खरंतर मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातल्या त्यांनी खोपट एसटी स्थानकाला भेट दिली. त्यानंतर साहजिकच तेथील गलथान व्यवस्थेमुळे मंत्रीमहोदय संतापले. त्याचवेळी मी यासंबधी लिहिणार होतो. पण त्यावेळी मंत्र्यांनी खात्याचा पदभार स्वीकारलेला नव्हता म्हणून आवरते घेतले. परंतु आता परिवहन मंत्री सरनाईक यांनी खात्याचा कारभार स्वीकारला व एसटीचा कारभार सुधारणार, इतकेच नव्हे तर तेथे प्रवाशांसाठी सोयीसुविधाही अद्ययावत केल्या जातील याची ग्वाही दिली, म्हणूनच जरा पांढऱ्यावर काळे करण्याचा प्रयत्न.
गेली २०/२५ वर्षे प्रत्येक परिवहन मंत्र्यांनी एसटी सुधारण्याच्या घोषणा केलेल्या होत्या. बाकीच्यांचे मला माहित नाही पण सरनाईक यांची ख्याती ठाण्यात तरी हाती घेतलेले काम तडीस नेणारा नेता अशीच आहे. त्यांच्या नगरसेवकपदाच्या कारकिर्दीत पोखरण रोडचा जो काही कायापालट झाला आहे तसाच ओवळा गावातील विकासही ज्या गतीने मार्गी लावलेला आहे ते पाहता त्यांना परिवहन मंत्री म्हणून चांगला कालावधी लाभला तर ते चमत्कार नाही पण एसटीला गती देऊ शकतील असा भरवसा वाटतो. खरंतर ठाणे शहर आणि जिल्ह्यातील एसटी आणि तिच्या स्थानकांची तसेच आगारांची काय अवस्था आहे हे मी मंत्रिमहोदयांना दाखवण्याची मुळीच गरज नाही. कारण १५ वर्षांहून अधिक काळ ते आमदार आहेत. आमदार होण्यापूर्वी यशस्वी नगरसेवक होते. शिवाय व्यवसायाने ते बिल्डर कम हॉटेलिअर आहेत. एखादे काम हाती घेतले तर ते कुशलतेने पार पाडण्यात ते मशहूर आहेत. साहजिकच आमदार असताना त्यांनी एसटीबाबतच्या सर्व गोष्टी नजरेखालून घातल्या असतीलच. तसेच गेली अनेक वर्ष ठाणे जिल्हा शिवसेना व भाजपचा गड राहिला असला तरी एसटीची इतकी कुचंबणा कुठेच झाली नसेल अशी परिस्थिती आहे.
सात-आठ दिवसांपूर्वीच काही कामानिमित्त नाशिकला गेलो होतो. वाटेत काही एसटी थांबे व आगारही लागले. पहिलाच मोठा एसटी थाम्बा भिवंडीचा लागला. अक्षरशः भिकार थांबा आहे. कुठल्यातरी जीर्णशिर्ण इमारतीत आपण आलेलो आहोत अशी जाणीव सतत होती. इमारतीच्या छताचे प्लास्टर अनेक ठिकाणी पडलेले होते. प्रवाशांना बसण्यासाठी जी बाबा आदमच्या काळातील लोखंडी बाकडी आहेत त्यांनाही आता बाक आला आहे. शिवाय त्यांचा रंगही विटून गेला आहे. मी सहज चौकशी करण्यासाठी म्हणून एका केबिनसमोर गेलो तर मलाच नाक दाबून बोलावे लागले, कारण भयानक दुर्गंधी होती. थांबाप्रमुखाला भेटायचे ठरवले तर तो जागेवरच नव्हता. ते कधी जागेवर सापडणारच नाहीत, असा शेरा मागून कुणीतरी मारला. तेथील कॅन्टीनची अवस्था तर शिसारी आणणारी होती. जेलमधील भांडीही यापेक्षा चांगली असतील अशी अवस्था होती. प्रसाधनगृह म्हणजे डोक्याची तिडीकच जाईल असा प्रकार होता.
त्या मोठ्या स्थानकातील रस्त्यांची तर दुर्दशाचं झालेली दिसते. गेल्या सुमारे १०/१५ वर्षांत तेथे साधे डांबरी रस्तेही केलेले नाहीत असेही अनेकांचा बोलण्यात आले.
भिवंडी हे छोटे उद्यमी शहर आहे. कापडासाठी हे शहर ओळखले जाते. इतरही छोटेमोठे उद्योग येथे आहेत. येथे महापालिकाही आहे म्हणे! पण तिचे अस्तित्त्वच कुठे जाणवले नाही. मोठा रस्ता कुठला आणि लहान रस्ता कुठला हेच येथे कळत नाही. खोपट स्थानक गर्दूल्यांचा अड्डा, पोलीस ढिम्मपणे एसटी आगार सुधारत आहेत. त्याचे सुशोभिकरणही आस्तेकदम सुरु आहे. खेदाची गोष्ट ही आहे की, इतक्या मोठ्या आगाराची देखभाल करण्यासाठी केवळ एकच सुरक्षा कर्मचारी आहे. काही महिन्यांपूर्वी येथे पाच सुरक्षा कर्मचारी होते. पण वंदना टॉकीज येथे बसलेल्या एका अधिकाऱ्याने पाचवरून ते अवघ्या एकावर आणले, अशी तक्रार एका जबाबदार व्यक्तीने केली. या आगाराच्या शेवटी सफाई कामगार व आजूबाजूच्या वस्त्यांतून काही उनाड मुले गँगने येथे येऊन चरस व अंमली पदार्थाचे सेवन करतात. काहीवेळा गर्दूली मुले हिंसक होतात व चोऱ्यामाऱ्याही करतात. एक-दीड महिन्यापूर्वी गर्दूल्यांची तक्रार घेऊन नौपाडा पोलीसठाण्यात गेले असता पोलिसांनी एसटीच्याच माणसांना त्यात गोवण्याचा प्रयत्न केला असेही एकाने सांगितले.
सॅटिस पुलाच्या पायथ्याशी असलेल्या एसटी थांब्याबाबतही अनेक तक्रारी आहेत. येथील रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे. ठाणे ते बोरिवलीदरम्यान धावणारी एसटी बसही नेहमीच अनियमित असते. “Citizens expect their tax payee rupee to go towards, the basics such as schools, public safety, transportations and infrastructure” असं जनतेला नेहमीच वाटत आलेलं आहे. जनतेच्या या अपेक्षेचे नवीन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक चीज करतील अशी अपेक्षा बाळगतो.
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर