Wednesday, July 3, 2024
Homeमाय व्हॉईसनिवडणुकीच्या रणधुमाळीतही पंतप्रधान...

निवडणुकीच्या रणधुमाळीतही पंतप्रधान मोदी भूतानच्या दौऱ्यावर?

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून देशभरात प्रचाराला अधिकृतपणे सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून देशातल्या विविध राज्यात विकासकामांचे लोकार्पण, भूमीपूजन वा तत्सम कारणांच्या निमित्ताने जाहीर सभांमधून प्रचाराची राळ उडवत आहेत. भारतीय जनता पार्टीचे ते स्टार प्रचारक म्हणून पहिल्या क्रमांकावर राहणार आहेत. अशा व्यस्त दिनचर्येतही पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठवड्यात भूतानचा दोन दिवसाचा दौरा करणार असल्याचे समजते. पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर गेल्यास लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर परदेश दौऱ्यावर जाणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरतील.

जानेवारीत पदभार सांभाळल्यानंतर भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे सध्या पाच दिवसांच्या भारत भेटीवर आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना भूतानच्या राजांच्या वतीने भूतान भेटीचे निमंत्रण दिले. पंतप्रधान मोदींनी ते स्वीकारलेही आहे. या भूतान भेटीच्या दौऱ्याची तारीख व तपशील अजून निश्चित झाला नसला तरी या प्रस्तावित दौऱ्यात दोन्ही देशांकडून परस्पर संबंध, सांस्कृतिक तसेच पर्यटन, पायाभूत सुविधा आणि संरक्षणविषयक करारांवर सह्या होण्याची शक्यता आहे. डोकलामच्या माध्यमातून भूतानवर दबाव आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनला एक संदेश देण्याचाही प्रयत्न पंतप्रधान मोदी यांच्या या नियोजित भेटीमागे असू शकेल, असा जाणकारांचा होरा आहे.

भूतानमध्ये लवकरच महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

पंतप्रधान मोदींना दिल्लीत भेटल्यानंतर काल भूतानचे पंतप्रधान तोबगे काल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी राजभवनावर राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. भूतान महाराष्ट्राशी हरित व्यवसाय, पर्यटन, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असून लवकरच भूतान महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महोत्सवाचेदेखील भूतानमध्ये आयोजन केले जाईल, असे पंतप्रधान तोबगे यांनी राज्यपालांना सांगितले.

जानेवारी महिन्यात पंतप्रधान झाल्यावर आपल्या पहिल्याच भारत भेटीवर आलेले भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे व त्यांच्या पत्नी ओम ताशी डोमा यांचे शनिवारी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी शासनाच्या वतीने मुंबईत राजभवन येथे स्वागत केले.

मुंबईत फिक्कीच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात टूर ऑपरेटर्स तसेच व्यापार व वाणिज्य प्रतिनिधींसोबत बैठक झाली. महाराष्ट्र व भूतानमध्ये उभयपक्षी पर्यटन वाढविण्याबाबत आपण कटिबद्ध आहोत. भूतानचे लोक भारतीय चित्रपटांचे दर्दी असून भारतीय चित्रपटांचे चित्रिकरण आमच्या देशात करण्यास आपण उत्सुक आहोत. भूतानचे अनेक पर्यटक महाराष्ट्रातील अजंता व वेरूळ लेण्यांना भेट देतात व अनेकांना महाराष्ट्रात येण्याची इच्छा आहे. भूतानचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असून हजारो मुले एनडीए येथून लष्करी प्रशिक्षण घेऊन गेले आहेत. आपलीदेखील एनडीएमधून प्रशिक्षण घेण्याची इच्छा होती. परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आपण पुणे येथे येऊ शकलो नाही, असे तोबगे यांनी सांगितले.

राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने भूतान व महाराष्ट्रातील शैक्षणिक आदान प्रदान वाढवावे, अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी व्यक्त केली. भूतानची ‘सकल आनंद निर्देशांक’ ही संकल्पना अतिशय स्तुत्य व अनुकरणीय आहे. महाराष्ट्रातील अनेक लोकांना एकदा तरी भूतानला भेट देण्याची इच्छा असते. संस्कृती व भाषा एकमेकांना जोडते. मुंबईत भूतानचा सांस्कृतिक महोत्सव व्हावा व तसेच महाराष्ट्राचा सांस्कृतिक महोत्सव भूतानमध्ये व्हावा अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

औपचारिक भेटीनंतर राज्यपालांनी पंतप्रधान दाशो छेरिंग तोबगे आणि त्यांच्यासोबत आलेल्या भूतानच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या  शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ राजभवनातील ‘जल विहार’ सभागृहात शाही मेजवानीचे आयोजन केले. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, भूतानचे परराष्ट्र व्यवहार आणि परराष्ट्र व्यापार मंत्री ल्योनपो डी एन धूनग्याल, ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री ल्योंपो जेम शेरिंग, उद्योग आणि वाणिज्य आणि रोजगार मंत्री ल्योनपो नामग्याल दोरजी, भूतानचे भारतातील राजदूत मे. जन. वेटसोप नामग्येल, परराष्ट्र सचिव ओम पेमा चोडेन, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंग, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उपस्थित होते.

Continue reading

बाहेर आरडणे वेगळे आणि घटनात्मक पद सांभाळणे वेगळे!

लोकसभेतल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी नुकताच संपन्न झाला. या शपथविधीत शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य रवींद्र वायकर यांनी खासदारकीची शपथ घेतली. वायकर पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेले, तेही फक्त 48 मतांनी! त्यानंतर जे काही रामायण महाराष्ट्रातल्या जनतेने काही ठराविक वृत्तवाहिन्यांवर पाहिले, अनुभवले ते...

वायकरांची शपथ आणि सारेकाही चिडीचूप..

उत्तर पश्चिम मुंबईच्या निवडणूक अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी वायकरांना विजयी जाहीर केले. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी सर्वात भ्रष्ट अधिकारी आहेत. वायकरांच्या मेव्हण्याने निवडणूक कर्मचाऱ्याच्या फोनच्या मदतीने ईव्हीएम मशीन हॅक केले. आम्ही वायकरांना लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेऊ...

राहुलजींनी आपल्या आईचे ऐकले असते तर..

आत्याबाईला मिशा असत्या तर.. मी म्हणेन ती पूर्व दिशा झाली तर.. राजकारणात जरतरला काही किंमत नाही. प्रत्येक नेता हेच सांगत असतो. आता बघा ना.. काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी दिलेला सल्ला जर, आता त्यांची चालते त्या खासदार राहुल गांधींनी...
error: Content is protected !!