नाहीत. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार यात सहभागी झाले होते.

पंधरा दिवसांपूर्वी, दोन जुलैला अजित पवार आणि त्यांचे आठ सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले. त्यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीनंतर संतापलेले शरद पवार यांनी लगेचच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा केली. मंत्रिमंडळात सहभागी झालेले छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून त्यांनी आपल्या भूमिकेच्या समर्थनासाठी जाहीर सभा घेतली. यानंतर आणखी काही सभा ते घेणार आहेत. या सर्व सभा मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात होणार आहेत. मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर घेतलेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला होता. आपल्याला वेळोवेळी कसे तोंडघशी पाडण्यात आले हे त्यांनी तपशीलवार सांगितले. याच दिवशी शरद पवार यांनीही वेगळा मेळावा घेऊन आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली होती.

राजकीय खेळी म्हणून अजित पवार यांनी आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्याचवेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नेमणूक केली आणि प्रतोदपदी अनिल पाटील यांची नेमणूक केली. तिकडे शरद पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांना कायम ठेवले आहे. मात्र अनिल पाटीलऐवजी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रतोद म्हणून नेमले. त्याच वेळेला अजित पवार यांनी विरोधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक केली जाईल, असेही त्यांनी घोषित केले.

या नव्या मंत्र्यांना दोनच दिवसांपूर्वी खाती देण्यात आले. हे खातेवाटप होण्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक, या निवासस्थानी जाऊन आपल्या काकी प्रतिभा पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार तसेच सुप्रिया सुळे घरी उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी बोलताना अजितदादा म्हणाले की, राजकीय भूमिका आणि कौटुंबिक संबंध यात फरक असतो. राजकारणामध्ये आम्ही वेगळी भूमिका घेतली असली तरी कुटूंब हे कुटूंबात असतं. त्यामुळे आपण सिल्व्हर ओकवर गेलो होतो. त्यानंतर आता शरद पवार यांच्या भेटीगाठी घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content